26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeविशेषमैत्री म्हणजे...

मैत्री म्हणजे…

मैत्री ही एक प्रकारची सहभावना आहे. मैत्रीची व्याख्या करायची झाल्यास ते एक असं नातं आहे जिथं कोणत्याही प्रकारचा फिल्टर लागत नाही. ज्या व्यक्तीसमोर आपण जसे आहोत तसे, कुठल्याही मतांची, जजमेंटची भीती न बाळगता व्यक्त होऊ शकतो, वावरू शकतो, बोलू शकतो अशी एक हक्काची जागा म्हणजे मित्र. मैत्रीसाठी एकच दिवस ठरवून चालणार नाही. तो जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. आपण आईवडिलांबरोबर राहतो, वागतो. तीच जागा मैत्रीची असते. रोजच्या जगण्याचा तो एक भाग असला पाहिजे. मैत्री, प्रेम या गोष्टींची जाणीव रोज व्हायला हवी.

एकमत ऑनलाईन

मैत्री ही अत्यंत निर्मळ गोष्ट आहे. पण काळाबरोबर मैत्रीचे स्वरूप बदलले आहे. प्रत्यक्ष शाळा-कॉलेजातील मैत्री आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या समाजमाध्यमांवरील मैत्री यामध्ये खूप फरक आहे. आज ज्या सहजतेने, सुलभतेने आणि भरघोस प्रमाणात मैत्रीचे संदेश पाठवले जातात त्या सर्व पार्श्वभूमीवर मैत्रीविषयी खूप प्रश्न पडतात. समाजमाध्यमांवर नियमित संदेश पाठवून आपले गुणगान करणारे आपले मित्र आहेत की ज्यांना आपण दोन-दोन महिन्यांनंतर भेटल्यावरही आपल्याला आनंद होतो ते आपले मित्र आहेत, असा प्रश्न पडतो.

माझ्या मते, फोन किंवा इतर कोणत्याही माध्यमांच्या मदतीशिवाय समोरासमोर बसून आपण अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधू शकतो ते आपले खरे मित्र आहेत असे मला वाटते. त्यामुळे यावर्षीच्या मैत्रीदिनाच्या निमित्ताने बोलताना मला आवर्जून सांगावेसे वाटते की समोरासमोर बसून गप्पा, चर्चा करता येतील असे भरपूर मित्र आपल्याला असावेत. एखाद्याला भेटल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढून ही माझी खूप चांगली मैत्रीण किंवा मित्र आहे असे सोशल मीडियावर पोस्ट करण्यापुरती मैत्री असण्यापेक्षा ज्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवता यावा असे वाटते अशी मैत्री नक्कीच खास असते.

मुळातच, मैत्री ही एक प्रकारची सहभावना आहे. मैत्रीची व्याख्या करायची झाल्यास ते एक असं नातं आहे जिथं कोणत्याही प्रकारचा फिल्टर लागत नाही. ज्या व्यक्तीसमोर आपण जसे आहोत तसे, कुठल्याही मतांची, जजमेंटची भीती न बाळगता व्यक्त होऊ शकतो, वावरू शकतो, बोलू शकतो अशी एक हक्काची जागा म्हणजे मित्र. आज बदलत्या काळामध्ये प्रत्येकाचा दिनक्रम अत्यंत व्यस्त बनला आहे. त्यामुळे मैत्रीसाठी अनेक माध्यमे गरजेची झाली आहेत. अर्थात, माध्यमांचा शिरकाव झाल्यामुळे मैत्री कृत्रिम झालेली नाही. पण एखादे नाते तयार होण्यासाठी, ते खुलण्यासाठी, उमलण्यासाठी मेहनत घेण्याची मानसिकता मात्र आज कमी होत चालली आहे.

