महाराष्ट्रात नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त समर्थ, लिंगायत असे भक्तिसंप्रदाय निर्माण झाले. या भक्तिसंप्रदायाचे दैवत-तत्त्वज्ञान साहित्य भिन्न-भिन्न असले तरी त्यांचे उद्दिष्ट परमेश्वर भक्ती व लोककल्याण हेच होते त्यामुळेच संप्रदाय महाराष्ट्रात एकत्र नांदले. बाराव्या शतकातील लिंगायत विश्वगुरु महात्मा बसवेश्वरांच्या काळानंतर त्यांच्यापुढे चारशे वर्षांचा काळ लोटला आणि सोळाव्या शतकात संत शिरोमणी मन्मथ माऊली धर्मप्रचारासाठी भूलोकात अवतरले. ‘शिवगीता’, ‘पोवाडे’, ‘परमरहस्य’ ज्यात भक्ती, धर्म, उपासना, ज्ञान, नामस्मरण मार्ग हे शिव-पार्वतीच्या संवादातून प्रकट केले. मन्मथस्वामींच्या काळानंतर चारशे वर्षांनी एक महान तेजस्वी रत्न भगवंताचीच एक मूर्ती असलेली उत्तुंग अशी इष्टलिंग, शिवाविषयीची भक्ती, तपश्चर्या व उपासना असणारी ‘गुरूमाऊली’ लिंगायतचे प्रख्यात तत्त्वज्ञानी १०८ ष. ब्र डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९१७ रोजी लातूर जिल्ह्यातील राजूर ‘अहमदपूर’ येथे झाला.
लहान असतानाच परंपरागत गुरूंच्या सहवासात राहिले. त्यांचे संस्काररूपी व भक्तीमय असे बालपण गुरू-शिष्य हे नातं अगदी मायलेकरासारखं होतं. गुरूमाऊली लहानपणापासून गुरूंच्या सानिध्यात राहिली. त्यानंतर गुरूंच्या सानिध्यातील शिक्षण व ज्ञानसाधना त्यांनी संपवून पुढील शिक्षणासाठी गुजरात, कराची, लाहोर या ठिकाणी शिक्षण चालू ठेवले. अँग्लो वैदिक महाविद्यालयात विज्ञान या विषयात शिक्षण घेतले. १९४५ साली गुरूमाऊलींनी वैद्यकीय शास्त्रातील एम.बी.बी.एस. पदवी संपादन करून शिवलिंग शिवाचार्य महाराज डॉक्टर झाले. काही दिवस वैद्यकीय सेवा केली. त्यानंतर त्यांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी’ याप्रमाणे शिवशंकराच्या व मन्मथमाऊलींच्या गुरूक्षेत्रात आत्मज्ञानाची प्राप्ती करून लिंगायत समाजाला चैतन्य देण्यासाठीच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी स्वत: वैद्यकीय पदवीधर असूनही अशा अवघड हिमालयाची निवड केली. त्यानंतर त्यांनी अहमदपूर येथील शिवाचार्य परंपरेचा मठ म्हणजे शिवसंस्कृतीच्या जपणुकीचे केंद्र आहे. तेथेच हळूहळू शिवधर्माचा प्रचार व प्रसाराची बीजे रोवली आणि ती जोमाने वाढीस लागली.
माऊलीचा स्वभाव कोमलतेचा झरा, मनाचा हळवेपणा, आपुलकी अशी कीर्तीवंत मूर्ती म्हणूनच त्यांना सर्वजण ‘गुरूमाऊली’ म्हणत. ‘माऊली – ‘मा’ म्हणजे माणसाच्या पाठीवर प्रेमाचा हात ठेवणारी . ‘ऊ’ म्हणजे तिच्या उच्चारात आणि आचारात सारे देव व सारी तीर्थे एकच असणारी. ‘ली’ म्हणजे लीन भावनेने विश्वातील मानवाला कवेत घेऊन प्रेम देणारी… याला ‘माऊली’ म्हणतात. आई फक्त आपल्या मुलाची असते, माऊली विश्वाची असते. आई मुलापुरतेच बघते. माऊली सा-याचेच बघते. ती साक्षात माऊली म्हणजे डॉ. शिवलिंग शिवाचार्यांनी संतशिरोमणी परमरहस्याचा अफाट विस्तार केला. शेकडो गावी शिवनाम सप्ताह सुरू केले.
