25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeविशेषलहान मुलांनी ऐकावं म्हणून...

लहान मुलांनी ऐकावं म्हणून…

एकमत ऑनलाईन

आपल्या मुलांनी आपलं ऐकावं असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. आपल्या मुलांनी ऐकलेली प्रत्येक गोष्ट पालकांना आनंद देणारी असते पण असे ऐकण्याचे क्षण प्रत्यक्षात कमीच असतात. आपली मुलं शांतपणे खेळत असली की, आपल्याला त्याचं प्रचंड कौतुक वाटतं. मला वाटतं या धारणांना आपण नीट आकलन करून घेतलं पाहिजे. मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे याला आपण जेवढं नैसर्गिक अगदी सहज समजतो तसंच आपण देखील मुलांचं सहज नैसर्गिकपणे ऐकतो का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे की, आपण मोठे आहोत आपल्याकडे अधिकार आहेत म्हणून आपल्या मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे, हा विवेकनिष्ठ विचार आहे का? याची तपासणी केली पाहिजे.

पालकांचं मन सतत भूतकाळात डोकावतं. ज्या पालकांचे मन भूतकाळात नेहमीच राहत असतं ते, आपल्या मुलांशी सहज संवाद साधू शकत नाहीत. मुलांनी केलेल्या प्रत्येक नव्या चुकीला भूतकाळाची जोड दिली जाते. मुलं भूतकाळात काय घडलं हे सहज विसरतात आणि नेहमी वर्तमानात राहतात; म्हणून ते नेहमीच आनंदी असतात. आपण नेहमीच भूतकाळातील घटनांची आवर्तनं करतो आणि वाईट अनुभवांचे ओझे वाहत राहतो. म्हणून जेव्हा मुलं आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण त्यांचे ऐकण्याची आणि त्यांना समजून घेण्याची कोणतीही पूर्व अट घालू नये. आपण एक जबाबदार प्रौढ म्हणून नेहमीच वर्तमानात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय ऐकलं पाहिजे.

सतत नकारात्मक संवाद आणि दृष्टिकोन – ‘‘तू गप्प बस बरं तुला काय कळतं रे यातलं? जा बरं इथून’’ हा संवाद मुलांचे खच्चीकरण करतो. मुलांना याचा त्रास होतो. असं म्हटलं जातं की शरीराला झालेली जखम लवकर बरी होते पण मनाला झालेली जखम लवकर भरून येत नाही. त्यातही मुलं तर फार नाजूक मनाची असतात. आपण सांगितलेलं आई किंवा बाबांना कळत नाही याचे दु:ख मुलांना लगेच होते. म्हणून मुलांशी बोलताना त्यांना आपण ऐकत आहोत संपूर्णपणे ऐकत आहोत याची अनुभूती आपल्या संवादातून गेली पाहिजे. मुलांशी संवाद असा करा की, त्यांना हुरूप आला पाहिजे. प्रोत्साहन वाटलं पाहिजे.

पालक आपल्या चुका मुलांसमोर स्वीकारत नाहीत. आपल्या मुलांच्या समोर आपण सतत आदर्श आहोत याचा अट्टाहास काही पालक करतात. आपणही माणूस आहोत. आपल्याकडूनही चुका होऊ शकतात. ती चुका होण्याची मुभा खूपच कमी पालक स्वत:ला देत असतात. खरं तर प्रत्येक पालकाने स्वत:ला चुकण्याची आणि अपयशी होण्याची मोकळीक दिली पाहिजे. मुलं आपल्या आईबाबांच्या वागण्याची नक्कल करत असतात म्हणून त्यांच्यासाठी तरी आपण अस्सल माफी मागायला हवी. मुलं आपल्याकडूनच शिकत असतात. जेव्हा आपण आपल्या चुका लपवतो, तेव्हा आपण तणावग्रस्त होतो. मुलांना आपल्या सर्व चुका जाणवतात. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या चुका स्वीकारत नाही, तेव्हा त्यांना वाटतं, की, ‘माझे आई आणि बाबा त्यांच्या चुका स्वीकारत नाहीत, मग मी का स्वीकारू?’ यामुळे मुलं आणि पालक यांच्या नात्याला सूक्ष्म तडे जायला लागतात. जे आपल्याला प्रत्येकवेळी दिसतातच असे नाही.

