22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeविशेष‘बिग बुल’चा अलविदा

‘बिग बुल’चा अलविदा

एकमत ऑनलाईन

शेअर बाजाराशी संबंधित असणा-या लोकांमध्ये आणि अन्यत्र ‘बिग बुल’ नावाने ओळखल्या जाणा-या राकेश झुनझुनवाला यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. वैश्विक पातळीवर शेअर बाजाराच्या क्षेत्रातील सर्वांत दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून वॉरेन बफेट यांची ओळख आहे. त्या धर्तीवर राकेश झुनझुनवाला यांना भारतातील वॉरेन बफेट असेही म्हटले जात असे. निधनानंतर त्यांची सर्वदूर चर्चा झाली
ती केवळ त्यांच्या श्रीमंतीमुळे नाही; तर ज्या शेअर बाजाराबाबत आजही अनेक भारतीयांमध्ये अनेक गैरसमज आहेत आणि शेअर बाजार हा जुगार आहे, सट्टाबाजार आहे, इथे लाखाचे बारा हजार होतात अशा अनेक प्रकारच्या टीका केल्या जातात त्याच शेअर बाजारातून राकेश झुनझुनवाला यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४६ हजार कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले. ‘फोर्ब्ज’ या जगप्रसिद्ध मासिकानुसार त्यांची संपत्ती ५.८ अब्ज डॉलर्स इतकी होती आणि ते भारतातील ४८ वे सर्वाधिक श्रीमंत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अब्जाधीश बनण्यासाठी शेअर बाजाराचा मार्ग निवडला तेव्हा त्यांनी केलेली गुंतवणूक होती अवघी ५००० रुपये ! परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ते भारतीय शेअर बाजाराचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नावारूपाला आले.

राकेश झुनझुनवालांचे कुटुंब मूळचे राजस्थानातील मारवाडचे. तेथून त्यांचे वडील मुंबईमध्ये येऊन स्थिरस्थावर झाले. ते आयकर तज्ज्ञ होते. त्यामुळे आर्थिक घडामोडींचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. मुंबईतील सिडेनहॅम महाविद्यालयातून बी. कॉम.ची पदवी मिळाल्यानंतर सीए बनण्यापूर्वी त्यांची पत्रकार किंवा पायलट बनण्याची इच्छा होती. मात्र अखेरीस इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला आणि सीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला. चार दशकांपूर्वी ट्रेनी चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून काम करत असताना झुनझुनवाला यांना केवळ ६० रुपये मिळायचे आणि त्यातीलही १५ रुपये कापून घेतले जात असत. घरामध्ये वडिलांच्या त्यांच्या मित्रांशी होणा-या चर्चांमधून शेअर बाजाराविषयीच्या प्राथमिक गोष्टी कानी पडत होत्या. त्यातूनच त्यांची पावले बाजाराकडे वळली आणि एक इतिहास लिहिला गेला. वडिलांनीच त्यांना जीवनमूल्ये समजावून सांगितली आणि त्यांनीच मोठे निर्णय घेण्यास त्यांना मदत केली. मोठे निर्णय घेताना संकोच करू नये असे त्यांचे मत होते.

१९८६ मध्ये त्यांनी ४३ रुपये किमतीचे टाटा टी या कंपनीचे समभाग खरेदी केले. काही दिवसांतच या समभागांचे भाव वधारून जवळपास तिपटीहून अधिक झाले. यातून झुनझुनवाला यांना जवळपास २.१५ लाखांच्या गुंतवणुकीतून पाच लाख रुपयांचा फायदा झाला. सीसा गोवा या कंपनीचे समभाग त्यांनी २८ रुपयांना खरेदी केले होते, ते काही दिवसांतच ३५ रुपये झाले आणि त्यानंतर थेट ६५ रुपयांवर पोहोचले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. पुढील तीन वर्षांमध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयांची मिळकत केली. यानंतर त्यांनी टाटा समूहाच्या आणखी एका कंपनीवर डाव लावला आणि या डावाने त्यांना ‘बिग बुल’ बनवले. ही गोष्ट आहे २००३ सालची. टाटा समूहाच्या टायटन या कंपनीचा समभाग तेव्हा तीन रुपयांवर होता. झुनझुनवाला यांनी टाटा टीचे तब्बल ६ कोटी समभाग खरेदी केले होते. एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या पोर्टफोलियोमध्ये टायटनचे ४.५ कोटी समभाग होते, ज्याचे बाजारमूल्य ७००० कोटी रुपयांहून अधिक होते. २६ जुलै २०२२ रोजी झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये असणा-या टायटनच्या समभागांचे एकूण मूल्य अंदाजे १० हजार ३०० कोटींच्या आसपास होते.
सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे धोका पत्करण्याची तयारी. शेअर बाजारच नव्हे तर कोणत्याही व्यवसायात जोखीम पत्करण्याची, धोका पत्करण्याची तयारी ठेवावीच लागते. त्याखेरीज घवघवीत यशाची चव चाखता येत नाही, असे म्हणतात.

झुनझुनवालाही याच मताचे होते. ‘रिस्क लेना मेरी आदत है’ असे ते नेहमी सांगायचे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सकारात्मकता. त्यांनी शेअर बाजाराकडे कधीही नकारात्मकतेने पाहिले नाही. २००८ च्या वैश्विक मंदीनंतर त्यांच्याकडे असणा-या समभागांचे मूल्य ३० टक्क्यांनी कमी झाले होते; परंतु २०१२ मध्ये त्यांनी हा सर्व तोटा भरून काढला. भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही असाच सकारात्मक होता. भारत हा एक समृद्ध देश आहे आणि भारतात समृद्धी नसती तर आपण जगातील धनिकांच्या यादीत कधीच सहभागी झालो नसतो, असे ते नेहमी सांगत असत. त्यांची अभ्यासपूर्णता, आकलनक्षमताही दांडगी होती. किंबहुना, गुंतवणूकदारांना सल्ला देतानाही ते नेहमीच हेच सांगत असत की, कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीची विस्ताराने माहिती घ्या, मागील काळातील ताळेबंद, नफा-तोटा तपासा, कंपनीच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घ्या, कंपनीच्या भविष्यातील योजना काय आहेत, कर्जे किती आहेत या सर्वांची तपशीलवार माहिती घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. त्याचबरोबर अल्पावधीत नफा कमवण्याऐवजी गुंतवणुकीला अनेक पटींनी वाढ करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. झुनझुनवालांना बाजाराची नस अचूक समजत होती. अर्थातच यामागे त्यांची निरीक्षणशक्ती, बाजारातील घडामोडींचा अभ्यास आणि गुंतवणुकीसाठी आवश्यक असणारी शिस्त कारणीभूत होती. ही कौशल्ये त्यांनी आपले गुरु राधाकिशन दमानी यांच्याकडून संपादित केली होती.

– सीए संतोष घारे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या