22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeविशेषईटीएफ गुंतवणूक सुरक्षित

ईटीएफ गुंतवणूक सुरक्षित

एकमत ऑनलाईन

आजच्या काळात बँकेच्या ठेवीवरील व्याजदर सातत्याने घटत आहेत. त्यामुळे कमी जोखीम घेणा-या गुंतवणूकदाराची खरी पंचाईत झाली आहे. पूर्वीच्या काळात बँकेवरील ठेवीवर मिळणा-या व्याजावर जगणारा एक वर्ग निर्माण झाला होता. गेल्या काही कालावधीपासून असा वर्ग, ठेवीदार यांच्या गुंतवणुकीवरील मिळणा-या व्याजामध्ये सातत्याने घट होत आहे. कमी जोखीम घेऊन जास्त गुंतवणुकीवरील परतावा गुंतवणूकदारास पुरेसा मिळत नाही. गुंतवणूक बाजारातील जवळपास सर्वच योजना या बाजाराधिष्ठित झाल्याने अशा गुंतवणुकीचा पैसा हा शेअर बाजाराकडे वळत आहे. गुंतवणूकदाराचा पैसा हा शेअर बाजारातील विविध पर्यायांमध्ये गुंतविला जात आहे. जसे शेअर खरेदी, बाँड खरेदी, म्युच्युअल फंड, सट्टा बाजार अशा प्रकारच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक ही जोखीमयुक्त गुंतवणूक ठरत आहे.

ज्या गुंतवणूकदारांचा स्वभाव हा कमी जोखीम घेणारा आहे. अशा वर्गांना गुंतवणूक करीत असताना काहीसे मानसिक दडपण देखील आजच्या काळात येते. असा मध्यमवर्ग हा गुंतवणूक करीत असताना त्या गुंतवणुकीमध्ये तरलता अधिक, परतावा जास्त व अशी गुंतवणूक सुरक्षित हवी. अशाप्रकारचा पर्याय बाजारातील अनेक गुंतवणूक योजनांचा अभ्यास करीत असतो. कारण अशी गुंतवणूक ही दीर्घकालीन केली असेल तरच त्यामध्ये वृद्धी होते. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करीत असताना ‘ईटीएफ’ अर्थात ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ याकडे आकर्षित होत आहेत. मध्यमवर्गीयांना गुंतवणूक करीत असताना अशा प्रकारची अपेक्षा पूर्ण करणारा हा फंड योग्य ठरू शकेल. सामान्य गुंतवणूकदार हा गुंतवणूक करीत असताना सकारात्मक दृष्टिकोन घेऊन गुंतवणूक केल्यास अशा योजनेमध्ये जास्त परतावा हा अधिक सुरक्षित गुंतवणूक राहून देखील मिळविता येऊ शकतो.

शेअर बाजार म्हटला की तेजी-मंदी ही आली. शेअर बाजाराचा तो आत्मा आहे. तेजी-मंदीमुळेच शेअर बाजाराचे अस्तित्व आहे. शेअर बाजाराची त्यामुळेच ओळख आहे. अशा शेअर बाजारामधून स्मार्ट गुंतवणूकदार जास्त परतावा कमी जोखीम स्वीकारून मिळवितात. त्यामुळेच अशा वर्गांची गुंतवणूक देखील सुरक्षित राहते. यासाठी शेअर बाजाराचा अभ्यास असायला हवा. अनेक गुंतवणूकदार ईटीएफमध्ये गुंतवणूक करीत असतात. दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अशा गुंतवणूक योजनेचा काही हिस्सा ठेवतात. नवख्या गुंतवणूकदारास देखील अनेक गुंतवणूक सल्लागार ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारास भांडवलवृद्धी होते. ईटीएफमध्ये गुंतवणूक करीत असताना त्यावरील शुल्क भार हा म्युच्युअल फंडापेक्षा अत्यल्प असतो. अशा योजनेमध्ये होणारी गुंतवणूक ही निर्देशांकाच्या चांगल्या समभागांमध्ये होते. संबंधित समभागांमध्ये बाजारातील आर्थिक व्यवहार हे नियमित स्वरूपामध्ये होतात.

अर्थात सर्व गुंतवणूकदारांचा अशा समभागावर जास्त विश्वास असतो. त्यामुळेच अशी गुंतवणूक ही अत्यल्प खर्चामध्ये होते. अशा गुंतवणुकीमध्ये तरलता देखील असते. गुंतवणुकीमधील वैविध्यामुळे गुंतवणूक वृद्धी, भांडवल वृद्धी देखील होत असते. वास्तविक पाहता एखाद्या गुंतवणूकदारास निर्देशांकाच्या ५० सूचीबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर अशा गुंतवणूकदाराला जास्त रक्कम उभी करावी लागते. ईटीएफमध्ये गुंतवणूक करीत असताना कमी भांडवलामध्ये एक युनिट हा इंडक्सचा विकत घेता येऊ शकतो. त्यांची बाजारातील ५० अग्रणी निर्देशांकामध्ये गुंतवणूक होते. त्यामुळे निफ्टीतील ५० लिस्टेड कंपन्यांना एकत्रित करून आलेला भारतातील पहिला ईटीएफ होय. तो ‘गोल्डमॅन सॉक्स’ या घराण्याने भारतातील रिलायन्स म्युच्युअल फंड संपादित केल्यानंतर त्याचे व्यवस्थापन हे सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडाकडून केले जाते. निफ्टी ५० चे एक युनिट निफ्टी निर्देशांकाच्या एक दशांश रकमेत साधारणत: मिळते. अर्थात त्यावरील अधिभार हा वेगळा असतो, तो अत्यल्प स्वरूपामध्ये असतो.

