24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषविश्वव्यापी गणेशा...

विश्वव्यापी गणेशा…

एकमत ऑनलाईन

भारतामध्ये गणेशपूजनाचे महत्त्व पुरातन काळापासून आहे. श्रीगणेशाला आद्य दैवत म्हणून संबोधले गेले आहे. मात्र केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशाची पूजा-उपासना होताना दिसते. सम्राट अशोकाच्या कन्येने नेपाळची सध्याची राजधानी असलेल्या काठमांडू येथे गणेश मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. परंतु नेपाळमध्ये पूर्वीपासूनच गणेशपूजन केले जात होते. तिथे गणेशाला ‘सूर्य विनायक’ या नावानेही ओळखले जाते. तिथे विघ्नविनाशक देवता म्हणून गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो. नेपाळप्रमाणेच तिबेटमध्येही भारतीय संस्कृती पसरलेली होती. तिथेही याच प्रकारे गणेशपूजन केले जाते. तेथील प्राचीन मठांमध्ये गणेशाच्या पूजनाची परंपरा आहे. नवव्या शताब्दीच्या पूर्वार्धात तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशपूजन सुरू झाले. भूत, पिशाच्च आणि दुष्ट शक्तींचा विनाशकर्ता म्हणून तिथे गणेशाची ओळख आहे. त्यामुळेच घरांच्या आणि मंदिरांच्या दरवाजांवर गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. जावामध्ये सापडलेली गणेशमूर्ती आज लंडनच्या वस्तुसंग्रहालयात ठेवली गेली आहे.
प्राचीन काळात व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांमुळे भारत आणि हिंदू धर्माचा प्रभाव पूर्व आणि दक्षिण आशियावर मोठ्या प्रमाणावर पडल्याचे दिसून येते. याचा परिणाम परदेशात अनेक हिंदू देवदेवतांची पूजा, आराधना होऊ लागली. त्यात श्री गणेशाचाही अर्थातच समावेश होता. भारताबाहेर जिथे जिथे हिंदू स्थायिक झाले तेथे तेथे त्यांच्या पूजाअर्चांवर स्थानिक प्रभाव दिसून येतो. प्राचीन काळात विविध देशांत ज्या हिंदू संकल्पना आत्मसात करण्यात आल्या, त्या अजूनही त्या देशांमध्ये पाळल्या जातात.

गणेशाची पूजा प्राचीन काळात प्रामुख्याने व्यापारी करत असत, हे लोकच व्यावसायिक कारणांसाठी परदेशात जात असत. एखाद्या राजाने परदेशात लढाईची मोहीम आखली असे भारतीय इतिहासात क्वचित दिसते. पण व्यापार आणि धार्मिक तसेच सांस्कृतिक कारणासाठी भारतीय लोक संपूर्ण आशियात फिरत होते. साधारण इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून भारत आणि इतर देशांमध्ये व्यापारी संबंध अधिकाधिक दृढ व्हायला लागले होते. त्यावेळी व्यापारी संघ तयार होत होते, पैशाचे वहन मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरुवात झाली होती. यावेळीच श्री गणेश हे व्यापा-यांचे प्रमुख दैवत बनले. बाहेर देशात श्री गणेशाची आराधना प्रथम व्यापा-यांनीच करायला सुरुवात केली, अशी इतिहासात नोंद आढळते. आग्नेय आशियात हिंदू धर्माचा प्रसार प्राचीन काळात झाला होता. तेथे गेलेल्या हिंदू व्यापा-यांनी आपला धर्म मलाय द्वीपकल्पावर नेला आणि तेथे त्यांच्याबरोबर गणेशही गेले. मलाय द्वीपसमूहावर गणेशाच्या शंकराबरोबरच्या अनेक मूर्ती सापडतात. जावा, बाली आणि बोर्नियोच्या हिंदूंमध्ये गणेशाच्या विविध रूपांची पूजा केली जाते.

