26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeविशेषसण बैलराजाचा

सण बैलराजाचा

एकमत ऑनलाईन

भारत कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील प्रमुख व्यवसाय हा शेती होय. याशिवाय निसर्गपूजा ही आपल्याकडे कोणत्याही पूजेपेक्षा श्रेष्ठ मानली गेलेली आहे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे हा आपला स्थायीभाव! शेती आज जरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जात असली तरी बैल हा शेतीचा प्रमुख कामकरी मानला जातो. वर्षाचे ३६५ दिवस तो आपल्या कामात व्यस्त असतो. अगदी निमूटपणे मालकाचे ऐेकणे आणि नेमून दिलेले काम व्यवस्थित करणे हा त्याचा स्वभाव आहे. प्रत्येक गोष्टीला मान हलवून संमती देणे, चकार शब्द तोंडावाटे न काढणे, आवाज न करणे हा बैलाचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्याच्या याच स्वभावामुळे एखादा नवरा आपल्या बायकोशी जर समजुतीने वागत असेल, तिच्या होकारात विनातक्रार हो म्हणत असेल तर त्याला गमतीने ‘बैल आहे अगदी’ असे म्हटले जाते. यातील चेष्टेचा भाग सोडला तर बैल खरोखरच अतिशय कष्टाळू प्राणी आहे.

भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी आपल्या देशाचा नारा ‘जय जवान, जय किसान’ असा केला होता. देश जर चांगला, सुस्थितीत चालवायचा असेल ‘जय जवान’ म्हणजे देशाची संरक्षण फळी मजबूत हवी आणि दुसरीकडे ‘जय किसान’ म्हणजे शेतकरी सुदृढ आणि संपन्न हवा. अशा संपन्न शेतक-याचा देव म्हणजे त्याची काळी आई (जमीन) आणि बैल! बैल हा शेतक-यासाठी सर्वस्व असतो. एखाद्या कुटुंबातील सदस्यासारखा तो त्याला जिवलग मानतो. असे म्हणतात, गायीला जर गोरा (बैल) झाला तर तिच्या डोळ्यातून आसवं येतात, कारण त्याच्या कष्टिक जीवनाविषयीची ती ममत्वरूपी करुणा असते. पण त्याचं कर्तव्य काय ते ती त्यांच्या भाषेत समजावूनही सांगत असावी. असो, बैलपोळा हा श्रावणातल्या पिठोरी अमावास्येला साजरा केला जातो. प्रत्येक प्रांताप्रमाणे या सणाची महती वेगवेगळी असते. विशेषत: गावखेड्यात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा श्रावणातला शेवटचा सण मानला जातो. तसाही श्रावण महिना हा महादेवाचा अतिशय प्रिय महिना आहे.

प्रामुख्याने या महिन्यात शिवपूजेला खूपच महत्त्व आहे. शिवाचे प्रिय वाहन नंदी होय. हा नंदी म्हणजे बैलच होय! शिवसेवेच्या या महिन्याचे शेवटचे पूजन हे नंदीचे होय. त्याची सेवा मोठ्या श्रद्धेने केली जाते. तसेही आपण निसर्गाला देव मानतो. आपल्या मान्यतेनुसार चराचरात ईश्वर आहे. या आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सणाचा अध्यात्माशी संबंध जोडलेला आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असा संदेश संतांनी दिलेला आहे. शब्द वेगळे असतील; पण भावना सर्वत्र एकच दिसून येते. जे कोणी आपल्यासाठी काही करतात त्यांचे ऋण मानणे, त्यांना धन्यवाद देणे ही आपली विचारसंस्कृती आहे. शिवाय भूतदया ही भारतीयांची फार महत्त्वाची भावना आहे. बैल तर आपला जीवनातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्यादृष्टीने विचार करता त्याच्याप्रति असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. प्राण्यांविषयी ममत्व, प्रेम, सहानुभूती ही भावना केवळ भारतातच नाही तर सर्व देशांत दिसून येते. आपला देश तर शेतकरीप्रधान देश आहे. शेतक-यांच्या घरातील सदस्य आणि बैल वर्षभर बरोबरीने शेतात राबतात. ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता! साहजिकच वर्षातून एकदा त्याच्या या ऋणाची परतफेड करण्याचा बैलपोळा म्हणजे शेतक-यासाठी मोठ्या पर्वणीचा, आनंदाचा दिवस असतो! विशेषत: महाराष्ट्रात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

