25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeविशेषआनंददायी शिक्षणासाठी...

आनंददायी शिक्षणासाठी…

एकमत ऑनलाईन

अलीकडेच एका अल्पवयीन मुलाने स्वत:ची सिगारेटची सवय भागविण्यासाठी मित्राने पैसे दिले नाहीत म्हणून त्याचा खून केला. आपण काय करतो आहोत याचा विचार करण्याची क्षमताच विद्यार्थ्यांनी गमावली आहे. विद्यार्थी स्वत:चे अपयश, राग, ताणाला नियंत्रित करू शकत नाहीयेत. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागणारी मानसिक स्थिती निर्माण करणे, समायोजन करणे या गोष्टी घडताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, सामाजिक, भावनिक कौशल्य विकसित करणे, ताणतणाव व्यवस्थापनास सक्षम करणे, स्वची जाणीव विकसित करणे, समस्या निराकरणास सक्षम बनविणे, शिकण्याविषयी भीती, नैराश्य दूर करणे यासाठी आनंददायी अभ्यासक्रमाची सुरुवात झाली आहे.

राज्यात कोरोनानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मुलांच्या अध्ययनाच्या सवयी बदलल्या आहेत. मुलांच्या हाती आलेला मोबाईल सुटायचे नाव घेत नाही. अभ्यासाची वृत्ती हरवते आहे. हरवलेली वृत्ती पुन्हा रुजविण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. त्याचवेळी समाजातही विविध कारणांनी ताणतणाव आहेत. जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरणाचा परिणाम केवळ भौतिक विकासावर आहे असे नाही तर त्याचा काही प्रमाणात दुष्परिणाम समाजमनावर होतो आहे. त्या अस्वस्थतेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होतो. शेवटी विद्यार्थी देखील समाजाचा घटक आहेत. त्यांचेही मन निराशेने ग्रस्त होण्याची शक्यता असते. त्यांना प्रसन्नचित्त, आनंदी ठेवण्याचे आव्हान आहे.

जगाच्या पाठीवर काही राष्ट्रांनी आपली शिक्षण-व्यवस्था अर्थाशी जोडण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या चीनने शिक्षणाचा विचार उत्पादनाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यात यशही आले. त्या यशानंतर उभ्या राहिलेल्या तरुणाईच्या हाताला पैसा मिळाला, पण जगण्यातील आनंद हिरावला गेला. निराशेच्या छायेत सारे काही घडू लागले. पैसा आला म्हणजे सारे काही मिळते हा गैरसमज आहे. जीवनात आनंद ही गोष्ट केवळ भौतिक सुखाने मिळणारी मात्र नाही. त्यासाठी निसर्गाच्या सोबत जगणे, स्वत:चा शोध घेणे, अभिव्यक्त होणे, छंद जोपासणे, खेळणे, कृती करणे, आनंदाच्या सवयी वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. त्याकरिता वेळ द्यावा लागेल. आजच्या धावपळीत असा वेळ देणे घडत नाही. विद्यार्थी शाळेत जाणे, शिकवणीला जाणे, अभ्यास करणे यांसारख्या प्रक्रियेत सारी धावपळ सुरू आहे. एकूणच स्वत:साठीचा विचारच हरवलेला दिसतो आहे. त्यातून मानसिक रुग्णता, शारीरिक व्याधी, ताणतणाव, संताप व्यक्त होण्याच्या गोष्टी वाढताना दिसत आहेत.
अलीकडची एक घटना. एका अल्पवयीन मुलाने स्वत:ची सिगारेटची सवय भागविण्यासाठी मित्राने पैसे दिले नाहीत म्हणून त्याचा खून केला. आपण काय करतो आहोत याचा विचार करण्याची क्षमताच विद्यार्थ्यांनी गमावली आहे. विद्यार्थी स्वत:चे अपयश, राग, ताणाला नियंत्रित करू शकत नाहीत.

परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागणारी मानसिक स्थिती निर्माण करणे, समायोजन करणे या गोष्टी घडताना दिसत नाहीत. त्यातून आत्महत्या करणे, हल्ला करणे या गोष्टी घडत आहेत. उद्याची पिढी अशी तणावयुक्त निर्माण झाली तर आपण समाजाचे भले कसे करणार हा प्रश्न आहे. सध्या विद्यार्थ्यांवर शिकण्याचा, परीक्षेचा तणाव असल्याचे बोलले जाते; मात्र तणावमुक्तीचे मार्ग माहीत नसल्याने ते चुकीच्या दिशेने पावले उचलतात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, सामाजिक, भावनिक कौशल्य विकसित करणे, ताणतणाव व्यवस्थापनास सक्षम करणे, स्वची जाणीव विकसित करणे, समस्या निराकरणास सक्षम बनविणे, शिकण्याविषयी भीती, नैराश्य दूर करणे यासाठी आनंददायी अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. उद्दिष्टांचा विचार केला तर ती व्यापक आहे. मात्र ती साध्य होऊ शकली तर आपल्याला निश्चित उत्तम समाजनिर्मितीच्या दिशेचा प्रवास घडविता येईल. यासाठी शासनाने सजगता, गोष्ट, कृती, अभिव्यक्त, छंद यांसारख्या विविध उपक्रमांचा विचार केला आहे. त्या उपक्रमांचे नियोजनही करून देण्यात आले आहे. त्यात आठवड्याचे दोन दिवस कथा, कृती व एक दिवस सजगता आणि अभिव्यक्ती अशा प्रकारचे उपक्रम सुचविले आहेत. जीवनात सजगता ही सर्वांत महत्त्वाची आहे.