कामठा फाट्यावरील ३५ राजस्थानी कुटुंब घराकडे रवाना

सतत मुलांमधील दोष शोधणे : जर सतत आपण आपल्या मुलांचे दोष शोधत राहिलो तर मुलांशी वागताना आपण ताणात राहू अशावेळी मुलांचे दोष शोधण्यापेक्षा त्यांच्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या लहान गोष्टींचे कौतुक करायला हवे आणि मोठ्यांनाही कौतुक नेहमी आवडते. मुलांना तर त्यामुळे खूप प्रसन्न वाटते. आपण सकारात्मक गोष्टींचा विचार आणि चर्चा केली तर मुलांनाही तीच सवय लागते. आपले पालक आपल्यासोबत आहेत असे त्यांना वाटते. अर्थात चुकीच्या, गंभीर वर्तनाची नोंद देखील नक्कीच घ्यायला हवी. मुलांशी सतत अधिकाराने बोलणे: कोणताही पालक आपल्या मुलाला प्रेमाने हळुवार संवाद साधण्यापेक्षा अधिकाराने बोलत असेल तर ते मुलांना आवडत नाही, जे मोठ्यांना आवडत नसतं ते लहानग्यांनाही आवडत नसतं, तेव्हा त्यांना संयतपणे सांगणं ‘‘आपण हे असं करुयात का? तुला काय वाटतं?’’ या एका वाक्याने मुलांचे चेहरे उजळतात.

अनेकदा नियोजन नसताना मुलं आपल्याला पालक बनवतात. पण एक गोष्ट आपण कायम ध्यानात ठेवली पाहिजे की, त्यांच्यामुळे आपण वेगळा अनुभव घेतो. मूल हे माझं जरी असलं तरी सुध्दा ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, त्याचे विचार आणि आवडी नेहमीच चुकीच्या असणार नाहीत. एका औषध कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार डॉक्टरांनी रुग्णांना दिलेला सल्ला घरी जाईपर्यंत ४०-८० टक्के रुग्ण एक तर पूर्णपणे विसरतात किंवा चुकीचे तरी ऐकतात. आपली तर इथं लहान मुलं आहेत. ती काही वेळा विसरू शकतात म्हणून मुलांना स्पष्ट बोलणे, त्यांच्या नजरेला नजर देऊन संवाद करणे आणि ती सुध्दा आपल्याला मिळालेली सुंदर भेट आहेत.

शेवटी एक लक्षात ठेवायला हवं की, प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो, त्याच्या सवयी, आवडी-निवडी भिन्न असू शकतात. आमच्या शेजारी परी राहते. ती सतत मुलांसोबत खेळते, तिलाही मुलांसारख्याच गोट्या खेळायला आवडतात पण म्हणून प्रत्येक वेळी तिची आई ‘‘तू मुलांबरोबर गोट्या कशा काय खेळतेस?’’ म्हणून तिला टोमणे मारत नाही. तर तिची आवड जोपासते. याव्यतिरिक्त मूल का ऐकत नाही तर कोणत्याही गोष्टींचे योग्य स्पष्टीकरण न देणे ही पालकांची सवय असते. ‘‘तू लहान आहेस. तुला काय कळतं!’’ असा संवाद मुलांशी जेव्हा आपण करतो याचा अर्थ आपण त्याच्या व्यक्तित्वाचा मनापासून स्वीकार केलेला नाही. तो जसा आहे तसा स्वीकार जेव्हा होईल तेव्हा, मूल आणि पालक यांच्यामधील अंतर नक्कीच कमी होईल तसेच त्यांच्यामधील नाते अधिक प्रगल्भ बनेल.

प्रा. पंचशील डावकर
मो. ९९६०० ०१६१७

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या