22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविशेषविदेशी वृक्षांचा ‘ताप’

विदेशी वृक्षांचा ‘ताप’

एकमत ऑनलाईन

तापमानवाढीमागे हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे प्रमुख कारण असल्याचे आता जगमान्य झाले आहे. परंतु भारतात परदेशी वृक्षांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा काही अभ्यासकांनी केला आहे. हा दावा पूर्णत: चुकीचा आणि अशास्रीय आहे. वृक्ष कोणताही असला तरी तो वातावरणात गारवाच निर्माण करतो हे लक्षात घ्यायला हवे. असे असले तरी विदेशी वृक्षांच्या काही प्रजातींचे अन्य तोटे दुर्लक्षित करता येणार नाहीत. या वृक्षांच्या आक्रमकपणामुळे देशीवृक्षसंपदा, पक्ष्यांचा अधिवास आणि नैसर्गिक परिसंस्था धोक्यात येत आहे. हे माहीत असूनही वनविभाग याच झाडांना प्राधान्य देत आहे, ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.

सध्या संपूर्ण देशभरात एकीकडे मान्सूनच्या आगमनाने मनाला दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे प्रचंड वाढलेल्या उष्म्यामुळे लोकजीवन हैराण झाले आहे. अलीकडील काळात दरवर्षी उन्हाळ्यातील तापमानाचा पारा वाढत चालला आहे. हवामानतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक या सर्वांकडून याची मिमांसा करताना जागतिक तापमानवाढीचा हा परिपाक असल्याचे सांगितले जाते आणि तो कमी करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि निसर्गाचे दोहन थांबवून वनसंपदा-वृक्षसंपदा व्यापकपणाने व वेगाने वाढवणे हे उपाय सांगितले जातात. परंतु अलीकडेच काही अभ्यासकांनी परदेशी वृक्षांमुळे तापमान वाढत असल्याचा दावा केला आहे. भारतात विदेशी वृक्षांची लागवड होत असल्यामुळे तापमान वाढ होत आहे, असा या अभ्यासकांचा जावईशोध आहे. तथापि, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. मुळात बहुतांश देशी आणि विदेशी पर्णझडी वृक्षांमध्ये हिवाळ्याच्या अखेरीस व प्रामुख्याने उन्हाळ्यात पानगळ होते. पानगळीच्या कालावधीत तापमानवाढ होते. मग ती परदेशी वृक्षांमुळे होते असे म्हणणे चुकचे आहे. तापमानवाढ ही हरितगृह वायूंच्या अमर्याद वाढीमुळे होत आहे.

वृक्षांमुळे तापमान कमी होण्यास मदतच होत असते; मग ते वृक्ष देशी असोत किंवा विदेशी! या अभ्यासकांनी आपला दावा मांडताना परदेशी वृक्षांच्या भारतात असणा-या जातींची संख्या १८ हजार असल्याचे म्हटले आहे; परंतु ते साफ चुकीचे आहे. कारण देशात एकूण वनस्पतींच्या ५० हजार जाती आहेत. यामध्ये रोप, वेल, झुडूप व वृक्षवर्गीय सर्व वनस्पतींचा समावेश आहे. अशी वस्तुस्थिती असताना फक्त वृक्षांच्या १८ हजार जाती आहेत, असे म्हणणे अयोग्य आहे. आजमितीला भारतात सुमारे ३००० ते ३१०० वृक्षांच्या जाती आहेत. यापैक १२०० ते १२५० जाती परदेशी वृक्षांच्या आहेत. महाराष्ट्रात वृक्षांच्या ७५२ जाती असून यापैकी २९२ जाती विदेशी आहेत. यामध्ये निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सुबाभूळ, सुरू, ग्लिरिसिडीया, सिलव्हर ओक, मॅनजियम, विलायती शमी, कोनोकार्पस, महोगनी, लक्ष्मीतरु इत्यादी सुमारे १०० ते ११० जातींचे विदेशी वृक्ष अतिरेक गुणधर्माचे असल्याने पर्यावरण व स्थानिक जैवविविधतेसाठी मारक व घातक आहेत. वनविभागाने देशभरात या सर्व वृक्षांची मोठ्या प्रमाणात आणि एकसुरी लागवड केली आहे. यामुळेच देशात विदेशी वृक्षांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बागांमध्ये आणि रस्त्याकडेने गुलमोहर, रेन ट्री, पिचकारी, पितमोहोर, काशिद, सिंगापूर चेरी आदी अनेक अतिआक्रमक गुणधर्माच्या विदेशी वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