एखाद्या नातलगाला ज्याप्रमाणे आपण मोठ्या आदराने आदले दिवशी दुस-या दिवशीच्या जेवणाचे आमंत्रण देतो, तसेच मोठ्या आनंदाने शेतकरी बैलाला आदल्या दिवशी ‘आवतन घ्या, जेवायला या’ असे म्हणून रीतसर आमंत्रण देतो. घरातल्या एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्याचा खास दिवस म्हणून सकाळपासून आपण त्याची सरबराई करतो, कौतुक करतो, औक्षण करतो, न्हावू-माखू घालतो, आवडीचे पदार्थ करतो. अगदी तशाच प्रकारे शेतकरीराजा आणि त्याचे संपूर्ण कुटुंबिय पोळ्याच्या दिवशी बैलाचे लाड करतात. सकाळी बैलाला स्वच्छ, अंग चोळून आंघोळ घालतात. गावात नदी असेल तर नदीवर नेऊन व्यवस्थित आंघोळ घालतात. त्यांना विविध रंगांनी रंगवतात. फुलांच्या माळा घालून, शिगांवर मोरपिसं लावून सजवतात. गरम नरम पुरणपोळीचे जेवण देतात. औक्षण करतात. त्यादिवशी बैलाकडून कोणतेही काम करून घेत नाहीत. घरोघरी बैलांना फिरवले जाते. घरची मालकीण बैलांचे औक्षण करते आणि बैल आणणा-याला काही पैसे देते याला बोजारा असे म्हणतात. काही काही गावांत बैलांच्या शर्यतींचे आयोजन केले जाते.

यामध्ये पहिला नंबर पटकावणा-या बैलाला आणि त्याच्या मालकाला बक्षीस दिले जाते. एकंदर बैलांसाठी एक प्रकारे हा दिवाळीचाच सण असतो असे म्हणता येईल. आपल्या धन्याकडून होणा-या या लाडाकोडाने हा बैलराजाही भारावून जाताना दिसतो. बैलाच्या डोळ्यात सदैव आपल्या मालकाविषयीचे प्रेम दिसत असते. शेतक-याच्या घरातील सुख-दु:खाचे प्रतिबिंब बैलाच्या चेह-यावर दिसत असते. शेतकरी आणि बैल यांच्यातील हे नाते विलोभनीय असते. प्राण्यांविषयी कृतज्ञता दाखवावी. संस्कार जपण्यासाठी ब-याच ठिकाणी तान्हा पोळा साजरा करण्याची पद्धत आहे. हा बैलपोळ्याचा दुसरा दिवस असतो. हा पोळा लहान मुलांसाठी असतो. या दिवशी लाकडाचे बैल तयार करून त्यांना सजवले जाते आणि त्यांच्या शर्यती होतात. काकडी आणि हरभ-याची ओली डाळ, नारळ असा प्रसाद वाटला जातो आणि मग पोळा सुटतो. मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. लहानपणापासून भिनलेला हा संस्काराचा वारसा पुढे चालवितात. आपल्याकडील सर्वच सण काहीना काही उद्देशानेच साजरे केले जातात. त्यातील संस्काराची धरोहर पिढी दर पिढी पोचवली जाते. ती सांभाळली जाते, जतन केली जाते. अशा प्रकारची ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. भूतदया, निसर्गपूजा, वृक्षपूजा ही आपल्या संस्कृतीची मूलभूत संकल्पना आहे. यावरूनच भारताचे प्रतिबिंब सर्व जगात उमटलेले दिसते. अशा या बैलपोळ्याने श्रावणाची सांगता होते.

-अरुणा सरनाईक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या