22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeविशेषतारे-तारकांचे इंग्रजीप्रेम

तारे-तारकांचे इंग्रजीप्रेम

एकमत ऑनलाईन

बहुचर्चित गायिका सोना महापात्राने दक्षिण आणि हिंदी चित्रपटांदरम्यान सुरू असलेल्या भाषिक वादावर बोलताना म्हटले होते की, हिंदी चित्रपट उद्योगात अनेक वर्षे असूनही बॉलिवूडचे असंख्य कलाकार हिंदी भाषेत पारंगत नसणे ही लाजीरवाणी बाब आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीकडून दक्षिणेची परंपरा जोपासली जात असताना हिंदी चित्रपटातील नायक-नायिका या हिंदीही धड बोलू शकत नाहीत किंवा त्यांना हिंदी बोलताना बराच त्रास होतो. सोना यांच्या वक्तव्याने बॉलिवूड कलाकारांची हिंदी भाषेबाबतची अनास्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यात हिंदी चित्रपटांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. परंतु हिंदी चित्रपटांत काम करणा-या कलाकारांची व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात वावरताना हिंदी भाषेबाबतची असणारी उदासिनता ही धक्कादायक आहे आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न देखील उपस्थित करणारी आहे. हिंदी चित्रपटांत बक्कळ पैसा कमावणारे आणि लोकप्रियता मिळवणारे कलाकार पडद्याबाहेर येताच हिंदीपासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांची हिंदी केवळ कॅमे-यापुरतीच मर्यादित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. हिंदी चित्रपटांत कलाकार मोठमोठे डायलॉग बोलून प्रेक्षकांची वाहवा मिळवतात, टाळ्या मिळवतात. आपल्याभोवती वलय निर्माण करतात. पण पडद्याबाहेरची त्यांची हिंदीबाबतची अनास्था पाहता केवळ व्यावसायिक कारणापुरतेच हिंदी भाषेला महत्त्व आहे का? असा प्रश्न पडतो. सध्याचे बॉलिवूडचे वातावरण पाहता मग निर्माता असो, दिग्दर्शक असो किंवा नायक-नायिका असोत, त्यांच्यासाठी हिंदी भाषा ही केवळ व्यावसायिक अनिवार्यता असल्याचे वाटू लागते. व्यावसायिक कारणांमुळेच ते पडद्यावर हिंदी बोलतात आणि ते पडद्याबाहेर येताच इंग्रजी भाषेवरचे प्रेम दिसू लागते. एकदा का चित्रपट तयार झाला, की त्यांचा सर्व प्रचार, प्रसार हा इंग्रजी भाषेतूनच होतो. हिंदी चित्रपटांचे टीझर असो, ट्रेलर असो त्याचे प्रदर्शन करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत इंग्रजी भाषेचाच भडिमार केला जातो.

सर्व चर्चा, प्रश्नोत्तरे ही इंग्रजीतूनच होतात. काही अपवाद वगळता बहुतांश नवीन-जुन्या कलाकारांची अशीच कमी-जास्त स्थिती आहे. अर्थात बॉलिवूडच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हिंदीला चांगले स्थान मिळते. परंतु ते स्थान हिंदीप्रेमापोटीच मिळते, असे नाही. ते व्यावसायिक हेतूने हिंदीतून कार्यक्रमांचे संचालन करतात. त्याचवेळी पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रसारण हे हिंदी भाषेतून होते आणि त्याचा मोठा प्रेक्षकवर्ग हा हिंदीभाषिक असल्याने या कार्यक्रमात हिंदी भाषेवर भर दिला जातो. अर्थात अशा कार्यक्रमात वापरली जाणारी हिंदी ही इंग्रजाळलेली असते. याशिवाय बॉलिवूड कलाकारांच्या सोशल मीडियावरच्या खात्यावर नजर टाकली तर तेथे देखील इंग्रजीचेच वर्चस्व दिसून येते. अमिताभ बच्चन, आशुतोष राणा यासारखी काही मंडळी अपवाद आहे. ही मंडळी इंग्रजीबरोबरच हिंदीतही ट्विट, मत मांडत असतात. इंग्रजी भाषेत मत मांडणा-या कलाकारांची संख्या अगणित आहे. तसेच बॉलिवूड कलाकारांचे आत्मचरित्र असो, त्यांच्या वाटचालीवरचे शब्दांकन असो, वर्तमानपत्रातील कॉलम असो, ब्लॉग असो या सर्व गोष्टी इंग्रजी भाषेतूनच पाहावयास मिळतात. कालांतराने त्याचा हिंदीत अनुवाद होतो,

