23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeविशेषतेजीला ‘इंधन’

तेजीला ‘इंधन’

एकमत ऑनलाईन

सातत्याने गडगडत जाणा-या भारतीय शेअर बाजाराला गेल्या आठवड्याच्या समाप्तीस ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून आले. वैश्विक पातळीवरही चीनने केलेल्या व्याजदर कपातीमुळे आणि तेथील लॉकडाऊन शिथिल केले जाणार असल्याने विविध शेअर बाजारांत शुक्रवारी उसळी दिसून आली. शनिवारी केंद्र सरकारने उत्पादनशुल्कात कपात करून या तेजीला नवे इंधन दिले आहे. यामुळे हर्षोल्हासित होतानाच महागाई, युद्ध, एफआयआयचा विक्रीचा सपाटा, व्याजदरवाढीची संकटे संपलेली नाहीत याचे भान ठेवलेले बरे. सद्यस्थिती पाहता बाजारातील दोलायमानता प्रचंड वाढण्याचे संकेत मिळताहेत. अशा वेळी जास्त जोखीम न पत्करता ऊर्जा, पायाभूत सुविधा, बँकिंग, रिअल इस्टेट, दूरसंचार या क्षेत्रातील समभागांत गुंतवणूक करता येईल.

जगभरातील शेअर बाजारात गेल्या दोन आठवड्यांमध्ये कमालीची घुसळण पाहायला मिळत आहे. आज दोन-चारशेंनी घसरलेले निर्देशांक दुस-या दिवशी तितक्याच वेगाने उसळी घेत वरच्या दिशेने जाताना दिसताहेत. अशा ‘हाय व्होलॅटिलिटी’चा म्हणजेच दोलायमानतेचा चाणाक्ष आणि अनुभवी टेÑडर्सना मोठा फायदा होत असला तरी अनेकांना याचा फटका बसत आहे. दुसरीकडे या दोलायमानतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये कमालीचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंतवणूकतज्ज्ञांमध्येही सध्या मतमतांतरे पहावयास मिळत आहेत.

अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यामुळे आणि महागाई नियंत्रणासाठी फेड रिझर्व्हकडून आणखी व्याजदर वाढवण्यात येणार असल्यामुळे सद्यस्थितीत बाजारातील घसरणीचा लाभ घेऊन गुंतवणूक करण्याऐवजी काही काळ थांबून वाट पहावी, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे; तर दुस-या गटाच्या मते भारतीय शेअर बाजारातील ‘करेक्शन’ म्हणजेच घसरण आता संपली असून याहून बाजार आणखी खाली जाणार नाही. सबब आत्ताची वेळ ही सुसंधी मानून गुंतवणूक करायला हवी. थोडक्यात, बाजार दिशाहीन झाल्यामुळे अभ्यासकही चक्रावून गेले आहेत. दोलायमानता वाढली की जोखीम प्रचंड वाढते याचा प्रत्यय गेल्या आठवड्यात सर्वांनीच घेतला असेल. गतसोमवारी १५,७३७ पर्यंत घसरलेला निफ्टी मंगळवारी १६२८० पर्यंत तर बुधवारी १६,४०० पर्यंत गेला. पण गुरुवारी साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी पुन्हा १५,७६८ पर्यंत खाली घसरला आणि शुक्रवारी पुन्हा १६,३०० पर्यंत गेला. बँक निफ्टीनेही ३२,९६० ते ३४,७६० असा प्रवास केला. या दोलायमानतेचे कारण म्हणजे जागतिक पातळीवरून येणारे संमिश्र संकेत. अमेरिकेतील आर्थिक चिंतेमुळे गुरुवारी कोसळलेले बाजार शुक्रवारी चीन सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाच वर्षांसाठीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात केल्यामुळे जोमाने वधारले. शुक्रवारी निफ्टीमध्ये २.८९ टक्के वाढ झाली असून १६,२६६ च्या पातळीवर हा निर्देशांक विसावला आहे; तर सेन्सेक्समध्ये २.९१ टक्क्यांची वाढ झाली असून तो ५४,३२६.३९ अंकांवर बंद झाला आहे.

