24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeविशेषसांस्कृतिक धोरणाला ‘अच्छे दिन’ !

सांस्कृतिक धोरणाला ‘अच्छे दिन’ !

महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर केले होते. या सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल आणि कालानुरूप या सांस्कृतिक धोरणात काही बाबी नव्याने समाविष्ट करण्यात येतील तसेच त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल, असे राज्य सरकारने सांगितले आहे. या धोरणाचा पाठपुरावा करताना अनेक योजनांची पुनरुक्ती होणार नाही अथवा या योजना परस्पर विसंवादी होणार नाहीत याचे भान राखावे लागेल.

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्र शासनाने सन २०१० साली राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर केले होते. ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक प्रा. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या शिफारशींनुसार हे सांस्कृतिक धोरण जाहीर झाले होते. ज्यात मराठी भाषा, चित्र, शिल्पकला, चित्रपट, नाटक, संगीत, लोककला, पुरातत्व योजना, क्रीडा अशा विविध विभागांसाठी पथदर्शी योजना आखण्यात आल्या होत्या. या सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारतर्र्फे करण्यात येईल कालानुरूप या सांस्कृतिक धोरणात काही बाबी नव्याने समाविष्ट करण्यात येतील तसेच त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ना. अमित देशमुख यांनी अलीकडेच जाहीर केले आहे.

विलासराव देशमुख तसेच अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित अनेक पथदर्शी योजना शासनाने नुसत्या जाहीर केल्या नाहीत तर त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. संगीत, नाटक, लोककलाविषयक पुरस्कार, नाटक, चित्रपट, लोककलांना अनुदान पॅकेज, या कलांचे महोत्सव, दादासाहेब फाळके चित्रनगरीचा विकास, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना, आळंदी-देहू तीर्थक्षेत्र विकास, पैठण येथील संतपीठाला चालना, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर गुरुकुल, विठाबाई नारायणगावकर, नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार या व अशा अनेक योजनांचा उल्लेख करता येईल.

सांस्कृतिक धोरणाला महाविकास आघाडीच्या काळात अच्छे दिन येतील, असे शुभ संकेत विलासरावांचे सुपुत्र मा. ना. अमित देशमुख यांनी दिले आहेत. ही हीरकमहोत्सवी वर्षपूर्तीच्या महाराष्ट्राला देणगीच ठरेल. युती सरकारच्या काळात आधीच्या सरकारचे सांस्कृतिक धोरण बासनात गुंडाळून ठेवण्यात आले. तरीही तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र नाट्य विद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. हे महाराष्ट्र नाट्य विद्यालय चित्रनगरीत उभे राहणार होते. महाविकास आघाडी सरकारचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. उदय सामंत यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाची घोषणा करून त्या दिशेने पुढचे पाऊल म्हणून या संगीत महाविद्यालयाच्या सल्लागार समितीची घोषणाही केली आहे.

बिर्ला क्रीडा केंद्राजवळ मराठी रंगभूमीचे कलादालनही उभे राहणार आहे. त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. युती सरकारच्या काळात मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक संकुलात विद्यानगरी कलिना येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्ट अँड कल्चरल सेंटर उभारण्याची घोषणा झाली. याच संकुलात लोकशाहीर पठ्ठे बापूराव कलादालनाचा प्रस्ताव शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. एकूणच सांस्कृतिक आघाडीवर अनेक योजना दृष्टिपथात आहेत. राज्याचा हीरकमहोत्सव आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अमृतमहोत्सव असा अपूर्व योग जुळून आला आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या दोन्ही गोष्टींचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांपर्यंत आयोजित केले जाणार असल्याचे संकेत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आणि सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी दिले आहेत.

सन २०१० च्या सांस्कृतिक धोरणाचा पाठपुरावा करताना अनेक योजनांची पुनरुक्ती होणार नाही अथवा या योजना परस्पर विसंवादी होणार नाहीत याचे भान राखावे लागेल. उदाहरणार्थ राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये प्रयोगात्म कलांच्या विभागांना अनुदान देऊन ते सक्षम करण्याचा मुद्दा सांस्कृतिक धोरणात अधोरेखित करण्यात आला आहे पण जर प्रयोगात्म कलांचे स्वतंत्र विद्यापीठ झाले तर अकृषी विद्यापीठांचे प्रयोगात्म कलांचे विभाग सक्षम होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक दुबळे होतील अशी भीती आहे.

