21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeविशेषपर्यावरण : काल, आज आणि उद्या

पर्यावरण : काल, आज आणि उद्या

एकमत ऑनलाईन

आज देशापुढे मूलभूत प्रश्नांमध्ये दारिद्र्य, विषमता, बेरोजगारी, दहशतवाद, निरक्षरता, वाढती लोकसंख्या या सर्वांबरोबरच ‘पर्यावरणाचा -हास’ या समस्येचा उगम गेल्या काही दशकांत प्रामुख्याने झाला आहे. त्यामुळे बरीच पर्यावरणवादी मंडळी चिंतित झालेली आहेत. तरीसुद्धा सामान्य जनतेत याबाबत गांभीर्य निर्माण झाले नाही. चिपको आंदोलनाचे प्रणेते स्व. सुंदरलाल बहुगुणा म्हणतात, ‘हमने कुछ पाया है, लेकिन बहुत कुछ खोया’ त्यांनी व्यक्त केलेली खंत खूप बोलकी आहे. म्हणूनच पर्यावरण हा विषय प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठापर्यंत सक्तीचा अभ्यास विषय झाला आहे.

आपल्या सभोवती हवा, पाणी, वनस्पती, प्राणी, जमीन, सूर्यप्रकाश अशा विविध गोष्टी आहेत. या सर्व घटकांचा प्रत्येक सजीव आणि निर्जिवांवर निश्चितपणे परिणाम होतो. मानवाच्या सभोवतालची परिस्थिती हा पर्यावरणाचा सामान्य अर्थ झाला. परंतु शास्त्रीयदृष्ट्या सजीवांच्या वसतिस्थानाभोवती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या परिणाम करणा-या घटकांचे भूजैविक दृश्य म्हणजे पर्यावरण. आपल्या पूर्वजांनासुद्धा वृक्षांचे, वनाचे महत्त्व समजले होते म्हणून त्यांनी प्रत्येक सणामध्ये वृक्षांचे महत्त्व समजून हेतुपुरस्सर वृक्षांचा महिमा वर्णन केला आहे. त्यानिमित्ताने पूजन सांगितले आहे.

निसर्गाच्या औदार्याचे तत्त्वज्ञान अगदी सोप्या शब्दांत प्रकट करणा-या कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्रामीण रचनेतून म्हणतात-
‘उभे शेतामंदी पीक, ऊनवारा खात खात.,
तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात’
संतांनीच वृक्षांबद्दल माहिती सांगितली असे नाही तर इतिहासकालीन दाखल्यांमध्येही शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यास केलेल्या आज्ञापत्रात त्यांचे वृक्षांबद्दल अगाध प्रेम दिसून येते. ‘चिपको आंदोलन’ म्हणजे वृक्षांसाठी दिलेल्या प्राणांचे बलिदान होय. सर्वांत मुबलक प्रमाणात मानवाचे कल्याण करणा-या या वृक्षांबद्दल, या नैसर्गिक साधनसंपत्तीबद्दल आपल्याला सर्वांत कमी माहिती आहे असे सार्थ उद्गार माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी काढले होते.

माणसाचे जीवन ख-या अर्थाने सुखी-समाधानी व्हावे याकरिता सुंदर व निकोप अशा पर्यावरणाची अत्यंत गरज असल्याचे सर्वजण मान्य करतात. परंतु निसर्गाच्या सजीव सृष्टीतील शेंडेफळ म्हणजे मानव. मानवाला प्राप्त झालेल्या बुद्धीच्या सहाय्याने, बुद्धीच्या गैरवापरामुळे, मानवाच्या उपभोगी वृत्तीमुळे त्याने आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणावर आक्रमण करून प्रदूषणासारखी समस्या निर्माण केली आहे. वृक्षांची अनिर्बंध तोड हेच पर्यावरण -हासाचे मुख्य कारण आहे. जगामधील एकूण वनराईच्या ५ टक्के क्षेत्र भारतात आहे आणि भारताची लोकसंख्या जगाच्या २० टक्के आहे. यावरून जंगलतोड मोठ्या प्रमाणावर का होते हे सहज लक्षात येते. असे म्हणतात की, ‘दिवाळखोर पर्यावरणातून दिवाळखोर राष्ट्र निर्माण होते.’ खरोखरच चिंतन करायला लावणारे हे विधान आहे.

युनोतर्फे अलीकडेच केलेल्या एका पाहणीत पृथ्वीवरील एक तृतीयांश जमीन वाळवंटाच्या छायेत आली आहे. दरवर्षी ६५.००० चौ.कि.मी. जंगल साफ होत आहे. प्रत्येक व्यक्तीला ऑक्सिजन अ‍ॅमेझॉनच्या जंगलातून मिळतो. जर अ‍ॅमेझॉन नष्ट झाले तर…? मानवाचा आत्माच नष्ट होईल.दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात आहे. दुष्काळ पाचवीला पुजला आहे. पुरामुळे धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. एक इंच माती तयार होण्यास १००० वर्षे लागतात. जंगले भयानक वेगाने तोडून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या कर्तव्याचे भान कुणाला राहिले नाही.

