16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeविशेषजीएसटी संकलनाचा नवा उच्चांक

जीएसटी संकलनाचा नवा उच्चांक

एकमत ऑनलाईन

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाचे आकडे सातत्याने चढता आलेख दर्शवत असून सप्टेंबर महिन्यामध्ये याची प्रचीती पुन्हा एकदा दिसून आली आहे. या महिन्यात एकूण १,४७,६८९ कोटी रुपये इतके जीएसटी संकलन झाले आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा यंदाचे संकलन २६ टक्के जास्त आहे. यंदाच्या जीएसटी संकलनामध्ये आयात केलेल्या वस्तूंवर लावलेल्या करामुळे ३९ टक्के तर देशांतर्गत वस्तूंवर लावलेल्या करामुळे २२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

जीएसटीचे हे वाढीव आकडे स्पष्ट दर्शवितात की, भारताचा आर्थिक आणि औद्योगिक विकास सातत्यपूर्णरीत्या सुरू आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील अनिश्चितता आणि सततचे चढ-उतार पाहिल्यास भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत नक्कीच उत्साहवर्धक आहेत. मागील सात महिन्यांपासून जीएसटीचे मासिक संकलन १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मागील आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर २०२१) जमा झालेल्या महसुलापेक्षा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत जमा झालेल्या महसुलात २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून मासिक जीएसटी संकलन १.५ लाख कोटी रुपयांचा आकडा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसे बघायला गेले तर हा आकडा आता जास्त हाताबाहेरचा नाही. अनेक महिन्यांपासून जीएसटी संकलन हे निर्धारित लक्ष्यापेक्षा केवळ दोन ते सहा हजार कोटींनी कमी राहिले आहे. औद्योगिक संस्थांची संख्या वाढत असल्यामुळे करांची प्राप्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ठरलेल्या लक्ष्यापर्यंत जाणे आता फारसे अवघड असल्याचे दिसत नाही.

आगामी काळ हा सणासुदीचा आणि उत्सवांचा आहे. याच कालावधीत शेतीतील नवीन धान्य उत्पादन बाजारात येईल. त्यामुळे येत्या काळात खरेदी-विक्री व्यवहार वाढून बाजारातील आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्याचबरोबर चलनफुगवटा, महागाई यापासूनसुद्धा थोडीफार सुटका होण्याच्या शक्यता आहेत. जीएसटी गोळा करण्याची प्रक्रिया अधिकाधिक उत्तम होत असल्यामुळे आणि करसंकलन सहज सोपे आणि पारदर्शी होत असल्यामुळे त्याचा सर्वांनाच फायदा होत आहे. दुसरीकडे व्यावसायिकांसाठीही अनुकूल वातावरण निर्मिती होत आहे. यामुळे त्यांना व्यवसाय वाढवण्यास मदत मिळत आहे. करात केलेल्या बदलांचा सकारात्मक परिणाम संकलनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मागील महिन्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण प्रत्यक्ष कर संकलनातही मागील वर्षापेक्षा यावर्षी २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक प्रगतीशिवाय तसेच अधिक उत्पन्न, मिळकतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात संकलन होणे शक्य नाही. कारण प्रत्यक्ष करात कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स या करांचा समावेश असतो. असे असले तरी, आयातीमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि वस्तू व सेवांचे वाढलेले भाव यामुळे जीएसटी संकलनात एवढी मोठी वाढ झाली आहे. अर्थात हा मुद्दासुद्धा बरोबर आहे की, जीएसटीत आयात वाढ आणि महागाईचेच योगदान अधिक असल्याचे दिसून येईल. यामागे जागतिक घडामोडींची भूमिका मोठी आहे. त्यामुळे सरकार भारतात उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे आणि त्याच वेळी रिझर्व्ह बँक महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाय योजत आहे.

– विधिषा देशपांडे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या