शुक्रवारच्या या उसळीला रिलायन्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एअरटेल, डॉक्टर रेड्डीज यांसारख्या कंपन्यांमध्ये आलेली जबरदस्त खरेदी कारणीभूत ठरली. याखेरीज मागील सत्रामध्ये जवळपास ४ टक्क्यांहून अधिक घसरण झालेल्या धातू क्षेत्राच्या निर्देशांकातही ४.२ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. निफ्टी मीडिया ४.४७ टक्के, निफ्टी रिअ‍ॅलिटी ४.२१ टक्के वधारला. दुसरीकडे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून मे महिन्यात आतापर्यंत ४४,१०२ कोटींच्या समभागांची विक्री करण्यात आली आहे. शुक्रवारीही एफआयआयनी १२६५ कोटींचे समभाग विकले असून हा आकडा महिन्याभरातील दुसरा सर्वांत कमी आकडा आहे. या पार्श्वभूमीवर चालू आठवड्याचा विचार करता चार महत्त्वाच्या गोष्टींचा शेअर बाजारावर परिणाम कसा राहतो हे पाहणे औचित्याचे राहील. पहिली घडामोड म्हणजे केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादनशुल्कात कपात केल्यामुळे या दोन्हींचे दर अनुक्रमे ९.५० आणि पाच रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडरवर २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. महागाईच्या संकटाने चिंतेत असलेल्या अर्थव्यवस्थेला आणि सर्वसामान्यांना हा खूप मोठा दिलासा आहे. याखेरीज देशात सरलेल्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणूकरूपात विक्रमी ८३.५७ अब्ज डॉलरचा ओघ आल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केली आहे. बाजारात याचे सकारात्मक पडसाद निश्चितपणाने उमटतील.

तथापि अन्य दोन घडामोडींचे नकारात्मक पडसाद उमटू शकतात. एक म्हणजे जीएसटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल. या निर्णयामुळे राज्यांकडून करांमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत असून एकंदरीतच जीएसटीमध्येच बदल होईल की काय अशीही चर्चा सुरू आहे. २०१७ मध्ये लागू केलेल्या या ‘एक देश एक करपद्धती’चे उद्योगजगताने स्वागत केले आहे. जीएसटी संकलनाचे आकडेही दरमहा उंचावत आहेत. अशा स्थितीत आलेला हा निर्णय काहीसा चिंताजनक म्हणून पाहिला जाऊ शकतो. दुसरीकडे एनएसईमधील कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने देशातील काही मोठ्या ब्रोकर्सवर छापे टाकले आहेत. याचेही पडसाद बाजारात उमटतात का हे पहावे लागेल. याशिवाय रुपयात होत चाललेली घसरण ही अर्थव्यवस्थेसह बाजारासाठीही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे रुपयात आणखी घसरण झाल्यास त्याचेही बाजारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. टेक्निकल चार्ट पाहिल्यास १६००० आणि १५,७३५ च्या पातळीवर निफ्टीने भक्कम सपोर्ट बनवला आहे. बाजारात तेजीची उसळी दिसून आली आहे. आता १६,४०० च्या वरच्या पातळीवर निफ्टी टिकून राहिल्यास येत्या काही दिवसांत १६६०० ते १६८०० ची पातळी पहायला मिळू शकते. तथापि १५७३५ च्या खाली निफ्टी गेला तर मोठी घसरण होऊ शकते.

चालू आठवड्यात पुन्हा रिलायन्सच्या समभागात तेजी दिसून येऊ शकते. मुकेश अंबानींकडून केल्या जाणा-या एका मोठ्या डीलला यश आल्यास रिलायन्सचा शेअर आणखी वधारू शकतो. फाईव्ह-जीची चाचणी यशस्वी झाल्यामुळे भारती एअरटेल, आयडियाच्या समभागासह दूरसंचार क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या समभागांत तेजी दिसून येऊ शकते. एनटीपीसी कंपनीला ५,१९९ कोटींचा शुद्ध नफा झाला आहे. त्यामुळे हा समभागही तेजीचा कौल दर्शवू शकतो. याखेरीज टाटा मोटर्स, अशोक लेलँड, जेके पेपर यांमध्ये केलेली खरेदीही अल्पकालीन फायदा मिळवून देईल. आरबीएल बँकेचा समभागही येत्या काळात १० ते १२ रुपयांनी वधारण्याचे संकेत आहेत. याखेरीज द्वारिकेश शुगर, टीसीएस, नाल्को, सेल, झुआरी ग्लोब, दावत, जिंदाल सॉ, एफएसएल, एनआरबी बेअरिंग, टाटा स्टील, सिल्व्हर, टाटा कॉफी, इंडियन हॉटेल, टाटा पॉवर, एसबीआय लाईफ, कोठारी शुगर, लेमनट्री हॉटेल, एसबीआय, बँक ऑफ बडोदा या समभागांत खरेदी करता येईल. एक गोष्ट लक्षात असू द्या, देशांतर्गत घटक अनुकूल असले तरी बाजाराचा मूड अद्यापही पूर्णत: तेजीकडे नाही. जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम होऊन बाजारात घसरण झाल्यास काही काळ वाट पाहून वरील समभागांची खरेदी केल्यास अधिक कमी दरात ते मिळून नफ्याचे अवकाश वाढेल.

-संदीप पाटील,
शेअर बाजार अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या