25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeविशेषअर्थव्यवस्था आणि संसर्ग

अर्थव्यवस्था आणि संसर्ग

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार किमान ७० ते ८० लाख लोकांनी रोजगार गमावला आहे. परंतु काहींच्या म्हणण्यानुसार, रोजगार गमावणा-यांचा आकडा याच्या दसपट आहे. गावागावांतून ज्या बातम्या येत आहेत, त्या भयावह आहेत. या परिस्थितीचा परिणाम शेतीवरही होईल. सरकारला गावागावांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी काम करावे लागेल. लोकांची अगतिकता, निराशा दूर करावी लागेल. लष्कराच्या मदतीने संसर्ग तातडीने रोखला पाहिजे, तरच अर्थव्यवस्था उभारी घेऊ शकेल.

एकमत ऑनलाईन

कोरोनाची जी दुसरी लाट आली आहे ती अत्यंत घातक ठरत असून, तिचा अर्थव्यवस्थेवर मोठा दुष्परिणाम होणार आहे, हे आता सरकारनेही ओळखले आहे. संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही; परंतु असंघटित क्षेत्रातील कंपन्यांवर बराच प्रतिकूल परिणाम झाला आहे. ऑटोमोबाईल तसेच अन्य काही क्षेत्रांमधील अनेक छोट्या कंपन्यांनी आपले काम बंद केले आहे. परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसत आहे; परंतु असंघटित क्षेत्रावर तो अधिक आहे आणि त्यामुळे स्थलांतरही दिसत आहे. सर्वप्रथम, जे पॅकेज रिझर्व्ह बँकेने दिले ते सरकारने दिले असे मानता येणार नाही. सरकार वेगळे आणि रिझर्व्ह बँक वेगळी. भारतीय रिझर्व्ह बँक कर्जाच्या आघाडीवर प्रयत्न करीत असून, असंघटित क्षेत्राला व्यवसाय सुरूच ठेवण्यासाठी पैसा मिळावा आणि असंघटित क्षेत्रातील कंपन्यांची स्थिती आणखी बिघडू नये असा बँकेचा प्रयत्न आहे. जे छोटे व्यावसायिक असतात, त्यांच्याकडे भांडवल अत्यल्प असते आणि ते लवकर संपुष्टात येते. जेव्हा अशा कंपन्यांमध्ये काम बंद होते, तेव्हा खर्च वसूल करणेही अवघड होऊन बसते. अशा कंपन्या बंद पडल्यास पुन्हा सुरू करणेही अवघड असते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना पॅकेज देण्यात आले आहे, जेणेकरून ते बँकांकडून कर्ज घेऊ शकतील.

परंतु त्यामुळे परिस्थिती सुधारणार नाही. आता तर आणखी छोटे व्यवसाय बंद होत आहेत. जोपर्यंत संसर्ग कमी होत नाही, तोपर्यंत या कंपन्या सुरू होणार नाहीत. हे पॅकेज बंद होत असलेल्या कंपन्यांना सावरण्यासाठी आहे. परंतु यामुळे अर्थव्यवस्थेतही सुधारणा होणार नाही. आपण लॉकडाऊनच्या दिशेनेच चाललो आहोत. आता अर्थव्यवस्थेच्या अन्य क्षेत्रांवरही त्याचा परिणाम दिसेल. सध्याच्या काळात पुरवठा साखळी पुन्हा एकदा तुटत आहे. अजूनही पूर्ण लॉकडाऊन लावलेला नसताना ही परिस्थिती आहे. काही विशिष्ट निर्बंधच तेवढे लावले जात आहेत. परंतु त्यामुळेही पुरवठ्यात समस्या येऊ लागली आहे. जागोजागी उत्पादनांची उपलब्धता होईनाशी झाली आहे आणि त्यामुळे उत्पादकांना उत्पादन बंद करावे लागत आहे. रिझर्व्ह बँकेची भूमिका अद्याप मर्यादित आहे. व्यवसायांचे लॉकडाऊनमुळे नुकसान होऊ नये, असा बँकेचा प्रयत्न आहे. या ठिकाणी दोन प्रकारे दिलासा दिला जाऊ शकतो. एक म्हणजे यापुढे काम सुरू ठेवण्यासाठी कर्ज उपलब्ध होणे किंवा पूर्वीच्या कर्जाची वसुली बँकांकडून न होणे. परंतु यामुळे अर्थव्यवस्थेत तातडीने मागणी वाढणार नाही आणि पुरवठा साखळीतही विशेष सुधारणा घडून येणार नाही.

