भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयाची चर्चा बरीच झाली; परंतु कर्णधार अजिंक्य रहाणेला या यशाचे श्रेय मिळाले नाही. वस्तुत: या सामन्यात रहाणेने अतिशय शांततेने आणि संयमाने संघाचे नेतृत्व केले आणि स्वत: शतक झळकावून संपूर्ण संघाला प्रोत्साहित केले. रहाणे शांततेत आणि आत्मविश्वासाने खेळतो. भारताचे माजी यष्टिरक्षक फलंदाज फारूक इंजिनिअर यांनी अजिंक्य रहाणेचा उल्लेख ‘फायटर’ असा केला आहे. या विजयानंतर अजिंक्य आणि विराट यांच्यातही तुलना होत आहे; परंतु ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे वेगळी आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर असलेल्या भारतीय संघाला मेलबर्नमध्ये विजय मिळाला आणि जोरात चर्चाही झाली. परंतु कर्णधार अजिंक्य रहाणेला या यशाचे श्रेय मिळाले नाही. हा विजय ऐतिहासिक होता. कारण जो संघ काही दिवसांपूर्वी ३६ धावांवर गारद होतो आणि पुढच्या कसोटीत विराट कोहली, मोहंमद शमी यासारख्या स्टार खेळाडूंच्या गैरहजेरीत मैदानात उतरतो तसेच शुभमन गिल, ऋषभ पंत आणि मोहंमद सिराजसारख्या नवख्यांबरोबर खेळत यजमानांना हरवतो, ही बाब नक्कीच साधी नाही. या मैदानावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. हे यश साधे नाही. भारतीय संघाने नाणेफेक हरली होती आणि गोलंदाज उमेश यादव हा सामन्यादरम्यान जायबंदी झाला होता. परंतु कर्णधार रहाणेने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. रहाणेने कोणताही गाजावाजा केला नाही आणि अकारण आक्रमकता दाखवली नाही. त्याने अतिशय शांततेने आणि संयमाने संघाचे नेतृत्व केले आणि स्वत: शतक झळकावून संपूर्ण संघाला प्रोत्साहित केले. भारतीय संघ जेव्हा दुस-या दिवशी फलंदाजीसाठी उतरला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल बाद झाले होते. यानंतर रहाणेवरच संघाची मदार अवलंबून होती. त्याने अतिशय संयमाने फलंदाजी करत संघाला दडपणातून बाहेर काढले.
ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्यासमवेत चांगली भागिदारी केली आणि आपले १२ वे शतक झळकावले. हेच शतक भारताच्या विजयासाठी मोलाचे ठरले. भारतीय संघाला मिळालेला विजय हा चमत्कारापेक्षा कमी नाही. कारण कसोटी सामन्याच्या इतिहासात नीचांकी धावसंख्येवर बाद होत असताना दुस-याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत हरवणे ही बाब सोपी नाही. या विजयाची चर्चा बराच काळ राहील. रहाणे जेव्हा नाणेफेकीसाठी मैदानात आला तेव्हा भारतीय संघ ऐतिहासिक कामगिरी करेल,असे कोणालाही वाटले नव्हते. रहाणेवर प्रचंड मानसिक दबाव होता, हे जगजाहीर आहे. तो मधल्या फळीत फलंदाजी करतो. परंतु एकदिवसीय सामना आणि टी-२० मध्ये तो सलामीला येतो. त्याने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते आणि २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटी करिअरला सुरुवात केली होती.
८३ तेजस विमानांच्या निर्मितीतून ५० हजार रोजगार – राजनाथसिंह
तो भारतीय संघाचा उपकर्णधार आहे, परंतु संघातील त्याचे स्थान अनिश्चित आहे. तो सतत आतबाहेर असतो. भारताचे माजी यष्टिरक्षक फलंदाज फारूक इंजिनिअर यांनी अजिंक्य रहाणेचा उल्लेख ‘फायटर’ असा केला आहे. माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी म्हटले की, रहाणेने ज्या रीतीने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. रहाणेंचा नव्या खेळाडूबरोबर उतरण्याचा निर्णय मोठा होता. मात्र त्याला दोन्ही युवा खेळाडू चांगली कामगिरी करतील, याचा विश्वास होता. या खेळाडूंनी देखील संधी गमावली नाही आणि दमदार खेळ केला. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला एका पोत्यात बांधून मारले. शोएबने रहाणेचे कौतुक केले आणि तो खूपच शांत आणि संंयमी खेळाडू असल्याचे म्हटले आहे. रहाणे हा मैदानावर कधीही आरडाओरड करत नाही. तो अतिशय शांतपणे आपली रणनीती आखत असतो. त्याच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ केला. रहाणेचे शतक हे सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले.
