22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeविशेषगोर्बाचेव्ह आणि सोव्हिएत संघराज्य

गोर्बाचेव्ह आणि सोव्हिएत संघराज्य

एकमत ऑनलाईन

सोव्हिएत रशियाच्या धोरणांमधील पोलादी पडदे हटविण्याबरोबरच शीतयुद्धाचा अंत करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या घटना ज्यांच्यामुळे घडल्या त्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे नुकतेच निधन झाले. शीतयुद्ध समाप्त करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल गोर्बाचेव्ह यांना १९९० मध्ये नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या चेह-यातून त्यांच्यातील ऊर्जा दिसून येत असे आणि सोव्हिएत रशियात सुधारणा आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते पहिल्यापासूनच अधीर होते. त्यांच्या कार्यपद्धतीत लोकशाहीची झलक लोकांना दिसत असे.

सोव्हिएत संघराज्याचे अंतिम नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन म्हणजे एका महत्त्वाच्या आणि प्रभावी जीवनपटाचा अंत आहे. सोव्हिएत रशियाच्या धोरणांमधील पोलादी पडदे हटविण्याबरोबरच शीतयुद्धाचा अंत करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या घटना त्यांच्यामुळेच घडल्या. डाव्या चळवळीचे अग्रणी व्लादिमीर लेनिन, जोसेफ स्टॅलिन यांच्यासारख्या महानेत्यांनी निर्माण केलेल्या महाशक्तिशाली सोव्हिएत राज्याच्या विभाजनाबद्दल निर्माण झालेल्या तिरस्काराचे हलाहल त्यांनी पचविले होते. मिखाईल गोर्बाचेव्ह यांची हसरी आणि सज्जन छबी लोकांच्या कायम स्मरणात राहील. १९८५ मध्ये ते सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले. सोव्हिएत संघराज्यात निर्माण झालेली कुंठितावस्था दूर करून सुधारणांसाठी संघर्षाला सुरुवात करणारा नेता ही त्यांची ओळख आहे. पेरेस्त्रोइका आणि ग्लासनोस्त या त्यांच्या विशेष मोहिमांनी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आजारी अवस्थेतील कम्युनिस्ट व्यवस्था पुनरुज्जीवित करण्याचा हा प्रयत्न होता.

पक्षाचे सरचिटणीस बनल्यावर गोर्बाचेव्ह पहिल्यांदा चर्चेत आले. म्हाता-या कम्युनिस्ट नेत्यांचे भावशून्य चेहरे पाहून कंटाळलेल्या सोव्हिएत जनतेला गोर्बाचेव्ह यांचा हसरा चेहरा जवळचा वाटला होता. त्यावेळी गोर्बाचेव्ह यांचे वय ५४ वर्षांचे होते. मात्र सोव्हिएत नेत्यांच्या तुलनेने हा तरुण चेहराच होता. त्यांच्या चेह-यातून त्यांच्यातील ऊर्जा दिसून येत असे आणि सोव्हिएत रशियात सुधारणा आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते पहिल्यापासूनच अधीर होते. त्यांच्या कार्यपद्धतीत लोकशाहीची झलक लोकांना दिसत असे. कम्युनिस्ट समाजाच्या दृष्टीने ही सर्वांत नवीन बाब होती. अनेक दशके कुंठितावस्थेत असलेल्या रशियाच्या अर्थव्यवस्थेत नव्याने रक्तसंचार सुरू करण्याचा प्रयत्न गोर्बाचेव्ह यांनी केला; परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. १९८९ मध्ये जेव्हा गोर्बाचेव्ह यांनी पूर्व युरोपातून रशियन फौजा हटविण्याची घोषणा केली, त्यानंतर लगेचच पूर्व युरोपातील सर्व कम्युनिस्ट अर्थव्यवस्था धडाधड कोसळल्या.सोव्हिएत संघराज्याच्या पतनाचे हे प्रमुख कारण ठरले. पेरेस्त्रोइका या शब्दाचा अर्थ पुनर्गठन तर ग्लासनोस्त शब्दाचा अर्थ खुलेपणा असा होतो. या दोन मोहिमांतर्गत गोर्बाचेव्ह यांनी कम्युनिस्ट रशियात नवे कायदे, नव्या व्यवस्था, नव्या संस्था आणण्याचा प्रयत्न केला. सर्वकाही करून पाहिले; परंतु अर्थव्यवस्था सुधारली नाही. द्विधावस्था वाढत गेली. ऑगस्ट १९९१ मध्ये गोर्बाचेव्ह यांच्याच काही सहका-यांनी त्यांची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्नही केला. परंतु चपखल योजनेअभावी तो फसला. परंतु तेव्हापासून गोर्बाचेव्ह यांचा प्रभाव कमी-कमी होऊ लागला.

