22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeविशेषदेशी खा, ‘इम्युनिटी’ वाढवा !

देशी खा, ‘इम्युनिटी’ वाढवा !

एकमत ऑनलाईन

आजमितीला साठीत असणारी, हरित क्रांतीपूर्व आणि हरित क्रांतीत्तोर काळ अनुभवलेल्या पिढीला काही तरी हरवलं असल्याची तीव्रतेने जाणीव होतेय. सत्तरच्या दशकातील या क्रांतीने कृषि क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. शेतीचे उत्पादन तंत्र बदलले. पारंपरिक बियाणे, खतांची जागा संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांनी घेतली. निर्वाह शेती जाऊन व्यावसायिक शेती आली. शेतीचे यांत्रिकीकरण घडून आले. एकेकाळचा अन्नधान्याचा आयातदार देश निर्यातदार बनला. गुदामे अपुरी पडतील एवढे गहू, भाताचे उत्पादन होऊ लागले परंतु याबरोबर इतर अनेक गोष्टी घडून आल्या. संकरित वाणांच्या वापराबरोबर भाजीपाला, फळे, फुले, धान्ये यांचा रंग, गंध, चव व पोषणमूल्य हरवले. संकरित वाणांमुळे बाराही महिने मुबलक भाजीपाला मिळू लागला खरा, परंतु एकाही मोसमात त्यांना चव राहिनाशी झाली. पोषणमूल्याची तीच गत झाली. बाराही महिने सर्व भाज्या मिळणे ही बाबच तशी अनैसर्गिक, पर्यावरणविरोधी म्हणावयास हवी. ‘बेमौसम बरसात’सारखाच काहीसा हा प्रकार.

देशी वाण ठराविक मोसमात आपापला आकार, रंग, गंध, चव व पोषणमूल्य घेऊन येतात. भाज्यांमध्ये मसाल्यांचा वाढता वापर हे भाज्यांच्या हरवलेल्या चवीचे तर द्योतक नसेल? वैशाली टोमॅटो जाड कवच, लाल रंग घेऊन आले परंतु टोमॅटोची मूळ आंबट-गोड चव मात्र हरवली. शासनाच्या वन व रान भाज्या महोत्सवाला लोकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद, भाजी मंडईत ग्राहकांकडून गावरान भाज्यांची आवर्जून केली जाणारी मागणी यातून लोकांचा भाज्यांच्या संकरित वाणाविषयीचा उबगच व्यक्त होतो. ग्राहकांनी गावरान भाजीची मागणी केल्यानंतर विक्रेते संकरित वाण गावरान म्हणून ग्राहकांच्या माथी मारतात, ही गोष्ट वेगळी. भाज्यांचे देशी वाण चवीबरोबर औषधी गुणही बाळगून आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, बद्धकोष्ठ असे एक ना अनेक आजार बरे करण्याची क्षमता भोपळा, कारले, तोंडले, शेपू या आणि अशा इतर भाज्यांमध्ये आहे.

भाज्यांचे देशी वाण समाजजीवनासाठी एवढे एकरूप झाले आहेत की त्यांच्या गुणवैशिष्ट्यांवरून अनेक वाक्प्रचार समाजात रूढ झाले होते. गुलाब, झेंडू असो की शेवंती या फुलांना सुगंध असतो हे सांगण्याची वेळ आता आली आहे. उन्हाळा म्हटलं की मामाचा गाव आणि आंबे असे समीकरण एकेकाळी ठरून गेलेले. गाव तिथं आमराई असा तो काळ. आमराईतील प्रत्येक आंब्याचे झाड आपापले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बाळगून असायचे. घरातल्या पोरांप्रमाणे त्यांचाही नामकरण विधी पार पाडलेला असायचा. घरातलं पोर एखाद्या वेळेला नावाला जागायचं नाही, परंतु आंबा जागला नाही असं व्हायचं नाही. आमराई गेल्या आणि त्यांच्यासोबत जैविक वैविध्याचा अनमोल ठेवाही गेला.

वैष्णो देवी मंदिर परिसरात आग

केवळ चवीत नव्हे तर पोषणमूल्यातही देशी वाण संकरित वाणापेक्षा सरस आहेत. सत्तरच्या दशकात हायब्रीड म्हणून संकरित ज्वारी आली. अधिक उत्पादन देणारी म्हणून तिचा त्या काळात मोठा गवगवाही झाला. परंतु पोषणमूल्याअभावी ती सध्या पशु खाद्य म्हणून विकली जाते. तीच गत लोकवन या संकरित गव्हाची. यंदा सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला म्हणून शेतकरी खुशीत आहेत. अमेरिका, युरोपिय देशांकडून भारताच्या पेंडीला मागणी वाढल्याने ही दरवाढ झाली आहे. भारतीय पेंड जनुकीय फेरबदल न केलेल्या सोयाबीनची असल्याने इतर देशांच्या तुलनेत तिला मागणी आली आहे. एकेकाळी जर्सी गायीचे मोठा गाजावाजा करत पदार्पण झाले. तिच्यापासून भ्रमनिरास झाल्यानंतर आता देशी गायीचा शोध घेतला जातोय. देशी वाण कमी उत्पादन देतात, असाही त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो परंतु हे खरे नाही.