सन २०१० चे सांस्कृतिक धोरण नेमके कसे आहे त्यावर नजर टाकली असता हे धोरण लोककला-लोकसाहित्याचा भाग अल्प उल्लेखात असला तरी ब-यापैकी सर्वसमावेशक झाले आहे. या धोरणातील प्रमुख मुद्दे
१) ज्येष्ठांसाठी सन्मानवृत्ती :
वयोवृद्ध आणि ज्येष्ठ कलावंतांना अनुदान देण्याच्या योजनेत सुधारणा करण्यात येईल. या क्षेत्रात अतुलनीय योगदानासह अनन्यसाधारण कामगिरीचा मानदंड निर्माण केलेल्या ज्येष्ठ मान्यवरांना राज्य शासन सन्मानवृत्ती तहहयात दिली जाईल.
२) कलावंतांसाठी शासकीय सेवेत आरक्षण :
कलांचे शिक्षण-प्रशिक्षण घेतलेल्या कलावंतांना शासकीय, निमशासकीय सेवेत तसेच शासनाच्या अंगीकृत उपक्रमात रोजगाराची संधी मिळावी म्हणून त्यांच्याकरिता खेळाडूंसाठी
असते त्याप्रमाणे आरक्षण निर्माण करता येईल का या विषयीची शक्यता तपासून पाहिली जाईल.
३) मुंबईत निवास सोय : मुंबई बाहेरून येणा-या कलाकारांसाठी मुंबईत ( हॉस्टेलप्रमाणे ) निवासाची सोय करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याशिवाय राज्यातील विविध मुख्यालयाच्या ठिकाणीही अशाप्रकारची सोय उपलब्ध करून देण्यात येईल.
४) आदिवासी कलांचे दस्तावेजीकरण : आदिवासी कलांचे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) करण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. प्रयोगात्म कलांच्या बाबतीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, तर दृश्यात्मक कलांच्या बाबतीत प्रस्तावित ललित कला अकादमी हे कार्य करील. या दस्तावेजीकरणासाठी अन्य माध्यमांचा अवलंब केला जाईल.
५) नाटकेतर प्रयोगात्म-दृश्यात्मक-चित्रपट कला संमेलने : सध्या साहित्य व नाट्य संमेलने आयोजित केली जातात. या संमेलनांना शासकीय अर्थसहाय्य येते. त्याच धर्तीवर अन्य कलाक्षेत्रांच्या संदर्भात अशा प्रकारची स्वतंत्र संमेलने आयोजित करण्यासाठी त्या क्षेत्रातील प्रातिनिधिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
६) नाट्यगृहांसाठी तज्ज्ञांचा सल्ला :
राज्यात नाट्यगृह बांधताना राज्य शासनाने नेमलेल्या या क्षेत्रातील व्यक्तीचा/व्यक्तींचा सल्ला घेणे बंधनकारक राहील यासाठी शासनातर्फे तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमली जाईल.
७) कला प्रशिक्षण केंद्र : शास्त्रीय संगीत, शाहिरी, दशावतार, खडी गंमत, चित्रकथी, लावणी, तमाशा अशा कलांचे प्रशिक्षण देण्याकरिता शासन ’ निवासी कला प्रशिक्षण केंद्र ’ (रेसिडेंशियल आर्ट ट्रेनिंग सेंटर) सुरू करण्याची योजना तयार करील. खाजगी सहभागाने सुरू करण्यात येणा-या अशा केंद्रांमध्ये शिष्यांनी गुरूच्या सानिध्यात राहून कलेचे प्रशिक्षण घेणे अपेक्षित असेल.

एकूणच सन २०१० चे सांस्कृतिक धोरण अमलात आले तर राज्याच्या सांस्कृतिक कार्याला चालना मिळेल. हीरकमहोत्सवी वर्ष पूर्ण करणा-या महाराष्ट्राला सांस्कृतिक धोरणाने ‘अच्छे दिन’ यावेत हीच अपेक्षा!

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे,
लोकसाहित्याचे अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या