22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेषश्वासावानी विलासरावजींच्या सुवासी आठवणी !

श्वासावानी विलासरावजींच्या सुवासी आठवणी !

एकमत ऑनलाईन

माता सुशीलादेवी व पिता दगडोजीराव देशमुख या शेतकरी कुटुंबात २६ मे १९४५ रोजी विलासरावजींचा जन्म झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत विलासरावांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे त्यांनी बी. एस्सी. व बी. ए. या दोन शाखांचे पदवीधर होऊन पुणे विद्यापीठाची एलएल. बी. ही पदवी घेतली. १९७० ला लातुरात वकिली सुरू केली. १९७२ ला सर्वत्र दुष्काळ पडलेला होता. मोटारसायकलवर फिरत जनसामान्यांच्या या झळा त्यांनी जवळून पाहिल्या व त्यांचे मन या वेदना निवारण्याकडे वळायला लागले. १९७४ ला विलासरावजी व त्यांचे लहान बंधू दिलीपरावजी या दोघांच्या राजकारणाची एकदाच बाभळगाव ग्रामपंचायतीतून सुरुवात झाली. विलासरावजी बाभळगावचे सरपंच झाले. थोड्याच दिवसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या. तेव्हा आपला उस्मानाबाद जिल्हा होता. ते निवडून आले. लातूर पंचायत समितीचे उपसभापती झाले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची वाटचाल वाखाणण्याजोगी होती.

१९८० ला पहिल्यांदा ते आमदार झाले. नेतृत्व, वक्तृत्व व कर्तृत्व यांचा त्रिवेणी संगम या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वात असल्याने २० जानेवारी १९८२ ला राज्यमंत्री म्हणून सत्तेचा प्रवास सुरू झाला. कृषी, ग्रामविकास, शिक्षण, गृह, तंत्रशिक्षण आदी खात्यांत त्यांनी प्रभावीपणे यशस्वी कामगिरी केली. १९८६ ला महसूल, सहकार खात्याचे कॅबिनेट मंत्री बनले. १९९० ला कृषी, १९९१ ला उद्योग तर पुन्हा महसूलमंत्री झाले. आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. यशाने हुरळून न जाता जमिनीशी नाळ कायम ठेवून पराभवानेही खचले नाहीत. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी शून्यातून भरारी घेतली. मतदारसंघाला आई म्हणून, जे जे नवे ते ते मतदारांच्या विकासासाठी हवे अशी भूमिका घेतली. जे पोटात आहे तेच ओठात असण्याची अंतर्बा निर्मळ भूमिका यामुळे अवतीभोवती माणुसकीच्या दर्दीपणाची गर्दी कायम राहिली. समयसूचकता, निर्णयक्षमता, हजरजबाबी, विनोदी शैली व स्मरणशक्ती यामुळे त्यांची लोकप्रियता सर्वत्र वृद्धिंगत होत राहिली. सतत वादळांशी संघर्ष करताना ते डगमगले नाहीत. पक्षश्रेष्ठींचा व जनसामान्यांचा त्यांच्यावरील विश्वास वाढत राहिला. त्यांच्यातील आत्मविश्वास आकाशाला गवसणी घालत राहिला.

त्यामुळेच १८ ऑक्टोबर १९९९ ला ते महाराष्ट्राचे एकेविसावे मुख्यमंत्री झाले. १८-१८ तास कार्यरत राहिले. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व मने जिंकत राहिले. त्यांच्या काळात अनेक दीर्घोपयोगी लहानसहान पण महान निर्णय झाले. ५६ वर्षांत अनेक मुख्यमंत्री झाले पण माहितीचा अधिकार कायदा झाला. गुटखाबंदी, निराधारांच्या, ग्रामपंचायत सरपंचांच्या, स्वातंत्र्यसैनिक व कोतवालांच्या मानधनात वाढ, लघु उद्योगांना चालना, झोपडपट्टी विकास, इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषय, आरोग्य सेवांचे बळकटीकरण, गरजवंतांना रेशनचा लाभ, प्रशासनात संगणकीकरण, देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी कायदा, आदी हजारो योजना निर्णय जनहिताचे राहिले. कै. वसंतराव नाईक यांच्यानंतर ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्राचा नावलौकिक आपल्या दूरदृष्टीने ते उज्ज्वल करत राहिले. विलासरावजींनी जो विकासाचा झेंडा फडकावला त्या झेंड्याचे मानदंड, कल्पकता दिलीपरावजी असायचे. कला, साहित्य, संगीत, क्रीडा यांचे ते केवळ चाहतेच नव्हते तर या कलावंतांना प्रेरणा देणारे पाठबळ होते. राजाश्रय होते.

