22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeविशेषकोरोना काळातील आर्थिक नियोजन

कोरोना काळातील आर्थिक नियोजन

एकमत ऑनलाईन

नमस्कार मंडळी! कोरोना महामारीमुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. अपवादात्मक परिस्थिती व ठराविक वर्ग वगळता प्रत्येकाच्या घरातील पैशाचे नियोजन बिघडले आहे. त्यात किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर, भाजीविक्रेता इत्यादी वर्गाची आर्थिक स्थिती चांगली झाल्याची चर्चा आहे. परंतु समाजातील अन्य घटकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात छोटे व्यावसायिक, कर्मचारीवर्ग, खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग. त्यात वाढत जाणारी महागाई व अस्थिर स्वरूपातील परंतु कमी उत्पन्नाचा वर्ग हा वेगळ्याच संकटांमध्ये आहे. बदलत्या काळाचा विचार करता अनेकांचा खर्च मात्र वाढतोय. मग दुकानाचे भाडे, नोकरांचा पगार, लाईट बिल इत्यादी खर्च कसे द्यायचे हा त्यांच्यासमोर मोठा व गहन प्रश्न आहे. घर सांभाळताना कुटुंबासाठी अर्थव्यवस्थापन करीत असताना गृहिणीला तारेवरची कसरत करावी लागते. कुटुंबासाठी होणारा खर्च कसा करायचा? घटत जाणा-या उत्पन्नात खर्चावर नियंत्रण कसे ठेवायचे? हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सर्वांनाच सतावतोय.

अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वजण आपापल्या पद्धतीने अर्थव्यवस्थापन करीत असतात. वास्तविक पाहता अर्थनियोजनाच्या तत्त्वाप्रमाणे सहा ते नऊ महिन्यांचा आणीबाणी निधी हा असायलाच हवा. तसा विचार करता असा निधी निर्माण करणारा वर्ग हा बोटावर मोजण्या इतकाच असतो. बाकीच्या वर्गाचे काय? ज्याने अशा प्रकारच्या निधीची तरतूद केली नाही किंवा केली जरी असली तरी तो निधी संपला. त्यानंतर त्यांच्यासमोर अर्थ प्रश्न हा ‘आ’वासून उभा असतो. त्यांची योग्य पद्धतीने सोडवणूक करण्यासाठी अर्थ नियोजनाची माहिती असणारा वर्ग आजच्या काळात तग धरून आहे.

अनेकांनी अर्थ नियोजनाच्या तत्त्वाप्रमाणे गुंतवणूक केली असेल. परंतु कोरोना महामारीच्या काळात अशी केलेली गुंतवणूक मुदतीपूर्वी मोडण्याचा अनेक जण प्रयत्न करीत होते. मग अशी गुंतवणूक बँकेतील मुदत ठेव असो, पोस्टामधील गुंतवणूक असो किंवा अन्य स्वरूपातील गुंतवणूक असो, ती ही मुदतपूर्व मोडण्याच्या प्रकारामुळे गुंतवणूकदाराचे नुकसानच होते. कारण मुदतपूर्व गुंतवणूक मोडल्यावर दंड व अन्य स्वरूपाची रक्कम वजा करता हातात पडणारी रक्कम तुटपुंजी झाली. आधीच व्याजरूपी परतावा दर हा कमी आहे. त्यात वाढती महागाई, त्यात घटत जाणारे उत्पन्न यामुळे गुंतवणूकदार वर्ग वेगळ्याच अडचणीत सापडलेला आहे. असा वर्ग गुंतवणूक परिपक्वतेपूर्वी गुंतवणूक मोडल्यामुळे दंडाची रक्कम वजा करून शिल्लक रक्कम हातात पडते. परंतु वाढत जाणा-या महागाईमुळे घरखर्च चालवणे सर्वसामान्यांना अवघड जात आहे. त्याचबरोबर आपली गुंतवणूक ज्या उद्देशासाठी सुरुवात केली. बचतीचे रूपांतर गुंतवणुकीमध्ये केले. आर्थिक उद्देश भविष्यात सफल होणार नाही. कारण अर्ध्यामध्ये अशी गुंतवणूक मोडली गेल्याने, गुंतवणूक करण्याचा मूळ उद्देश संपतो. भविष्यातील आर्थिक प्रश्न तसाच अनुत्तरित परंतु कायम राहतो. यावर ख-या अर्थाने उपाय म्हणजे, मुदतपूर्व गुंतवणूक न मोडता अशा गुंतवणुकीवर कर्ज काढून आपले आर्थिक प्रश्न सोडविता येऊ शकतात. कालांतराने कर्जावरील व्याज व मुद्दल भरून ही गुंतवणूक भविष्यामध्ये कामाला येऊ शकते. गुंतवणुकीचा मूळ उद्देश साध्य करता येतो . थोडक्यात अशा वर्गांना स्वार्थही साधता येतो आणि परमार्थही.

