कविता हा पी. विठ्ठल यांच्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी वर्तमान वास्तव आणि वाङ्मयीन, सांस्कृतिक व्यवहारावरही त्यांनी तितक्याच आस्थेने लेखन केलेले आहे. ‘आपण सतत सजग असले पाहिजे. समकालीन असले पाहिजे. सामाजिक स्थितिगतीचे आपले आकलन खुजे असेल तर आपल्या निर्मितीला तसा काही अर्थ उरत नाही.’ या भूमिकेतून पी. विठ्ठल यांनी सभोवतीचे वास्तव समजून घेत त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. अस्वस्थ वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर समाज, संस्कृती, साहित्य, साहित्यिक आणि साहित्य चळवळीविषयी पी.विठ्ठल यांनी केलेले चिंतन ‘विश्लेषण’ या लेखसंग्रहातून साकारले आहे. सहा भागांतील या लेखसंग्रहात तेवीस लेख आहेत. सदरील लेख विविध नियतकालिके, दिवाळी अंक, परिसंवाद, स्मरणिका, वर्तमानपत्रे, ग्रंथ प्रस्तावना, चर्चासत्रातील भाषणानिमित्त लिहिलेली आहेत.
बदलत्या गतिमान सामाजिक आणि राजकीय वास्तवाचा वेध ‘लेखकाचे राजकीय आणि सामाजिक भान’ या पहिल्याच लेखातून घेतला. नव्या पिढीतील कवी-लेखकांना वर्तमानाकडे गांभीर्याने पाहण्याची दृष्टी देणारा हा लेख आहे.
मूल्यवस्थेचा पंचनामा करून कटू सत्याचे दर्शन घडवणा-या कलावंतांच्या होणा-या सार्वत्रिक मुस्कटदाबीबद्दलचे चिंतन ‘लेखकाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक दबाव’ या लेखातून साकारले. ‘अभिरुचीचे स्वरूप व बदलते स्तर’ या लेखातून वाचकांची अभिरुची बदलण्यास कारणीभूत ठरणा-या विविध घटकांची विस्ताराने चर्चा करण्यात आली. ‘गांधी मला भेटला’ या लेखातून कलेच्या क्षेत्रात पोलिस आणि न्यायव्यवस्थेचा हस्तक्षेप हा कसा अनुचित ठरतो, ते पाहायला मिळते. ‘दलित साहित्यातील विद्रोह’मधून विद्रोहाची अपरिहार्यता स्पष्ट करण्याबरोबरच जातीय आणि धार्मिक अस्मिता उत्तरोत्तर अधिक टोकदार होत असल्याचे निरीक्षण नोंदवून त्याबद्दलची चिंता व्यक्त केली. वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, अण्णा भाऊ साठे यांनी प्रस्थापित केलेल्या मूल्यांच्या प्रासंगिकतेचा विचार या ग्रंथातील चार लेखांतून केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’या वर्तमानपत्रास इ.स.२०२० मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मूकनायकाचे समकालीन महत्त्व अधोरेखित केले.
आज लिहिणा-यांची संख्या प्रचंड वाढली तरी कसदार लेखनाचा अभावच असल्याचे निरीक्षण ‘निकोप आणि समाजाभिमुख लेखनाची गरज’ या लेखातून नोंदवली. आजच्या भोगवादी संस्कृतीने माणसाच्या संवेदनशीलतेला बधिर करून टाकल्याने साहित्याची समाजाभिमुखता कमी झाल्याचे वास्तव ‘समाजजीवनाची पृष्ठभूमी समजून घेता यायला हवी’ या लेखातून समोर येते. लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांचे विशेष समजून घेण्याच्या दृष्टीने ‘टिळकांचे अग्रलेख’ हा लेख महत्त्वाचा ठरतो. मातृहृदयी साने गुरुजींच्या साहित्यातील मूल्यनिष्ठेवर ‘साने गुरुजी यांच्या संदर्भात…’ लेखातून प्रकाश टाकला. ग. दि. माडगूळकरांच्या कथेचे विशेष समजून घेण्याच्या दृष्टीने या ग्रंथातील लेख उपयुक्त ठरतो. गो. वि. करंदीकरांनी अनुवादित केलेल्या नाटकांवरील समीक्षेची समीक्षा पी. विठ्ठल यांनी येथे केली. ‘तुकारामांची काठी’, ‘पेरुगन मरुगन’, ‘मराठे व इंग्रज’, ‘साहित्याचे ईहवादी सौंदर्यशास्त्र’, ‘बाई अमिबा आणि स्टील ग्लास’ या ग्रंथांचे निराळेपण पी. विठ्ठल यांनी नेमकेपणाने मांडले. मराठी साहित्यास लाभलेले चळवळींचे योगदान ‘मराठी वाङ्मयीन चळवळी’ या लेखातून स्पष्ट करण्यात आले. अनेकविध अस्मितांचे कोलाहल टोकदार होत असताना समाजात संवाद प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पुस्तकच उपयुक्त ठरणार असल्याचे ग्रंथाच्या शेवटी ‘पुस्तकांचे वाचन, भावनेची पुनर्बांधणी करतं’ या लेखात पी. विठ्ठल नमूद करतात.
‘विश्लेषण’ हा ग्रंथ वाचक, कवी, लेखक, समीक्षकांना साहित्य व्यवहाराबद्दल गांभीर्याने विचार करायला प्रवृत्त करतो. स्वत:च्या स्वतंत्र भूमिकेतून पी. विठ्ठल यांनी केलेले हे समतोल ‘विश्लेषण’ नवीन अभ्यासक, संशोधकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. वैचारिक मांडणीमुळे काही लेखांत बोजडता आल्याचे जाणवत असले तरी ते अपरिहार्यच आहे. प्रस्तुत लेखसंग्रहातून प्रकटलेली मूल्यनिष्ठा एकंदर मानवी जीवनाचा स्तर उंचावण्याच्या दृष्टीने निश्चितच पूरक ठरणारी ठरते.
ग्रंथ : विश्लेषण
लेखक : पी. विठ्ठल
प्रथमावृत्ती : ०२ एप्रिल २०२२
प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन, माटुंगा, मुंबई.
मूल्य : २५० रु. पृष्ठे : २०३.
-डॉ. रवींद्र बेम्बरे,
देगलूर, मोबा.९४२०८ १३१८५