तिबेटच्या बौद्ध धर्मात गणेशाला भव्य रूप दिले आहे. एका तिबेटन संकटांचे निवारण करताना दिसतो. तिबेटी गणपतीही काही वेळा नृत्य करताना दिसतो. गणपती किंवा महारक्त हे गणपतीचे तांत्रिक बौद्ध रूप आहे. चक्रसंवर या तंत्राशी गणेशाचे हे रूप निगडीत आहे. याला तिबेटी भाषेत त्सोग गी दाग पो मार चेन असे म्हणतात. अवलोकतेश्वरापासून गणपतीच्या या रूपाची उत्पत्ती झाली असे मानले जाते. तिबेटी धार्मिक ग्रंथांत गणपतीच्या या रूपाचे सविस्तर वर्णन आढळते. गणपतीचे हे शक्तीरूप तीन शक्तिवान देवतांच्या गटातील आहे. या गटात गणपतीबरोबर कुरूकुले आणि ताकराजा या दोन देवता आहेत. मात्र तिबेटच्या वज्रयान पंथात हत्तीचे डोके असलेल्या आकृतीला विनायक असे संबोधले जाते आणि धर्माच्या रक्षणकर्त्याकडून तिचे पतन केले आहे, असे दाखवण्यात येत आहे. मात्र या पराभवाने विनायक निराश किंवा हताश झालेला दिसत नाही. वज्रयान पंथात आणि त्याच्याशी साधर्म्य असलेल्या बौद्ध कलांमध्ये त्याला अपराजित, पर्णसाबरी आणि विघ्नातक या बौद्ध देवतांकडून पराभूत झालेला दाखवण्यात आले आहे. तिबेटी गणेश अधिक करून ब्रॉन्झच्या मूर्त्यांत दिसतो. पण त्याचबरोबर तिबेटी तांग्का चित्रांमध्येही गणेशाचे भरपूर दर्शन होते. न्यूयॉर्क विद्यापीठातील शास्त्रज्ञ रॉबर्ट एल ब्राऊन यांनी लिहिलेल्या ‘गणेश, स्टडीज ऑफ अ‍ॅन एशियन गॉड’ या पुस्तकात लिहिले आहे की तिबेटी काग्युर परंपरेत मानले जाते की गौतम बुद्धांनी गणपती हृदय मंत्र आपला शिष्य आनंद याला शिकवला होता.

इंडोनेशियातील हिंदू लोकही गणेशाची पूजा करतात. बाली द्वीपावर राजा-राणीच्या मूर्ती बनवल्यानंतर त्या मूर्तींच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती प्रस्थापित केली जात असे. श्रीलंकेत कोलंबोपासून सुमारे दोनशे किलोमीटरवर असलेल्या कदरगाम येथे गणेशाचे भव्य मंदिर आहे. बोर्नियोमध्ये गणेशपूजनाची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. कंबोडिया आणि थायलंडमध्येही गणेशपूजनाची प्राचीन परंपरा आहे. कंबोडियाची प्राचीन राजधानी अंगारकोट येथे तर गणेशमूर्तींचा खजिनाच सापडला आहे. विविध प्रकारच्या रंग-रूपात तिथे गणेशमूर्ती सापडल्या आहेत. ‘प्राहाकनैत’ या नावाने कंबोडियात गणेशपूजा केली जाते. हातात पुस्तक घेऊन बसलेल्या गणपतीची तेराव्या शतकातील प्राचीन मूर्ती इथे आढळते. त्यात गणेशाने कंबोडियन मुकुट घातला आहे. मंगोलियात गणेशाच्या आकाराशी मिळताजुळता आकार असलेल्या एका देवतेची पूजा केली जाते. चीनमध्ये गणेशाला ‘कुआन शी तिएन’ या नावाने ओळखले जाते. तिथे कांतिगेन या नावानेही गणेशाला ओळखले जाते. जपानमध्ये गणेशपूजा चीनमार्गे पोचली. जपानमध्ये गणेशाचा उल्लेख इ.स. ८०६ मध्ये पहिल्यांदा झाल्याचे दिसून येते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कुकाई या बौद्ध धर्मगुरूच्या कालखंडात (इ. स. ७७४ ते ८३५) गणेशाचे अस्तित्व प्रथम जपानमध्ये आढळून आले. कुकाईने जपानी बौद्ध धर्मातील शिंगोन या पंथाची स्थापना केली. जपानमध्ये गणेशाला कांगीतेन या नावानेच जास्त करून ओळखले जाते. गणेशाची पूजा हे या पंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