संशोधनाअंती त्यात वाढ होऊ शकते. केंद्र, राज्य सरकारकडून अशा संशोधनाला प्रोत्साहन दिले जात नाही. उलट त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांचे हितसंबंध तेथे आडवे येत असावेत. देशी बियाणांचा वापर करून भाताचे दुप्पट उत्पादन तेही कमी खर्चात घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. संकरित वाणाचे धान्य असो की भाजीपाला, फळे त्यांच्यासाठी वारंवार फवारणी व खताच्या मात्रा देण्याची आवश्यकता असते. यामुळे एक तर उत्पापदखर्च वाढतो शिवाय विषारी अन्न खाण्याची वेळ लोकांवर येते. अलीकडच्या काळात वाढलेल्या मधुमेह, कर्करोग अशा दुर्धर आजाराचे मूळ विषारी अन्नात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे विषारी अन्न खाण्याची वेळ आपल्या कुटुंबातील व्यक्ती व समाजावर येऊ नये म्हणून राहीबाई भांगरे या आदिवासी महिलेने देशी वाणांचे जतन व प्रसार करण्याचा वसा घेतला आहे. संकरित वाणांविषयी हे बरेच काही सांगून जाते. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत टिकाव धरण्याच्या देशी वाणाच्या अंगभूत गुणांमुळे फवारणी व रासायनिक खताची त्यांना गरज भासत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चात घट होते, शिवाय लोकांना विषमुक्त अन्न खावयास मिळते.

सध्या कोरोना महामारीपुढे जगातील सर्वच देश हतबल झाले आहेत. महामारीच्या दुस-या लाटेत ही स्थिती आहे. तशात तज्ज्ञांकडून तिस-या व चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली जाऊ लागल्याने सर्वांचेच धाबे दणाणलेले आहे. आरोग्य सेवेचा विस्तार, तिच्यातील गुणात्मक सुधारणा व लसीकरणाद्वारे सरकार महामारीला आवर घालण्याचा आपल्या परीने प्रयत्न करतेच आहे परंतु या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड असणे तेवढेच आवश्यक आहे. गेल्या काही काळात लोकांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. आहारातील बेकरी उत्पादने, फास्ट फुड, तळीव पदार्थांचे प्रमाण वाढले आहे.

कनिष्ठ दर्जाचा आहार, त्यात शारीरिक श्रमाचा अभाव यामुळे रोगप्रतिकारशक्ती क्षीण झाल्यामुळे कोरोनासारख्या आजाराने महामारीचे स्वरूप धारण केले आहे. लोकांमधील घबराटीला नामी संधी समजून खासगी कंपन्यांनी आपली रोगप्रतिकार शक्तिवर्धक उत्पादने बाजारात आणली आहेत. ती जाहिरातीत दिलेल्या आश्वासनांना कितपत जागतात, हे सांगणे कठीण आहे. कंपन्यांच्या आश्वासनाच्या मृगजळामागे धावण्यापेक्षा आहारात देशी वाणाच्या ज्वारी, बाजरी, नाचणी, हुलगे, भाजीपाला, फळे, अंडी आदींचा समावेश करून त्याला व्यायामाची जोड दिल्यास नागरिकांना आपल्या रोगप्रतिकार शक्तीत हमखासपणे वाढ करता येणे शक्य आहे. स्थानिक धान्ये, भाजीपाला, फळांना आहारात पुरेसे स्थान न दिल्यामुळेच अनारोग्याचे प्रश्न निर्माण झाले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. संवर्धन हा आपल्याकडील पारंपरिक शेती पद्धतीचा प्राण होता. बियाणे असो की पशुधन सर्वांचे जाणीवपूर्वक संवर्धन केले जात असे.

हरितक्रांतीने ही पद्धती मोडीत काढली आहे आणि तिच्याजागी ‘वापरा आणि फेकून द्या’ ही भांडवलशाहीला पूरक संस्कृती रुजवली आहे. अशा व्यवस्थेत शेतक-याला बरे दिवस येणे तसे दुरापास्तच आहे. देशी वाणांचे महत्त्व ओळखून काही व्यक्ती आणि संस्था त्यांचे जतन व संवर्धनाच्या कार्यात मोलाचे योगदान देत आहेत. विख्यात गांधीवादी मगन संग्रहालय, ‘बायफ’ या संस्था आणि राहीबाई भांगरे, विमलाबाई उतळे या महिला हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून करताहेत. त्यांनी आपल्या बियाणे बँका स्थापन केल्या आहेत. ज्यातून शेतक-यांना देशी बियाणे उपलब्ध करून दिली जातात.

आंब्याचा गोडवा, भाज्यांची चव याही पलीकडे काही महत्त्वाचे मुद्दे यात गुंतलेले आहेत. संकरित वाणांच्या वाढत्या वापराबरोबर देशी वाणांचा लय होण्याबरोबर जैविक वैविध्याचा -हास होतोय ही खरी चिंतेची बाब आहे. नवीन कृषी कायदे अमलात आल्यानंतर उरलेसुरले जैविक वैविध्यही संपण्याचा धोका आहे. वैविध्य ही स्वातंत्र्याची अभिव्यक्ती आहे, ते स्वातंत्र्याचे एक प्रतीक आहे. वैविध्य मग ते राजकीय, सामाजिक, भाषिक असो की सांस्कृतिक ते हरवणे म्हणजे स्वातंत्र्य हरवणे होय. काही शक्ती आपल्याकडील हे वैविध्य संपवण्यासाठी कटिबद्ध आहेत. तसे पाहता ही नववसाहतवादाची नांदीच होय. ईस्ट इंडिया कंपनीबरोबर वसाहतवाद संपला असे समजणे, हा भ्रम आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या, प्रगत देश यांना त्या प्रकारे भारतासारख्या मागासलेल्या देशाला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. संकरित वाणाच्या माध्यमातून भारताला आपल्या अंकित करणे हा त्या व्यूहरचनेचा भाग असू शकतो. त्यामुळे किमान स्वातंत्र्य जपण्यासाठी तरी का होईना वैविध्याचे जतन करणे आवश्यक आहे.

प्रा. सुभाष बागल
मो. ९४२१६ ५२५०५

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या