या सर्व विदेशी वृक्षांच्या जाती स्थानिक पर्यावरणासाठी आणि जैवविविधतेसाठी घातक आहेत. अर्थात सर्व परदेशी वृक्ष घातक नाहीत आणि त्यांच्यामुळे तापमानवाढ होते असेही नाही. त्यामुळे विदेशी वृक्षांमुळे तापमानवाढ होते, यावर कोणीही विश्वास ठेवू नये. अर्थात, यानिमित्ताने विदेशी वृक्षांचा मुद्दा चर्चेत आला असून त्याबाबत योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्या देशात सुमारे ५० हजार वनस्पती प्रजाती असून यापैकी ४० टक्के प्रजाती विदेशी आहेत. या प्रजाती विविध खंडांतून, देशातून आपल्या देशात आलेल्या आहेत. देशात २० हजारांच्या आसपास विदेशी वनस्पतींच्या प्रजाती आढळून आल्या असून यातील बहुतांश प्रजाती तणवर्गीय आहेत. २५ टक्के प्रजाती अतिआक्रमक गुणधर्माच्या आहेत. तणवर्गीय वनस्पतींबरोबर विदेशी वृक्षही अतिआक्रमक गुणांचे आहेत. या आक्रमक तणामुळे भारतात दरवर्षी शेतीउत्पादनात ३० टक्के इतक घट होते. यावरुन यांची घातकता लक्षात येते.

घाणेरी किंवा टणटणी हे झुडुपवर्गीय विदेशी तण मूळचे मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडातील असून १८२० च्या दरम्यान ब्रिटिश राजवटीत इंग्रज अधिका-यांनी ही शोभेची वनस्पती म्हणून बागेत लागवड करण्यासाठी भारतात आणल्याची रितसर नोंद आढळते. पण नंतर या शोभिवंत वनस्पतीचा तण म्हणून भारतभर प्रसार झाला. आज देशात १३ दशलक्ष हेक्टर जमिनीवर आणि वनक्षेत्रात घाणेरी पसरलेली आहे. तिला नियंत्रित करणे अशक्यप्राय बनले आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाडा भागात हे तण फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर केंदाळ, काँग्रेस म्हणजेच गाजरगवत, रानमोडी, ओसाडी या तणांनीही मोठा भूभाग व्यापला आहे. कॉसमॉस, झिनिया, वेडेलिया, विदेशी आघाडा अशा अनेक विदेशी शोभीवंत वनस्पतीही तण म्हणून भारतात सर्वत्र पसरल्या आहेत. ही तणे चिवट असल्याने त्यांनी आपल्याकडील गवताळ प्रदेश व्यापले आहेत. परिणामी आपल्या पाळीव तसेच जंगली जनावरांच्या चराऊ जागा कमी होऊ लागल्या आहेत. यामुळे शोभिवंत विदेशी वनस्पतींचा प्रचार-प्रसार आणि लागवड करताना योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

सुरुवातीला नमूद केल्यानुसार वनविभागाकडून देशात लागवड केले जाणारे निलगिरी (ऑस्ट्रेलिया), ऑस्ट्रेलियन बाभूळ (ऑस्ट्रेलिया), ग्लिरिसिडिया (मेक्सिको), सुबाभूळ (मध्य अमेरिका), सुरू (ऑस्ट्रेलिया, दक्षिण पूर्व आशिया) हे सर्व वृक्ष विदेशी आहेत. निलगिरी वृक्षाच्या अनेक जात आहेत. महाराष्ट्रातच निलगिरीच्या १३ जातींची लागवड केली आहे. आज भारतात सुमारे १० लाख हेक्टरपेक्षाही अधिक भूक्षेत्रावर निलगिरीची लागवड आढळते. या वृक्षलागवडीचे तोटे लक्षात आल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये निलगिरी वृक्षलागवडीवर त्या राज्यात बंदी घातली. अशी बंदी सर्व राज्यांत येणे आवश्यक आहे.