या पंथाचे गणपतेय पंथाशी खूप साधर्म्य आहे. जपानमध्ये गणपतीला आशीर्वाद देणारा, सुख-समृद्धी देणारा देव म्हणून संबोधले जाते. आध्यात्मिक आणि भौतिक सुखाची देवता म्हणून गणेशाकडे पाहिले जाते. कांगितेन-विनायकाला जपानमध्ये दही, मध आणि पीठ यांचे लाडू, वाईन, ताज्या फळांचा नेवैद्य दाखवला जातो. जपानमध्ये गणेश आपल्याला हिंदू रूपाऐवजी बौद्ध रूपात अधिक दिसतो. टोकियोतील फुताको तामागावा मंदिरात गणेशाची मूर्ती आहे. नारा येथील होझानजी मंदिरात शोंतेनची पूजा मुख्यत्वेकरून व्यापा-यांकडून होताना दिसते. ओसाकामध्ये शोंतेनचे भव्य मंदिर आहे. थायलंडमध्ये गणेशाला पफ्रा पिफकानेत किंवा पफ्रा पिफकानेसवोरा असे म्हणतात. तेथे सरकारी बोधचिन्हात गणेशाला स्थान आहे. गणेशाची अनेक मंदिरे थायलंडमध्ये आहेत. इंडोनेशिया, कंबोडियातही गणेशाची पूजा केली जाते. चीनच्या तून हू आग येथील सन ६४४ मध्ये एका पहाडावर गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्याखाली चिनी भाषेत लिहिले आहे की, हा हत्तींचा राजा आहे. चीनमध्ये उभ्या राहून एकमेकांना आलिंगन देणा-या दोन गणेशांची मूर्ती आढळते. म्यानमारमध्ये गणपतीला महापिनी, नेपाळमध्ये हेरंब विनायक, मंगोलियात घोटाकर आणि तिबेटमध्ये सोकापरक या नावाने ओळखले जाते.

ब्राझीलमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. मस्तक हत्तीचे आणि शरीर माणसाचे अशा प्रकारच्या देवतेचे मेक्सिकोतील लोक आजही पूजन करतात. बुद्धीची रोमन देवता जेनस हिलासुद्धा हत्तीचे मस्तक असते. ती गणेशाच्या समकालीन मानली जाते. तिचे पूजनही मंगळवारीच केले जाते. अठराव्या शतकातील संस्कृतचे प्रकांड पंडित विल्यम जोन्स यांनी जेनस आणि गणेश यांची तुलना करून असा निष्कर्ष काढला आहे की गणेश आणि जेनस यांच्यात कमालीचे साम्य आढळते. गणेशाची सर्व वैशिष्ट्ये जेनसमध्येही आढळतात. रोमन आणि संस्कृत शब्दांच्या उच्चारांतही साम्य आढळते. जेनस आणि गणेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हनोई येथे विघ्नेश्वर असे गणपतीचे नाव असून तो कमळात बसलेला असतो. ‘गणेश-अ मोनोग्राफ ऑफ द एलिफंट फेस्ड गॉड’नुसार, जगाच्या कित्येक भागांत गणेशपूजनाची प्रथा सुरू होती आणि या मूर्तींच्या आकारांत आणि प्रकारांत विभिन्नता आढळते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नागरिक जगभरात स्थलांतरित झालेले आहेत. देशाची भूमी सोडली असली तरी आपल्या परंपरा, आराध्यदैवत हे त्यांच्यासोबत असते. परभूमीवरही ते तितक्याच श्रद्धेने, आस्थेने आणि परंपरागत पद्धतीने आपल्या संस्कृतीतील सणवार, उत्सव साजरे करत असतात. आज अमेरिका आणि पश्चिम आशियातील अनेक प्रांतात भारतीय कुटुंबे राहताहेत. तेथे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरगुती स्वरूपात गणेशमूर्तीची स्थापना करून विधीवत पद्धतीने पूजा करून परंपरेनुसार त्याचे विसर्जन केले जाते.

-प्रांजली देशमुख

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या