अनेक सामान्य गुंतवणूकदारांना प्रश्न पडतो की ईटीएफ म्हणजेच म्युच्युअल फंड आहे काय? का तो यापेक्षा वेगळा आहे? वास्तविक पाहता ईटीएफ या योजनेची रचनाही म्युच्युअल फंडाच्या इंडेक्स फंडासारखीच असते. जी फंड व्यवस्थापनासारखी असते. यामध्ये फंड मॅनेजरची भूमिका नगण्य असते. फंडाप्रमाणे ईटीएफमध्ये त्या निर्देशांकात समभागाच्या असलेल्या भारांकाप्रमाणे व ठराविक टक्केवारीमध्ये गुंतवणूक करीत असतात. त्यामुळेच अशा फंडाचे व्यवस्थापन हे अ‍ॅक्टिव्ह स्वरूपामध्ये नसून पॅसिव्ह स्वरूपामध्ये असते. त्यामुळे गुंतवणूक करीत असताना सामान्य गुंतवणूकदार अशा या योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे? त्यांच्याशी संलग्न स्वरूपातील जोखीम कोणत्या स्वरूपातील आहे? या गोष्टीला महत्त्व नसते. कारण अशा फंडांमध्ये फंड मॅनेजरची भूमिका जास्त सक्रिय नसते. निफ्टी ५० मधील लिस्टेड सहभागाचा समूह बाजाराच्या तेजी-मंदीवरती सक्रिय स्वरूपामध्ये स्वार झाल्याने, त्याचा फायदा किंवा तोटा हा सामान्य गुंतवणूकदारापर्यंत प्रत्यक्ष पोहोचत असतो.

ईटीएफमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार हे केवळ शेअर बाजारांमध्ये करता येतात. त्यामुळे ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. फंडांमध्ये गुंतवणूक करीत असताना डिमॅट खाते आवश्यक असावेच असे बंधन नाही. डिमॅट धारक गुंतवणूकदार हा बाजारातून सुरुवातीस एक शेअरची खरेदी करू शकतो अर्थात म्युच्युअल फंडाच्या परिभाषेमध्ये याला आपण युनिट असे समजतो. म्युच्युअल फंड यामधील एखादे युनिट खरेदी करायचे असेल तर दिवसाखेर निर्धारित केलेल्या नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू किती आहे? यावरच खरेदी किंवा विक्री म्युच्युअल फंडामध्ये करता येऊ शकते. हे सामान्य गुंतवणूकदाराच्या आकलनाबाहेर असते. ईटीएफचा विचार करता त्यादिवशी इंडिकेटर जाहीर करीत असतात. शेअर बाजारातील शेअरचे भाव हे मागणी आणि पुरवठ्यावर ठरत असतात. ईटीएफचा बाजारभाव हा त्यामुळे आयएनएव्हीपेक्षा सुमारे अर्धा टक्का कमी किंवा जास्त असू शकतो. त्याचबरोबर ईटीएफच्या खरेदी व विक्री व्यवहारावर गुंतवणूकदाराला दलाली शुल्क द्यावे लागते. उलाढाल कर अर्थात एसटीटी भरावा लागतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सध्याचा विचार करता जागतिक बाजाराशी संलग्न ऑफशोर व अन्य स्वरूपाचे एकूण ५८ गुंतवणूकदारांसाठी खुल्या योजना आहेत. यातील चांगल्या व ठराविक योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास संबंधित गुंतवणूकदाराला जास्त फायदा मिळविता येतो.

सध्याचा विचार करता सरकारचा या संदर्भामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या रकमेतून काही हिस्सा म्हणजेच दहा टक्के या योजनेमध्ये गुंतवणूक होऊ लागला. त्यामुळे जे सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारापासून विभक्त आहेत अशा वर्गांचा नाराजीचा सूर आलेला आढळतो. शेअर बाजारांमध्ये जेव्हा तेजी निर्माण होते तेव्हा सामान्य गुंतवणूकदार हा हुरळून गेलेला आढळतो. कारण अशा वर्गांना तेजीमुळे जास्त परतावा मिळालेला असतो. सामान्य गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून पीएफमधील सक्तीची गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदार व शेअर बाजारात यामुळे फायदा झालेला आहे. निफ्टी ५० मधील निर्देशांकाचा समूह भारताच्या अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे ईटीएफमधील गुंतवणूकदारांचे भविष्य हे उज्ज्वल आहे, असे मत अनेक अर्थतज्ज्ञ करीत आहेत. अर्थात बाजारातील तेजी-मंदीचे गुणधर्म हे ईटीएफमध्ये असतात.

वास्तविक पाहता गुंतवणूकदाराच्या गरजा लक्षात घेऊन शेअर बाजारामध्ये गुंतवणूक योजना तयार होतात. यामध्ये वैविध्यता, पारदर्शकपणा, तरलता, कमी जोखीम घेऊन अधिक फायदा अशा गुणधर्म असणा-या अनेक योजना बाजारामध्ये येत असतात. त्याचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांनी उठवणे गरजेचे असते. सामान्य गुंतवणूकदारांसाठी आर्थिक साक्षरता वेळेवर व नियमित झाली तर गुंतवणूकदारांचा यात लाभच आहे. परंतु सामान्य गुंतवणूकदाराकडे वेळ कमी असल्याने, दैनंदिन कामकाजामध्ये आर्थिक साक्षरतेच्या कार्यक्रमास असा वर्ग हजर राहू शकत नसल्याने ख-या अर्थाने त्यांचे नुकसान होते. आर्थिक साक्षरतेचे महत्त्व ग्रामीण भागामध्ये कमी परंतु शहरी भागामध्ये जास्त आढळते हे खरे आहे.

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या