अखेर डिसेंबर १९९१ मध्ये सोव्हिएत संघराज्याच्या विभाजनाची घोषणा त्यांनी केली. गोर्बाचेव्ह यांचा सात वर्षांचा कार्यकाळ हा कम्युनिस्ट सोव्हिएत संघराज्याच्या पतनाचा काळ असल्यामुळे त्यातून बरेच काही शिकण्याजोगे आहे. एक निर्विवाद महाशक्ती अचानक आतून उद्ध्वस्त झाली. हे सर्व कसे घडले, याबाबत वाद आहेत. अर्थात भारतात यावर अत्यंत कमी विचारमंथन झाले, कारण येथील बौद्धिक क्षेत्रात डाव्या विचारवंतांचा बराच प्रभाव होता. दुसरीकडे चिनी कम्युनिस्ट नेत्यांनी चीनमधील लोकशाहीवादी आंदोलन गोर्बाचेव्ह यांच्या लोकप्रियतेच्या काळातच चिरडून टाकले. मे १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह चीनमध्ये गेले होते. त्यानंतर काही दिवसांतच थिआनमेन चौकात नरसंहार झाला. चिनी नेते अधिक सावध असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मार्क्सवाद आणि माओवादात ताकद नसल्याचे ओळखले होते. हे समजून घेण्यासाठी तैवान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या शेजारी राष्ट्रांकडूनही चिनी नेत्यांना ज्ञान मिळाले. चिनी नेत्यांनी भांडवलवादी व्यवस्थेची पाश्चात्त्य तत्त्वे गुपचूप अवलंबिली. हे काम त्यांनी अत्यंत निग्रहाने केले. कोणत्याही मार्गाने धनिक व्हा, हा तत्कालीन चिनी नेतृत्वाचा नारा होता. अमेरिका आणि युरोपातून त्यांनी भरघोस मदतही घेतली.

चिनी नेतृत्वाच्या तुलनेत रशियन नेतृत्व भोळसट ठरले. त्यांना डेंग यांच्यासारखा समाजवाद आणि भांडवलवाद यातील सामाजिक-आर्थिक तंत्र आणि तुलनात्मक गुणदोष व्यवस्थितपणे समजून घेणारा दूरदृष्टीचा नेता मिळाला नाही. गोर्बाचेव्ह यांनी मागेपुढे न पाहता प्रचंड आकाराच्या सोव्हिएत अर्थव्यवस्थेला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. वयाच्या ५२ व्या वर्षापर्यंत त्यांनी एकही पाश्चात्त्य देश पाहिला नव्हता आणि पाश्चात्त्य देशांची आर्थिक, तांत्रिक क्षमताही त्यांना ठाऊक नव्हती. सोव्हिएत संघराज्यातील सेन्सॉरशिपने नेत्यांसह संपूर्ण रशियन समाजाला घोर अज्ञानाच्या अंध:कारात ढकलले होते. सोव्हिएत संघराज्यातील नेत्यांना पश्चिमेतील भांडवलवादापेक्षा आपला समाजवाद किती श्रेष्ठ आहे, याचा प्रसार करणा-या पुस्तिकांव्यतिरिक्त ज्ञानाचा अन्य स्रोतच माहीत नव्हता. त्यामुळेच गोर्बाचेव्हसुद्धा भावनिक आवाहने आणि काही संस्थात्मक कसरतींव्यतिरिक्त फार मोठा विचार करू शकले नाहीत. आपल्या इच्छाच ते कृतियोजना म्हणून देशासमोर मांडत होते. गोर्बाचेव्ह यांनी केलेल्या विवरणांवरून असे स्पष्ट दिसते की, पाश्चात्त्य समाजांच्या अर्थव्यवस्था, राजकारण आणि माध्यमे यांच्याशी संबंधित कार्यसंस्कृती त्यांना समजली नव्हती.

