24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeविशेषमोठेपण

मोठेपण

एकमत ऑनलाईन

स्वत:विरुद्धची लढाई ही सर्वांत मोठी लढाई असते, असं म्हणतात. कारण इतरांना त्यांच्या चुका दाखवून देण्यात कोणताच पुरुषार्थ नसतो. पुरुषार्थ असतो स्वत:ला स्वत:ची चूक दाखवून देण्यात. चुका सुधारत राहिलं तर हळूहळू माणसात ‘परफेक्शन’ येतं आणि कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास तो सज्ज होतो. परंतु नेमकं इथेच घोडं पेंड खातं. चूक सुधारण्याच्या मार्गात तीन टप्पे आवश्यक असतात. पहिला टप्पा चूक समजण्याचा असतो, दुसरा ती मान्य करण्याचा आणि तिसरा ती दुरुस्त करण्याच्या प्रयत्नांचा. परंतु बहुतांश लोक पहिल्या-दुस-या पायरीवरच अडखळतात. आपली चूक कदापि मान्य न करणं हा आपल्याकडे काहीजण मर्दपणा मानतात आणि चूक कबूल करणं हा कमकुवतपणा किंवा पराभव!

वास्तविक, मान्य करणं म्हणजे अपमान नव्हे एवढं जाणण्याइतकी खिलाडूवृत्ती आपल्याकडे हवी. परंतु आपल्याकडे राजकीय व्यक्तींच्या ज्या काही सवयी समाजातही खोलवर मुरल्यात, त्यातली महत्त्वाची सवय म्हणजे चूक नाकारणं. चूक दाखवून देणा-याला ही मंडळी उलट त्याचीच एखादी चूक दाखवून देतात आणि वेळ मारून नेतात. ‘‘आमच्याविषयी बोलण्यापेक्षा स्वत:च्या घरात काय जळतंय हे पाहा,’’ हा तर राजकारण्यांचा लाडका डायलॉग! भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून सरकार पडण्याच्या चर्चेपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय विषयांपासून बोटीवरच्या रेव्ह पार्टीपर्यंत सर्वत्र एकच थाट दिसून येतो. तुम्ही बरोबर आणि आम्ही चूक असणं अशक्य!

याच कारणामुळं माणूस मोठं होण्याचा प्रयत्न करूनही खुजाच राहतो. ख-या अर्थाने मोठा असणारा माणूस कोणत्याही वयात, जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर चूक स्वीकारून ‘सॉरी’ म्हणतो. म्हणूनच तो मोठा असतो. ‘बिग बी’ म्हणून लोकप्रिय असलेले महानायक अमिताभ बच्चन यांनी हा ‘मोठेपणा’ नुकताच दाखवून दिला. खरं तर चूक साधीच. ती दाखवून देणा-याकडे दुर्लक्ष करता येणंही सहज शक्य होतं. पण या महानायकाने तसं केलं नाही. दस-याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये ‘दशहेरा’ असा शब्द वापरला. त्यावर पाटण्यातील एका तरुणाने त्यांना ‘आपण हिंदीतील एका महान कवीचे सुपुत्र आहात,’ अशी आठवण करून दिली आणि ‘दशानन रावण हरा’ म्हणून ‘दशहरा’ असा हा शब्द लिहितात, हे बिग बींच्या निदर्शनास आणून दिलं. ‘‘कमर्शियल अ‍ॅड की तो छोडिये, कम से कम वर्तनी के बारे में मेटिक्यूलस रहिए’’ अशा शब्दांत एखाद्या तरुणाने दिलेला सल्ला बिग बींनी दुर्लक्षित केला असता, तर काय बिघडलं असतं? असाच सल्ला एखाद्या जिल्हा पातळीवर काम करणा-या राजकीय पुढा-याला देऊन पाहा बरं! एक तर तो दुर्लक्ष करेल किंवा ‘आधी तुझी भाषा सुधार’ असं म्हणून समोरच्यालाच वेड्यात काढू पाहील.

परंतु अमिताभ यांनी या तरुणाचं म्हणणं मान्य केलं. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल त्याला धन्यवाद दिले. ‘पुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन,’ असं उत्तर दिलं. याच तरुणाने ‘खुदा गवाह’ चित्रपटात अमिताभ यांनी ‘पेशेवर’ या शब्दाचा उच्चार ‘पेशावर’ असा केला होता, याचीही त्यांना आठवण करून दिली आणि अमिताभ यांनी तेही मान्य केलं. अमिताभ ज्या उंचीवर आज आहेत, तिथं हा खरोखर चमत्कारच ठरतो.

मानसी जोशी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या