असंख्य विदेशी तणे, बागेतील अनेक विदेशी शोभिवंत वनस्पती आणि वनीकरणासाठी आयात केलेले सर्व विदेशी वृक्ष या सर्वांचा आपल्या देशात शिरकाव आणि प्रसार झाल्याने आणि त्यांच्या आक्रमक गुणधर्मामुळे आपल्या परिसंस्था विस्कळित झाल्या आहेत. यामध्ये अधिकची भर म्हणून देशातील बागांमध्ये आणि रस्त्याकडेने विदेशी वृक्षांचे आक्रमण झाले असून सर्वत्र त्यांचेच साम्राज्य पसरले आहे. यामध्ये गुलमोहर (मादागास्कर), रेनट्री (मध्य व दक्षिण अमेरिका), पिचकारी (आफ्रिका) व पीतमोहर (श्रीलंका) हे वृक्ष आहेत. पूर्वी रस्त्यांच्या, महामार्गांच्या दोन्ही बाजूस हमखास आढळणारे वड, पिंपळ, उंबर, चिंच, कडूलिंब यांसारखे देशी वृक्ष आज रस्ते विकास प्रकल्पांमुळे पूर्णपणे कायमचे नामशेष झाले आहेत. रस्तेविकासानंतर केलेल्या वृक्षलागवडीमध्ये सातवीण, कदंब, करंज, जारुळ यांसारख्या देशी वृक्षांची संख्या फार कमी आहे. वनीकरणासाठी लागवड केल्या जाणा-या सर्व विदेशी वृक्षांच्या रोपांची निर्मिती प्रामुख्याने वनविभागाच्या रोपवाटिकांमध्येच होते. वास्तविक, देशी वृक्षांच्या इतक्या प्रजाती असूनही त्यावर संशोधन का होत नाही, हा यानिमित्ताने उपस्थित होणारा खरा प्रश्न आहे. मागील काळात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आज ज्या वृक्षांचे वयोमान संपले आहे त्यांच्या जागी तरी किमान देशी वृक्षलागवड केली गेली पाहिजे. पण तेही होत नाहीये.

याचे कारण निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ यांसारखे अनेक विदेशी वृक्ष आपल्याकडील वातावरणात जोमाने आणि वेगाने वाढतात; पण जवळपास असणा-या देशी वृक्षांना ते वाढू देत नाहीत. परिणामी तेथील नैसर्गिक अधिवास नष्ट होतो. या वृक्षांखाली इतर रोपे व झुडुपवर्गीय वनस्पतीही वाढू शकत नाहीत. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर परिणाम होऊन आपली स्थानिक जैवविविधताही नष्ट होऊ लागते. गेल्या ३०-४० वर्षांपूर्वी सांगोला, पंढरपूर, सोलापूर आणि मराठवाडा विभागात रस्त्यांच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत विदेशी शमी या वृक्षांची काही ठिकाणी लागवड करण्यात आली होती. नंतरच्या काळात हे वृक्ष जोमाने वाढले.

पण या विदेशी वृक्षांनी त्या परिसरात नैसर्गिकपणे वाढलेल्या आपल्या बाभळीच्या झाडांनाही नष्ट करुन टाकत आपले साम्राज्य पसरवले. निलगिरी, ऑस्ट्रेलियन सुबाभूळ, सुरू यांसारख्या बहुतांश विदेशी वृक्षांची मुळे जमिनीत खोलवर शिरतात व पसरतात. ही मुळे मोठ्या प्रमाणावर पाणी शोषून घेतात. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागते. दुसरीकडे देशी वृक्षांची पाने गळून खाली जमिनीवर पडल्यानंतर ती लगेच कुजून त्यांचे नैसर्गिक खतात रुपांतर होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता व पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. पण बहुतांश विदेशी वृक्षांची पाने गळून खाली पडल्यानंतर लवकर कुजत नाहीत. काही विदेशी वृक्षांमुळे जमिनीचा नैसर्गिक सामू बदलतो. याचा परिणाम सभोवताली असणा-या वनस्पती विविधतेवर आणि परिसंस्थेवर होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले पक्षी विदेशी वृक्षांवर आसरा घेत नाहीत आणि त्यावर आपले घरेटही बांधत नाहीत. त्यामुळे विदेशी वृक्ष लागवडीचा स्थानिक व स्थलांतरीत पक्ष्यांच्या सहजीवनावर विपरित परिणाम होतो. झाडाझुडपांचा पाला खाणारी आपली पाळीव व जंगली जनावरे विदेशी वृक्षांचा पाला खात नाहीत, किंबहुना त्याला तोंडही लावत नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या