दिल्लीच्या शाळांमध्ये झालेला बदल सजगतेने झाला आहे. आपल्या देशात योग ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक बदल घडविता आले आहेत. त्यामुळे या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करण्याच्या दृष्टीने समजपूर्वक श्वसन प्रक्रिया जाणता येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीचा विचार करण्यात आला आहे. अनेकदा आपण भोवताल ऐकत असतो, मात्र स्वत:ला ऐकण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. व्यक्तीला स्वत:ला ऐकावे असे वाटत नाही. माणसं जितकी स्वत:ला ऐकत जातील तितक्या मोठ्या प्रमाणात बा संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वत:ला ऐकणे ही महत्त्वाची प्रक्रिया असून तिचा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या हृदयाचे ठोके जाणणे, मुक्त हालचाली, निर्माण होणा-या ताणावर लक्ष देणे यातून जी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे भावनेवर नियंत्रण ठेवणे आणि तोही विचार यात केलेला आहे. याखेरीज स्वच्छता, जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

प्रत्येक व्यक्तीला बोलावे वाटणे ही साहजिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे त्या प्रवृत्तीचा विचार करत आपले अनुभव, विचाराचे चित्रांकन करणे किंवा शब्दांकन करण्याची संधी उपलब्ध देण्यात आली आहे. अभिव्यक्ती हा तणावमुक्तीचा विचार आहे. मुलांना व्यक्त होण्यासाठी तशी फारशी संधी मिळत नाही. मात्र या निमित्ताने मिळणारी संधी मुलांना तणावापासून मुक्ती देऊ शकेल. बालकाच्या आयुष्यात गोष्ट ही महत्त्वाची असते. समाजात आजही अनेकांचे आयुष्य गोष्टीमुळे घडले आहे. खरंतर गोष्ट म्हणजे बालकांचा आनंद आहे. गोष्ट ही श्रवण कौशल्य विकासाची वाट आहे. गोष्ट म्हणजे आनंद. गोष्ट म्हणजे संस्कार. गोष्ट म्हणजे मूल्यांची पेरणी असते. मुलांचे भावविश्व समृद्ध करणे असते. त्यामुळे रोज एक गोष्ट हा विचारच मुलांना आनंद देणारा ठरू शकतो. शिक्षणाशी त्यांना जोडू शकतो. गोष्टींची वाट म्हणजे काय हे इसापच्या आयुष्याकडे पाहिले की सहजपणे लक्षात येते. त्यामुळे शिक्षकांनी गोष्ट सांगणे आणि त्यासंबंधी प्रश्न विचारणे अपेक्षित केले आहे. अर्थात गोष्ट ही आनंद देणारी असावी हे खरेच; पण त्यातून अभ्यासक्रमाची गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्यांची जाणीव करून देणा-या असायला हव्यात हेही लक्षात घ्यायला हवे.

मुलांचे शिक्षण आनंददायी करणे म्हणजे क्रीडन पद्धतीने मुलांना पुढे घेऊन जाणे आहे. शाळेत खेळाच्या तासाचा समावेश केला आहे त्यामागे शारीरिक विकास महत्त्वाचा आहे. त्यातून मुलांचा सामाजिक विकास, सहकार्य, पराभव पत्करणे, विजयाचा आनंद घेणे आणि तोही विनम्रतेने स्वीकारणे, आनंद मिळवून देणे घडत असते. यासाठी अनेक प्रकारच्या कृती आपण करत असतो. त्या दृष्टीने काही उपक्रम सुचविले आहेत. गोलातील गप्पा, सहाध्यायी जोडी, सवयी सांगणे, हास्य क्लब, माझे शरीर, चेंडूचे खेळ, अंताक्षरी, ऐका करा, आकार बनविणे, सापशिडी, माझी आवड, चला शोधू, आठवडी बाजार, कलाकार, लेखक यांचे अनुभव व सादरीकरण यांसारख्या उपक्रमांच्या अपेक्षा करण्यात आल्या आहेत. खरंतर या सा-या गोष्टी म्हणजे काही वेगळे आहे असे नाही तर या सर्व गोष्टी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उद्दिष्टे साध्य करण्याची प्रक्रिया आहे. अभिव्यक्तीचा विचार देखील करण्यात आलेला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रसंग नाट्य, चालता बोलता कला-क्रीडा, कार्यानुभव उपक्रम, बोली भाषेकडून प्रमाणभाषेकडे, गीतमंच, बातम्या वाचन, संवाद, निवेदन, भूमिका अभिनय, मुलाखत, बालसभा, अवांतर वाचन, कविता गायन, प्रश्नपेढी, सूत्रसंचालन यांसारख्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यातील काही गोष्टी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे तंत्र म्हणून समाविष्ट आहे. जेव्हा आपण अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याचा विचार करतो तेव्हा विविध प्रकारचे अध्ययन अनुभव देणे अपेक्षित आहे. त्या अध्ययन अनुभवांचा विचार केला तर आनंददायी अभ्यासक्रमाची गरज नाही. मुळातच आपल्या असलेल्या अभ्यासक्रमाचा विचार करताना या सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे. मात्र सातत्याने पाठ्यपुस्तक आणि परीक्षा केंद्रीत शिक्षणाचा विचार केला जात असल्याने या गोष्टी करण्याकडचा शाळांचा कल कमी होतो आहे. पालकांना या कृती म्हणजे टाईमपास वाटू लागतात. त्यामुळे आता सरकारनेच त्यावर लक्ष केंद्रित केल्याने किमान अंमलबजावणीची शक्यता आहे. खरेतर या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे आता धोक्याचा इशारा मिळाल्यावर तरी योग्य वाटेने जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे यातील अनेक गोष्टी शाळेच्या बाहेर करणे शक्य आहे. मुलांना आनंदी शाळेत ठेवण्याचा प्रयत्न होईल.

-संदीप वाकचौरे,
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या