आजच्या इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया यांनी जीवन व्यापून टाकलेल्या काळात माध्यमांच्या मदतीने आपण एखादी शुभेच्छांची पोस्ट टाकून त्या व्यक्तीला टॅग करतो. तिथेच न थांबता ‘तू कशी आहेस?’ अशी विचारणाही करतो; पण असे विचारताना तिच्या आयुष्यात नेमके काय चालले आहे हे जाणून घेण्यात खरंच रस असतो का? की केवळ गरज आहे म्हणून एकमेकींचे फोटो समाज माध्यमांतून टाकून आम्ही कशा घट्ट मैत्रिणी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो? या प्रश्नांचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. मैत्रीचं नातं हे निरपेक्ष असलं पाहिजे. तिथे स्वार्थाचा लवलेशही नसला पाहिजे. काहीही फायदा नसताना एकमेकांना केवळ निखळ प्रेम, आनंद देणं म्हणजेच मैत्री आहे. तशी मैत्री आपली किती जणांशी आहे याचा शोध प्रत्येकाने घ्यायला हवा.

माझ्याबाबत सांगायचं तर मला अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. मी प्रसिद्ध व्यक्ती आहे म्हणून किंवा ते माझे कौतुक करतात म्हणून आमची मैत्री नाही. या ग्लॅमरच्या, प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन आमची मैत्री आहे. त्यामुळेच आम्ही अक्षरश: सहा-सहा महिने एकमेकांना भेटलो नाही तरीही आमच्यातील मैतरभाव तसाच कायम आहे. त्यांना वेळ असतो तेव्हा त्या वेळेचे नियोजन करून भेटायला येतात आणि मीही त्यांच्यासाठी वेळ काढून भेटते. माझे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत ज्यांना मी कित्येक महिन्यांपासून भेटलेही नाही पण त्यांच्या मनात माझ्याविषयी आत्यंतिक प्रेम आहे आणि ते एकतर्फी नसून दुतर्फा आहे. एकमेकांना भेटून मिळणा-या आनंदाव्यतिरिक्त आम्ही एकमेकांना काहीही देत नाही.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मित्र-मैत्रिणी भेटत असतात. त्यांच्याशी मैतरभाव आपसूक जुळतो. अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर मी ‘दिल दोस्ती दुनियादारी’सारखी मालिका केली. या मालिकेतील आमची संपूर्ण फौज एकमेकांच्या अत्यंत जवळ आहोत. आमची अत्यंत घट्ट मैत्री आहे. अमेय, पुष्कराज आणि सुव्रत यांना मी आधीपासूनच ओळखत होते. पण सखी आणि पूजा माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या. जवळपास दोन वर्षे ही मालिका चालली. साहजिकच हा संपूर्ण काळ नित्यनेमाने आम्ही एकमेकांबरोबर होतो. इतक्या प्रदीर्घ काळात प्रत्येकाने एकमेकांच्या स्वभावाचे सर्व मानवी रंग पाहिले-जाणले आहेत. माणूस हरेक प्रसंगात आनंदी राहू शकत नाही. तो कधीतरी चिडतो, रागावतो, वैतागतो. या सर्व भावनिक परिस्थितीशी एकमेकांनी एकमेकांना जुळवून घेऊन, स्वीकारून ही मैत्री पुढे नेली आहे.

मैत्री आणि मित्र यांच्याविषयी खूप सांगण्यासारखं, बोलण्यासारखं असतं. मित्रांसोबतच्या आठवणीही इतक्या असतात की चटकन एखादी सांगायची म्हटलं तर आठवत नाही. कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक भावभावना समजून घेऊन मैत्रीचं नातं खुलत जातं आणि पुढे ते फुलतही जातं. त्यामुळेच मला यासाठी एखादा दिवस असावा हे पटत नाही. कोणत्याही एका दिवशीच ती गोष्ट करून काहीच फायदा होत नाही. मैत्री, प्रेम किंवा अगदी व्यायामाचे उदाहरण घेतले तर त्यासाठी एकच दिवस ठरवून चालणार नाही. तो जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे.

(शब्दांकन : हेमचंद्र फडके)
-स्वानंदी टिकेकर, अभिनेत्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या