लातूर ही साहित्यनिर्मितीसाठी सुपिक भूमी आहे. येथे साहित्याचे कसदार पीक जसे फोफावते, तसे त्याचे मूल्य बाजारात टिकून राहते. उषा भोसले हे या कसदार भूमीतील वलयांकित नाव. त्यांचा ‘सासू सून मनांची – गुंफण’ हा ललित लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. फुले वेचिता, शब्दगंध, संवेदना कोरोना काळातील या तीन कवितासंग्रहांच्या यशस्वी प्रवासानंतर संस्कार प्रकाशन, लातूर यांनी २७ ललितलेखांचा संग्रह प्रसिद्ध केला. ललित लेखनाला कोणताही विषय वर्ज्य नसतो. प्रस्तुत संग्रहात सासू आणि सून यांच्या नात्याची गुंफण अतिशय तरलपणे केली आहे. बदलत्या कुटुंब संस्कृतीप्रदूषणामुळे आजची समाजव्यवस्था दूषित होत चालली आहे.
त्यामुळे मानवी मूल्यांवरची तिची पकड ढिली होत असताना हा लेखसंग्रह आपल्या हाती यावा ही जमेची बाजू आहे. एकूण लेखांमधून झालेली सकारात्मक मांडणी या नात्याची वीण घट्ट करणारी आहे. उषा भोसले यांनी स्वत:च्या अनुभवातील ‘मी’पासूनचा सुरू झालेला प्रवास ‘आम्ही’पर्यंत कसा पोहोचला तो शब्दबद्ध केला आहे. ‘उंबरठ्याचा गुण ! सासू तशी सून!’ महाराष्ट्रीय सासूला सून म्हणजे आपल्या हातातले भावले वाटत आले आहे परंतु या पुस्तकातून हे नातं खूप तोलामोलाचं आणि मनापासून जपण्याचं आहे, त्यासाठी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे हे निक्षून सांगितले आहे. मात्र त्यासाठी ‘क्षमस्व’ हा शब्द येथे अधोरेखित झाला आहे. ‘तू-तू मै- मै’ करून आपल्या कुटुंबाची राखरांगोळी करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी काळजीपूर्वक हाताळण्याचा सल्ला लेखिकेने दिला आहे. स्वत:चा अहंकार बाजूला ठेवून समजून घेणे कसे योग्य आहे हे पटविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
‘गुंफण’ या लेखसंग्रहाची पाठराखण करताना डॉ. जनार्दन वाघमारे म्हणतात, ‘या नाजूक विषयावरचे मराठीतील हे एकमेव पुस्तक असावे’ याप्रमाणे यातील सगळे विषय लेखिकेने कुशलतेने हाताळले आहेत. तिला विविध भूमिका घ्याव्या लागतात. हे करत असताना आपले कुटुंब दुभागणार नाही याची काळजी त्या पावलोपावली घेतात. आजच्या सुनांना शिकलेली, सुधारलेली म्हणून बहुमान दिला जातो पण बहुमान देणारी ही केरासमान आहेत असे न करता नेहमी सगळ्या गोष्टी कालबा नसतात व पैशातून मोजता येत नसतात. वडीलधा-यांची माया समजून घेतली पाहिजे या संस्कारावरच कुटुंब उभें असते. हे वैचारिक तत्त्वज्ञान जवळपास सगळ्याच लेखांतून ओसंडून वाहताना दिसते. हे सूत्र पकडून डॉ. जयद्रथ जाधव यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमुळे या लेखसंग्रहाची वैचारिक उंची वाढली आहे तर सम्राट भोसले यांनी बोलके मुखपृष्ठ रेखाटल्यामुळे वाचकांचे लक्ष संग्रहाकडे वेधले जात आहे.
सासू आणि सून या नात्याविषयीची कृतज्ञताच येथे व्यक्त झाली आहे. लेखिकेने या नात्याचा सन्मान वाढविणारी निर्मिती करताना भेदक, टोकदार शब्दांचा कुठेच वापर केला नाही. उलट या नात्यातील जिव्हाळ्याच्या, आपुलकीच्या भावनेतून सजगपणे प्रत्येक प्रसंग पटवून सांगितला आहे. मुळात त्यांना हा विषय चिंतनाच्या निकोप पातळीवर मांडावयाचा आहे. त्याचा वर्तमानातील वातावरणाशी भिडून भूतकाळाचे दृश् मांडण्याचा प्रयत्न आहे. समाजाची संवेदनशीलता मनाच्या मुशीतून तटस्थपणे चित्रित करताना शब्दांना दिलेली मोकळी वाट हे या अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. अशा लेखनातून प्रबोधनाची वाट सुकर होत जाते.
-प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे
लातूर, मोबा.८३०८३०५०५०