सन २००९ पासून केंद्रात अवजड उद्योग, ग्रामविकास, पंचायतराज, विज्ञान-तंत्रज्ञान आदी खात्यांचे मंत्री राहिले. राज्यात त्यांना अनेक खात्यांचा अनुभव सतत उपयुक्त ठरला. आपणास माहीत आहे अनेक वादळवा-यात लातूरचा सहकार ताठ मानेने उभा आहे. मी एके ठिकाणी म्हणूनच म्हटले,
काडीचा नव्हता भाव
त्या माळांचे झाले सोने
शिवरायांच्या वाटा सा-या
गाती साखरेचे गाणे
खरं तर अनेकजण सत्तेवर असताना शिक्षणसंस्थांचे जाळे विणतात, पण विलासरावांनी पहिल्याप्रथम अपंग, मूक-बधिरांसाठी शाळा काढली व पुढे काही आदर्श शाळाही उभा केल्या पण या सर्व शिक्षणसंस्थांची समिती सार्वजनिक आहे. बाभळगावचा सार्वजनिक व सर्वधर्मीय दसरा मेळावा हा तर देशात आदर्शवत कुतुहलाचा अनमोल ठेवा आहे. कोण आपल्या राजकीय विरोधात आहे, कोण आपल्याविरुद्ध लिहितो म्हणून आकस, सूड वगैरे संकुचित भावना त्यांच्यात तीळभरही आढळली नाही. सतत विकासाचा ध्यास होता. म्हणून-
विकासाच्या सूर्या
तुझे तळपणे
जसे उजाड रानी
पुन्हा पुन्हा कोळपणे
असे माझ्या एका कवितेत म्हटले आहे. लातूरकरांसाठी बरेच केले. ते स्वत: म्हणायचे वाढपी आपला असला म्हणजे पोट भरते. अनेक क्षेत्रांत त्यांचा आजही आदर्श आहे. बोलणे सोपे पण कृती अवघड असते म्हणून तर आजही बाभळगावची गढी म्हणत असेल-
बरे नाही निंदकांचे
सदा हाय खाणे
आम्ही चालून दाखवतो.
बंद पडलेले कारखाने
लातूरची रेल्वे धावताना एकदा मी एका कवितेत म्हटले-
स्वस्त, रास्त अन् मस्त
साहेबांनी निर्मिली सृष्टी
आजी-आजोबा
आता नातवाला सांगू लागले
रेल्वेत विलासरावांच्या गोष्टी!

ऊर भरून यावा अशा त्यांच्या अनेक सुखद बाबी सुखावून जातात. हरेक सामान्य माणसाजवळ त्यांच्या आठवणी आहेत. भूकंपाच्या काळात धावून जाणारे हे मन आजही आठवते. आजच्या ७७ व्या जयंतीदिनीच काय, पण शेकडो वर्षे त्यांच्या आठवणी फुललेल्या असतील. माझ्या वैयक्तिक आठवणी सांगायला-लिहायला बसलो तर हजारो पाने भरतील. १४ ऑगस्ट २०१२ ला आदरणीय विलासरावजी देशमुख देहाने दुरावले तरी ध्येयाने आजही आहेत अन् उद्याही चिरंतन, चिरतरुण व चिरसुंदर असतीलच, कारण त्यांच्या आठवणी श्वासावानी सुवासी आहेत.

-भारत सातपुते
प्रकाश नगर, लातूर
८०८७६ ९५०००

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या