वास्तविक पाहता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत अंशत: रक्कम उचलण्याची सुविधा गुंतवणूकदारास असते. त्याचा फायदा संबंधित गुंतवणूकदार क्वचितच घेतात. अर्थनियोजन करीत असताना महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या उत्पन्नाचा मार्ग व साधने यामध्ये वाढ करणे होय. त्याचबरोबर खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या सूत्राचे पालन करावे लागते. लॉकडाऊनच्या काळात नवीन उत्पन्न मिळवून देणा-या साधनांचा शोध नक्कीच घेता येतो. यासाठी त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे. भविष्यामध्ये याचा फायदा करता येतो. कारण अशा गुंतवणूकदाराचा छंद विकसित करून, त्यांच्या उत्पन्नात वाढ करता येते. तशा प्रकारची दिशा मिळत असते. कारण छंदाचे रूपांतर व्यवसायात करणारा वर्ग हा फायदेशीर असतो. छंद जोपासल्यामुळे त्यांना आनंद देखील मिळत असतो.

अर्थनियोजनाचा दुसरा भाग म्हणजे प्रत्येक घरामध्ये होणारा खर्च हा गरजेचा आहे का? खर्चाचा आहे? याची सीमारेषा समजणे गरजेचे असते. तसेच खर्च करत असताना खर्चाचे वर्गीकरण करता येते.आजच्या काळात बहुतांश स्वरूपाचा खर्च हा आभासी स्वरूपामध्ये अत्यावश्यक झाला आहे असा समज सर्वसामान्याचा असतो. या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यास तो खर्च टाळता येतो किंवा त्यावर नियंत्रण ठेवता येते. याची माहिती अनेक गृहिणींना व कुटुंबप्रमुखास नसते. जवळपास सर्वांकडे स्मार्ट मोबाईल हा असतो. त्यात दोन सिम कार्ड असतात. महिन्यासाठी दोन सिम कार्डमध्ये वेगवेगळे व्हाउचर टाकावे लागतात. जसे टॉकटाईम, नेट पॅक, व्हॅलिडिटी पॅक. प्रत्येकाच्या दिवाणखान्यात टीव्ही असतो. त्यात खाजगी वाहिन्यांचे शुल्क, डिश पॅक हा खर्च वेगळा असतो.

सध्या घरातील मुलांसाठी ऑनलाईनचा क्लास अत्यावश्यक झाला आहे. त्यासाठी नेट पॅक किंवा वायफायचा नेटवरील खर्च वाढत आहे. असा खर्च हा एकत्रित कुटुंबावर न होता, कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर होणारा खर्च वाढतोय. ज्यात वाहन दुरुस्ती, पेट्रोल खर्च इत्यादी. त्यामुळेच अशा होणा-या खर्चावर नियंत्रण कसे ठेवायचे हा प्रश्न सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. अनेकांना यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. लॉकडाऊनच्या काळात पेट्रोलचा खर्च कमी झाला असला तरी किराणा मालावरील होणारा खर्च वाढला आहे. तसेच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी औषधे व दवाखान्याचा खर्च देखील वाढत गेला. त्यात प्रत्येक कुटुंबाचे बजेट कोलमडले. सध्या कुटुंबप्रमुख असेल किंवा कुटुंबकर्ता बिघडलेले अर्थनियोजन सुधारण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण क्षमतेनुसार प्रयत्न करताना दिसून येत आहे.

कौटुंबिक अर्थव्यवस्थापन किंवा अर्थनियोजन करण्यासाठी कुटुंबातील आर्थिक प्रश्न माहीत असायला हवा. त्याची उकल योग्य पद्धतीने करण्यासाठी घरातील सर्व सदस्यांचा सर्वांगीण पाठिंबा मिळावा लागतो. त्यात सर्वांचा सकारात्मक सहभाग असावा लागतो. खर्चाच्या बाबतीमध्ये असे आपणाला म्हणता येईल. सध्या आपली स्वत:ची गुंतवणूक कायम राहण्यासाठी वेळेवर व नियमित हप्ते द्यावे लागतात. अनेक जण बँक खात्यावरील ऑटो डेबिटची सुविधा वापरतात तरी खबरदारी म्हणून हप्त्याची रक्कम त्या गुंतवणुकीमध्ये जाते काय? याची खात्री करून घ्यावी लागेल. कारण ऑटो डेबिटच्या सुविधेची जबाबदारी बँकेबरोबरच त्या व्यक्तीचीही असते हे लक्षात ठेवावे. अन्यथा ‘आंधळं दळतंय आणि पीठ मात्र दुसरं कोणी तरी खातंय’ अशी अवस्था होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे ठरते.

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या