लॅपटॉप, टॅबलेट उत्पादनावर भर; पीएलआय योेजनेला केंद्राची मंजुरी
महाराष्ट्रातील औंढा नागनाथ, परळी, नांदेड, कपिलधार तर प्रत्येक गावी कासारशिर्सी, चापोली, लातूर, शिवकडा इ. ठिकाणी विशेष व्यापक रूपाने अखंड शिवनाम सप्ताह संपन्न व सुरू केले व हजारो लोकांना लिंग दीक्षा संस्कार करून उद्धार केला, विशेष म्हणजे गुरूमाऊलीने प्रचंड धर्मकार्य केले. लिंगायत समाज जागृत केला. पाच पैसेही दक्षिणा घेतली नाही, धर्मकार्याबरोबरच दीन- दुबळ्यांचे प्रश्न सोडविणे याच आपुलकीने लोकांना गुरूमाऊली खूप जवळची वाटायची म्हणूनच त्यांना खूप जण ‘आप्पा’ म्हणूनही संबोधू लागले. माऊलीचे लोकोद्धाराचे कार्य, आध्यात्मिक कार्य व समाजप्रबोधनाचे कार्य हे समाजासाठी फार मोठी लौकिकाची बाब. अनेक भक्तांना ईश्वरभक्तीची आवड लाभावी म्हणून माऊलींनी पदयात्रा(दिंडी)काढली. दरवर्षी ही पदयात्रा सर्वधर्म समभाव या एकात्मतेतून शिवमय कपिलधारेत जाते आणि चालतही राहील, त्याचबरोबर प्रवचनातून लोकांना भक्ती, इष्टलिंगपूजा, भस्म, रुद्राक्ष, शिवपाठ नामस्मरण इत्यादींचे महत्त्व आपल्या प्रवचनातून सांगत. माऊलीची सांगायची पद्धत सहज व सोपी. दैनंदिन जीवनात काय करायला पाहिजे असे सांगत असताना माऊली म्हणतात- माणसाने नेहमी कार्यमग्न असावे. नित्य इष्टलिंगपूजा, शिवपाठ, नामस्मरण करावे, आपले जीवन सुंदर घडवायचे असेल तर अवगुण सोडून द्यावेत, द्वेष, स्वार्थ – मोह आणि असत्य इ. अवगुण सोडले तरच स्वत:चे जीवन चांगले होते.
शिवाचार्यांना आध्यात्मिक तत्त्वज्ञानाबरोबरच सामाजिक कार्याची आवड होती. तसे पाहिले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंजाब येथे विद्यार्थिदशेत शिकत असतानाचे स्वयंसेवक असलेले व सदैव राष्ट्रविचार जागृत करणा-या गुरूमाऊलींनी समाजातील सर्व जाती-धर्मांच्या मुला-मुलींकरिता शैक्षणिक कार्यातही पुढाकार घेतला. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. काही महाविद्यालये, विद्यालये तर वसतिगृह, प्राथमिक शाळा व अंगणवाड्या अशा अनेक संस्था स्थापन झाल्या. याचीच दखल म्हणून २००० साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदर्श शिक्षणसंस्था म्हणून गौरविण्यात आले व पुरस्कार दिला गेला. किंबहुना पर्यावरण संवर्धन, रक्तदान शिबिर सर्वधर्मीय घेणा-या कार्यक्रमातील उपस्थिती किंवा गावोगावी होणा-या सामूहिक विवाह सोहळ्यांत गुरूमाऊलींचे मोठे योगदान अशी अनेक कार्ये केली. विशेषत: वयाच्या १०० व्या वर्षीही गुरुमाऊलींचे ‘दिव्यसत्संग’ रूपाने समाजातील थोरांसाठी, बालगर्भसंस्कार व युवावर्गासाठी आध्यात्मिक प्रवचनाचे कार्य चालूच राहील. आम्हा सर्व भक्तांना गुरूमाऊलीच्या सानिध्यात राहण्याची कायमच ओढ राहिली. गुरूमाऊली समाजासाठी, देशासाठी अहोरात्र झटले.
‘माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी लढणार आणि लिंगायत धर्मास मान्यता घेणार’ अशी प्रतिज्ञा करून सर्व समाजाला प्रेरित केले आणि आपण असे अचानक निघून गेलात, आम्हाला पोरके केले याचे सर्वांत जास्त दु:ख आहे. आप्पांनी सर्वांना आशीर्वाद दिला. ते कायम स्वरूपी आमच्या हृदयमंदिरात विराजमान आहेत. आपण सर्वांनी गुरू-माऊलींचे कार्य, त्यांच्या त्यागाला व्यर्थ जाऊ द्यायचे नाही. लिंगायत इतिहास, लिंगायत साहित्य, तसेच आप्पांचे संस्काररूपी ज्ञान सर्वांकडे सर्वांना पसरवू, गुरूमाऊलींच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन त्यांना आपल्या हृदयस्थानी कायमच जिवंत ठेवू.
दीपाली गिरवलकर-जट्टे
मोबा. : ९५७९७ १५९२८