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माच्या मते, रहाणे हा गोलंदाजांचा कर्णधार आहे. ईशांत हा जायबंदी झाल्याने दौ-याबाहेर आहे. रहाणे शांततेत आणि आत्मविश्वासाने खेळतो, अशा शब्दांत त्याने कौतुक केले आहे. तुला कसे यष्टिरक्षण हवे, असे तो गोलंदाजांना विचारतो. तो कधीही आदेश देत नाही, असे ईशांत म्हणतो. गौतम गंभीरने म्हटले की, सध्या आहे तसेच रहाणेने रहावे. गंभीरच्या मते, रहाणे आणि कोहली हे वेगवेगळे व्यक्तिमत्त्व आहे. रहाणे कोहली होऊ शकत नाही. कोहली धोनी होऊ शकत नाही आणि धोनी कधी सौरभ होऊ शकत नाही. या विजयाने विराटच्या कर्णधारपदावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोहलीसाठी मावळते वर्ष फारसे उत्साहवर्धक राहिले नाही. कोहलीने तिन्ही फॉर्मेटमध्ये एकही शतक ठोकले नाही. त्याच्या कर्णधारपदाखाली न्यूझिलंडमध्ये भारतीय संघाने कसोटी मालिका गमावली. ऑस्ट्रेलियात अॅडलेड येथे लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. दुस-या डावात भारताला केवळ ३६ धावा करता आल्या. या कसोटी सामन्यातील स्कोअर हा नीचांकी ठरला.
या सामन्यानंतर विराट भारतात परतला आणि अजिंक्यला कर्णधारपद मिळाले. भारतीय संघाने मेलबर्न येथे जबरदस्त कमबॅक केले. आठ गडी राखून विजय मिळवत मालिका १-१ अशी केली. मर्यादित षटकांच्या सामन्यात विराटच्या कर्णधारपदाची तुलना रोहित शर्माशी केली जात आहे तर कसोटीत रहाणेशी. विराटच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत एकही आयपीएल चषक जिंकलेला नाही. तर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा चषक खिशात घातला आहे. अर्थात सध्याच्या काळात विराट कोहलीएवढा दर्जा राखणारा एकही फलंदाज जगात नाही. मात्र मैदानात कोहली हा अकारण आक्रमकता दाखवतो. आक्रमक आणि अहंकार यात खूपच कमी फरक आहे. भारतीय कर्णधार ही लक्ष्मणरेषा ओलांडताना अनेकदा दिसला आहे. तो अनेकदा प्रतिस्पर्धी खेळाडूंशी वाद घालताना दिसतो. फलंदाज बाद झाल्यानंतर शेरेबाजी करतो. पंचाच्या निर्णयावर तो सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया देखील देतो.
सौरव गांगुली हा आक्रमक कर्णधार म्हणून अोळखला जातो. परंतु तो कधीही वादग्रस्त ठरला नाही. प्रशिक्षक रवी शास्त्री देखील कोहलीला नियंत्रित करू शकले नाहीत. निवड मंडळातील काही जण हे विराटचे स्वभाववैशिष्ट्य असल्याचे सांगत त्याची पाठराखण करतात. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे विराटच्या निर्णयाला कोणीही विरोध करत नाही. अशावेळी धोनीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तो नेहमीच कोहलीला सल्ला देण्याचे काम करतो.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे सदस्य इतिहास लेखक रामचंद्र गुहा यांनी अलीकडेच एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी कोहलीला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरविले आहे. परंतु त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते. गुहांच्या मते, बीसीसीआयसारखी संस्था कोहलीच्या पुढे कुचकामी पडलेली दिसून येत आहे. कोहलीला सर्वश्रेष्ठ भारतीय कर्णधार म्हणून जगात नावारूपास आलेले त्यांना पाहायचे आहे. परंतु कर्णधार म्हणून कोहलीने नम्र राहणे तितकेच गरजेचे आहे.
नितीन कुलकर्णी