अशा स्थितीत आपले धोरण काय असायला हवे? ज्या देशांमध्ये सरकारांनी कडक लॉकडाऊन लावले होते त्या देशांमधील परिस्थिती वेगाने पूर्ववत होत आहे, हे आपण पाहतो आहोत. उदाहरणार्थ चीनने पहिल्याच टप्प्यात सर्व गोष्टी सावरल्या तर ब्रिटनने एक आठवडा विलंब केला तरी ब्रिटनचे बरेच नुकसान झाले. लॉकडाऊन लावण्यात जिथे-जिथे विलंब होत आहे तिथे-तिथे दुसरी लाट दीर्घकाळ सुरू राहत आहे आणि जिथे लॉकडाऊन लवकर जाहीर केला जात आहे, तिथे दुसरी लाट लवकर आटोक्यात येत आहे. संसर्ग लवकर रोखला गेला तरच आपण अर्थव्यवस्था लवकर सावरू शकतो. त्यामुळेच आपण लॉकडाऊन जाहीर करायला हवा, असे तज्ज्ञ मार्चपासून सांगत आहेत. असे झाले असते तर संसर्ग वाढला नसता. लोक एकमेकांना भेटतात म्हणूनच संसर्ग वाढतो. जेव्हा लॉकडाऊन लावला जातो, तेव्हा दोन आठवड्यांनंतर संसर्ग कमी होऊ लागतो. आपल्याकडे फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट सुरू झाली होती. आता त्याला तीन महिने होतील. लॉकडाऊन न लावल्याचा परिणाम असा आहे की, आपल्याकडे आता रुग्णसंख्या नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे आणि मोठ्या संख्येने लोकांना प्राणालाही मुकावे लागत आहे. आपण अजूनही लॉकडाऊन लावलेला नाही, त्यामुळे संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. एक अडचण अशी की, आकडेवारी पूर्णपणे मिळत नाही किंवा उपलब्ध करून दिली जात नाही.

कॉंग्रेस नगरसेवकाची रुग्णालयातील कर्मचा-यांवर दबंगगिरी; नांदेड येथील घटना

आजमितीस आरोग्य व्यवस्थेत ब-याच सुधारणा केल्या जाण्याची गरज आहे. त्यासाठीही रिझर्व्ह बँकेने एक पॅकेज दिले आहे. वैद्यकीय यंत्रणा विकसित करण्यासाठी विशेष कर्जाची गरज भासेल. या विशेष पॅकेजच्या माध्यमातून ती पूर्ण करता येईल. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची वैद्यकीय यंत्रणा उभारण्यास वेळ लागतो. त्यासाठी लष्कराला पाचारण केले पाहिजे. लष्कराची रुग्णालयेही असतात आणि परिवहनाची साधनेही असतात. लष्कर जर मैदानात उतरले तर आपल्याला दिलासा मिळू शकतो. आपल्याला तत्काळ मदतीची गरज आहे. आता परदेशातून बरीच मदत येत आहे. एखादा देश औषधे देत आहे तर अन्य एखादा देश ऑक्सिजनचे टँकर पाठवत आहे. येणारी मदत आपण वाढवली पाहिजे. आरोग्याच्या क्षेत्रात आयात वाढविण्यासाठी आपण आपले प्रयत्नही वाढविले पाहिजेत. रिझर्व्ह बँकेने घोषित केलेले पॅकेज चांगले आहे. परंतु त्याचा तत्काळ लाभ होणार नाही. लष्कराचे आगमन आणि आयात वाढविणे या दोन गोष्टी झाल्या तर फायदा होईल.

अद्यापही देशात संपूर्ण लॉकडाऊन लावलेला नाही. संसर्ग गावागावांत पोहोचला आहे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था चांगल्या अवस्थेत नाही. तेथे तर चाचण्याही व्यवस्थित होऊ शकत नाहीत. गावागावापर्यंत आरोग्य यंत्रणेचा विस्तार करणे हेसुद्धा आपल्यासमोरील काही छोटे आव्हान नव्हे. सध्या सर्वाधिक गरज आहे ती संसर्ग तत्काळ रोखण्याची. अशा स्थितीत लसीकरणाचाही फारसा लाभ होणार नाही. आतापर्यंत केवळ नऊ टक्के लोकांनाच लस देण्यात आली आहे. आपल्याकडे लसींचे उत्पादनही कमी प्रमाणात होत आहे, कारण उत्पादन वाढविण्यासाठी आपल्याकडे सामग्री कमी आहे. आपण सध्या दरमहा पंधरा कोटी लोकांना लस देण्याच्याही स्थितीत नाही आहोत. यावर्षीही आपल्यासमोर गंभीर धोका आहे. आता सरकारने पुढे येऊन ज्या-ज्या ठिकाणी काम थांबले आहे, बेरोजगारी वाढली आहे, त्या-त्या ठिकाणी मदत केली पाहिजे.

गरीब लोकांना सध्या मदतीची नितांत गरज आहे. मोफत अन्नधान्य आणि उपचार यांची गरज आहे. गरीब लोक गेल्या वर्षी खूप मोठ्या संकटात लोटले गेले होते. तशा प्रकारचे संकट जर पुन्हा आले तर खूपच अडचणी निर्माण होतील. सध्या लोक संसर्गाने हैराण आहेत आणि जेव्हा खाण्या-पिण्यास काही मिळणार नाही, तेव्हा लोकांच्या अडचणी आणखी वाढतील. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार किमान ७० ते ८० लाख लोकांनी रोजगार गमावला आहे. परंतु काहींच्या म्हणण्यानुसार, रोजगार गमावणा-यांचा आकडा याच्या दसपट आहे. गावागावांतून ज्या बातम्या येत आहेत, त्या भयावह आहेत. या परिस्थितीचा परिणाम शेतीवरही होईल. सरकारला गावागावांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी काम करावे लागेल. लोकांची अगतिकता, निराशा दूर करावी लागेल. त्यासाठीची पावलेही सरकारलाच उचलावी लागतील. रिझर्व्ह बँकेचे निर्णय काही काळापर्यंत फलदायी ठरतील. परंतु बाकीची सर्व जबाबदारी सरकारलाच पार पाडावी लागणार आहे.

अरुण कुमार
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या