जपानसारख्या लहान देशात जंगलांचे प्रमाण ६८ टक्के आहे. तर फ्रान्समध्ये प्रत्येक शेतक-याला जमिनीच्या १५ टक्के क्षेत्रावर वृक्षलागवड करणे सक्तीचे आहे. आपला देश धार्मिक वृत्ती जोपासणारा पवित्र संगम, तीर्थक्षेत्रावरील धार्मिक विधी, अनेक नद्यांचे प्रदूषित पाणी, कारखान्यातील सांडपाणी, मैला, कुंभमेळा, ग्रहणे, अधिक मास, या काळात होणारे पवित्र क्षेत्री स्नान, निर्माल्य पाणी प्रदूषित करतात व साथीचे रोग-कावीळ, टायफॉईड कॉलरा याचा प्रसार करतात. गणेशमूर्ती व त्यांचे निर्माल्य नदी, तलावात विसर्जित करतात त्यामुळे त्वचारोगापासून ते कॅन्सरपर्यंत व्याधी त्यातील विषारी रंगांमुळे उद्भवतात. मानवी श्रवणसंस्थेला ४० हर्टझ्पर्यंतचा ध्वनी योग्य आहे.

त्यापेक्षा (६० हर्टझ्)अधिक तीव्रतेचा ध्वनी, वाहने, हॉर्न, सायलेन्सरमधील दोष, दूरदर्शन, टेपरेकॉर्डर यांचा आवाज, यामुळे मानसिक अशांतता, एकाग्रता भंगणे, बहिरेपणा, डोकेदुखी, निद्रानाश, इ. विकार होत आहेत. वाहतूक पोलिसांच्या एका तपासणीत ८० टक्के पोलिस कर्णबधिर झाल्याचे आढळले आहे.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या आदेशानुसार, ‘बंदिस्त क्षेत्र वगळता कोणत्याही सार्वजनिक जागी रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वापरू नये’ परंतु या आदेशाचे पालन खरोखरच होते का? सर्वांच्या शांततेसाठी ध्ननिप्रदूषण कमीत कमी करून, कर्तव्याचे भान ठेवून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. भारतातील युनियन कार्बाईड येथील वायूगळतीचे दुष्परिणाम आजही सहन करावे लागत आहेत. महाराष्ट्रातील पुणे शहर प्रदूषणग्रस्त शहर म्हणून ओळखले जात आहे. ओझोनचा थर १ टक्क्याने कमी झाला तर अल्ट्रा व्हायोलेट किरणांचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढते. ओझोन कमी झाला तर त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढेल. उड2 सुद्धा सूर्यप्रकाशातील उष्णता शोधून हवेचे तापमान वाढवतो. त्यामुळे धु्रव प्रदेशातील बर्फाचे थर वितळत आहेत. आणखी ५० वर्षांनी पाण्याची पातळी ३ फुटांनी वाढली तर समुद्राकाठची मुंबई बुडायला वेळ लागणार नाही.

नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय वाढत आहे. भूगर्भातील पेट्रोल, डिझेल, खनिजतेल संपत आहे. या इंधनांना पर्याय शोधणे गरजेचे आहे. ऊर्जा ही मानवाची आवश्यक गरज आहे. ऊर्जासंकटामुळे लोडशेडिंग करावे लागत आहे. म्हणून ऊर्जा बचतीचे मार्ग अवलंबिले पाहिजेत. सौरऊर्जा वापरली पाहिजे. येणा-या भावी पिढीला प्रदूषणाच्या विळख्यातून, दुष्परिणामांतून वाचवायचे असेल तर आज पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने जलद गतीने पावले उचलली पाहिजेत नाही तर मानवाचे अस्तित्व डायनासोरसारखे व्हायला वेळ लागणार नाही. शुद्ध हवा व पाणी मिळणे हा माणसाचा, सृष्टीचा हक्क आहे. कर्तव्यपालन न केल्यामुळे आजची प्रदूषण स्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच….
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी प्रदूषण।
नाश होईल मानवाचे निरोगी जीवन।।
वृक्ष म्हणजे जीवन, करू या वृक्ष जतन।
करूया पर्यावरणाचे रक्षण, कर्तव्याचे करू सारण।।

-सौ. एम. एस. दुधारे
श्री. गो.लाक़.विद्यालय, लातूर
मोबा.: ७७०९६ ८७९९७

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या