परंतु त्याचे प्रमाण कमीच राहिलेले आहे. उदाहरणार्थ करण जोहर याचे आत्मचरित्र ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ हे पुस्तक इंग्रजी आहे. त्यानंतर ते हिंदीत अनुवादित करण्यात आले आणि ‘एक अनोखा लडका’ या नावाने समोर आले. दिलीपकुमार यांचे आत्मचरित्र ‘द सब्सटेन्स अँड द शॅडो’ हे पुस्तक २०१४ मध्ये इंग्रजीत प्रकाशित झाले. त्याचे हिंदीत रुपांतर करण्यात आले आणि २०१७ मध्ये ‘वजूद और पहचान’ नावाने लोकांसमोर आले. ऋषी कपूर यांचे आत्मचरित्र ‘खुल्लम खुल्ला’ देखील इंग्रजीत आले होते. त्यानंतर वर्षभरात त्याची हिंदी आवृत्ती बाजारात आली. आत्मचरित्राबरोबरच अन्य प्रकारचे लेखन देखील बॉलिवूडचे कलाकार इंग्रजीतच करतात. अभिनेत्रीकडून लेखिका झालेली ट्विंकल खन्नाची सर्व पुस्तके इंग्रजीतच आहेत. अमिताभ बच्चनची कन्या श्वेता नंदाने देखील काही दिवसांपूर्वी पहिली कादंबरी ‘पॅराडाईज टॉवर्स’च्या माध्यमातून लेखन क्षेत्रात प्रवेश केला. ही कादंबरी इंग्रजीतच आहे. श्वेता ही बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही, परंतु तिच्या वडिलांचे हिंदी प्रेम पाहता तिच्याकडून काही प्रमाणात अपेक्षा बाळगल्या गेल्या होत्या. पण त्या फोल ठरल्या. अर्थात काही जण अपवाद आहेत. आशुतोष राणा हा सोशल मीडियावर आग्रहाने हिंदीतूनच भाष्य करत असतो. त्याने आपले पुस्तक ‘मौन मुस्कान की मार’ (व्यंग्य संग्रह) आणि ‘रामराज्य’ हे हिंदीतच आणले आहे. एकुणातच ही उदाहरणे पाहिली तर बॉलिवूडमध्ये इंग्रजी भाषेचा असणारा बोलबाला आपल्या लक्षात येईल.

बॉलिवूड तारकांचे इंग्रजी प्रेम असण्यामागे अनेक तर्क सांगितले जातात. इंग्रजी बोलून कलाकार मंडळी हे आपला प्रेक्षकवर्ग केवळ भारतीय उपखंडापुरतीच मर्यादित न ठेवता युरोप-अमेरिकेसह अन्य देशांत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, असा दावा केला जातो. मग प्रश्न उपस्थित होतो की, त्यांना आपले वलय जगभरात वाढवायचे असेल तर हिंदीऐवजी इंग्रजीतूनच चित्रपट का काढत नाहीत. कलाकारांच्या बाजूने मांडलेला तर्क पटण्यासारखा नाही. म्हणजे एकीकडे चित्रपट हिंदीत काढणार, या माध्यमातून देशातील बहुसंख्याक हिंदी भाषिक जनतेच्या माध्यमातून पैसा मिळवणार आणि कौतुकही मिळवणार, पण जेव्हा हिंदी भाषेचा स्वीकार करण्याची वेळ येते तेव्हा इंग्रजी भाषेच्या मदतीने सातासमुद्रापार जाणार, ही बाब जरा विचित्रच वाटते. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि त्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. त्याची व्यापकता अधिक आहे, परंतु आपल्या कलाकारांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे इंग्रजी भाषा कितीही मोठी असली तरी हिंदीचे महत्त्व त्यापेक्षा अधिक आहे. कलाकारांचे अस्तित्व मुळातच हिंदी भाषेवर टिकलेले आहे. हिंदी कलाकारांना नाव, प्रसिद्धी, पैसा मिळतो तो हिंदी भाषेमुळे, इंग्रजीमुळे नाही. परंतु याचा सोयिस्कररीत्या विसर पडताना दिसतो. त्यामुळे हिंदीचे महत्त्व ओळखून सार्वजनिक जीवनात वावरताना, खासगी पातळीवर देखील हिंदीचाच वापर करण्याबाबत गंभीर राहणे गरजेचे आहे. शक्य होईल तेवढे व्यवहार हिंदीतूनच करायला हवेत.

हिंदी चांगले बोलता येत नाही किंवा हिंदीत बोलताना अडखळत असल्याने आम्हाला इंग्रजीशिवाय पर्यायच राहत नाही, ही सबब इथे चालणार नाही. हिंदी चांगली येत नसेल तर ती आवश्यक असल्याचे गृहित धरून तसेच केवळ हिंदी चित्रपटांची गरज भागविण्यासाठी नाही तर एक भाषा म्हणून त्याचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. कोणत्याही भाषेचा विस्तार आणि विकास हा त्याच्या लिहण्यातून व बोलण्यातून होतो. इंग्रजीच्या जागतिक मान्यतेची बॉलिवूडला भुरळ पडली आहे. यामागचे कारण म्हणजे इंग्रजीभाषिक लोकांनी इंग्रजीला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे की,त्याशिवाय जगाला पर्यायच राहिलेला नाही. हिंदीत बाबू देवकीनंदन खत्री यांचे उदाहरण कालातित आहे. त्यांनी हिंदीत असे काही लिखाण केले की त्यांचे वाचन करण्यासाठी लाखो लोक हिंदीत शिकण्यासाठी प्रवृत्त झाले.

-सोनम परब

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या