भूतकाळाची समीक्षा करण्याबरोबरच गोर्बाचेव्ह केवळ भाषिक प्रयोग करीत राहिले. उदाहरणार्थ, कम्युनिस्ट पक्षात सुधारणा करण्याचे काम आपण आणखी वेगाने करायला हवे होते, असे ते म्हणत. परंतु कोणत्या प्रकारच्या सुधारणा करायला हव्या होत्या, याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. समाजवादाच्या संस्थापकांनी जे चित्र दाखविले होते, तसा समाजवाद सोव्हिएत रशियातही बनू शकला नाही आणि पूर्व युरोपातही बनू शकला नाही, हे मात्र त्यांनी मान्य केले होते. सोव्हिएत संघराज्यात तर अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली होती, जिचा अत्यंत वाईट पद्धतीने अंत होणार, हे जणू ठरलेलेच होते. शीतयुद्ध समाप्त करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल गोर्बाचेव्ह यांना १९९० मध्ये नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. परंतु पुढल्याच वर्षी जेव्हा ते सत्तेवरून पायउतार झाले, तेथपासून ते लगेच विस्मृतीत गेले. काही काळ त्यांनी पाश्चात्त्य देशांमध्ये व्याख्याने वगैरे दिली. परंतु त्यातही वैशिष्ट्यपूर्ण असे काहीच नव्हते. गोर्बाचेव्ह फाऊंडेशन नावाची संस्था त्यांचीच असली, तरी या संस्थेचे ठळक असे कोणतेही काम समोर आलेले नाही.

परंतु काहीही म्हटले तरी अमेरिका आणि सहकारी देश विरुद्ध सोव्हिएत रशिया आणि सहकारी देश असे जे शीतयुद्ध दीर्घकाळ सुरू होते, ते संपविण्यातील गोर्बाचेव्ह यांचे श्रेय वादातीत आहे. जर्मनीचे एकत्रीकरण तसेच पूर्व आशियातील अनेक देशांत लोकशाहीवादी व्यवस्था निर्माण करण्यात त्यांच्या उदारवादी धोरणांचे योगदान होते. परंतु सोव्हिएत साम्राज्याचे पतन झाल्यामुळे गोर्बाचेव्ह यांचे हे कार्य दबले गेले. अखेर यश आणि सत्ताच सबकुछ ठरते. गोर्बाचेव्ह यांचे नाव रशियाच्या विभाजनाशीच मुख्यत्वे जोडले गेले. त्यांचे जीवन आणि कार्य म्हणजे मार्क्सवाद आणि लेनिनवाद यांच्या पराभवाचे उदाहरण मानले गेले. त्या अर्थाने ते अंतिम रशियन कम्युनिस्ट नेते ठरले. रशियाला उलथापालथीचा आणि संघर्षाचा मोठा इतिहास लाभला आहे. मिखाईल गोर्बाचेव्ह हेसुद्धा रशियाला काळाच्या पुढचे काही सांगू पाहत होते का, असाही प्रश्न आहे. आता त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे; परंतु भविष्यात कदाचित त्यांचा वारसा पुनरुज्जीवित होऊ शकतो आणि तेव्हाच ते काळाच्या पुढचे होते, असे रशिया आणि संपूर्ण जग म्हणू शकते.

-प्रसाद पाटील

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या