२४ तारखेला एक विलक्षण कार्यक्रम कल्पनेच्या पलीकडचा वाटला. मुंबई-पुण्यातील लोकांनी सचिन तेंडुलकर या विक्रमादित्यावर अफाट प्रेम केले. पण, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील औंढी गाव किती घरांचे असेल…. या गावाने सचिन तेंडुलकरचा ५०वा वाढदिवस गुढ्या उभारून साजरा केला. सचिनचा पुतळा पालखीत बसवून त्याची गावभर मिरवणूक निघाली. गावभर दिंडी फिरली. सचिनच्या विक्रमाची छायाचित्रे गावभर झळकली. त्याच्या विक्रमाच्या नोंदी दाखवल्या गेल्या. तरुण मुले बेभान होती. तरुण मुलांच्या या उत्साहातून एखादा सचिन उद्या तयार होईल… या गावातील सचिनचा वाढदिवस आणि तो उत्साह याची दखल मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रांनी फारशी घेतली नाही…. जवळपास घेतलीच नाही. त्यांना गरजही नाही… पण, महाराष्ट्राच्या एका खेडेगावात सचिन घराघरांत इतका प्रिय आहे की, गावक-यांनी गुढ्या उभाराव्यात…. हे सगळेच सचिनसाठी आणि महाराष्ट्रासाठी विलक्षण आहे.
महाराष्ट्राकरिता सुनील गावसकर, लॉर्डस्वर सलग ३ सामन्यांत शतकाचा विक्रम करणारे दिलीप वेंगसरकर आणि सचिन तेंडुलकर हे सगळे ‘कर’ फार महत्त्वाचे आहेत. पण, सचिनचा गुणविशेष असा की, सबंध महाराष्ट्राला आणि देशाला सचिन आपल्या घरातला वाटतो. कोणत्याही सामन्यात तो शतक करो… न करो… शून्यावर बाद झाला तरी सचिन सगळ्यांना भावलेला आहे. केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही तो खूप मोठा आहे. आज हा खेळाडू ‘भारतरत्न’ किताबाचा मानकरी असताना आयपीएल सामना पाहताना सामान्य सहका-यांच्या बरोबर वावरत असतो… ए.सी. रूममध्ये वेगळा बसत नाही… हे त्याचे सहजपण सर्वांना भावते… पण मुंबई-पुण्यातील लोकांपेक्षा कौतुक जास्त आहे…. औेंढी या खेड्यातील गावक-यांनी सचिनचा ५० वा वाढदिवस असा धूमधडाक्यात साजरा करणे…
आजच्या क्रिकेटबद्दल लिहिण्याची गरज नाही. कसोटी सामने आता निरर्थक ठरत चाललेत. आणि आयपीएलसारखे सामने लोकप्रिय झालेत. खेळाडू विकले गेले… खरेदी-विक्री झाली… आणि गंमत अशी की, मुंबईचा संघ समजला जाणारा जो सामना खेळतो आहे त्यातील शर्मा (रोहित), वर्मा (तिलक), चावला (पीयूष) यांच्या संघाला हरवतेय कोण?…गायकवाड…(ऋतुराज), राहणे (अजिंक्य), देशपांडे (तुषार) आणि यांचा संघ आहे चेन्नई! गंमत आहे की नाही ते बघा… धोनीला मुंबईतल्या संघातील गोलंदाजाने बाद केल्यावर त्यांचा कर्णधार रोहित शर्मा टाळी वाजवतोय… असे हे आय. पी. एल. काळानुसार सगळं बदलत चालले आहे…
पूर्वीचे ते स्वच्छ राजकारण राहिले नाही…. ते समाजकारण राहिले नाही… मग सरळ बॅटने शास्त्रशुद्ध खेळले जाणारे क्रिकेट आणि पाच दिवसांचे ते कसोटी सामने कसे टिकणार? आणि कसे लोकप्रिय राहणार? पण या सगळ्यामध्ये नाव टिकून राहिले ते फक्त सचिनचे… ज्यांनी ब्रेबॉन स्टेडियम बघितले नाही… वानखेडेवर सामना पहायला आलेले नाहीत… सचिनशी कोणाची भेटही झालेली नाही… असे १०० घरांचे औंढी गाव सचिन तेंडुलकर या महान खेळाडूचा ५० वा वाढदिवस गुढ्या उभारून साजरा करतेय… मला तर असे वाटले की, सचिनला मिळालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्कारापेक्षाही या गावात उभारली गेलेली गुढी हा सचिनसाठी सगळ्यात मोठा सन्मान आहे. खंत एवढीच वाटते… सचिनएवढीच फलंदाजीची गुणवत्ता असलेल्या विनोद कांबळीने सचिनसोबत पहिली भागिदारी ६६४ धावांची केली. त्यात विनोदचा वाटा ३४९ धावांचा होता. विनोद तुझं गणित कुठेतरी चुकलं… नाहीतर सचिनसारखीच तुझी बॅट तळपली असती तर तमाम महाराष्ट्राला केवढा आनंद झाला असता.
-मधुकर भावे