22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeविशेषगुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

एकमत ऑनलाईन

ब्रम्हानंदम् परम सुखदम् केवलं ज्ञानमूर्तीम् । द्वद्वांतीतं गगनसदृशं तत्वमस्यादि लक्षम् ।।
एकं नित्यम् विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् ।।
भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरू त्वं नमामि।।
बहुतेकांनी गुरू केलेला असतो. त्यांच्या आत्मिक मार्गदर्शनाने ते चालत असतात. त्यांची गुरूवर अपार श्रद्धा असते. तसे मार्गदर्शन, अनुभवही त्यांना येत असतात. गुरू अंध:कार दूर करणारा व जीवनात प्रकाश पसरविणारा असतो. गुरू म्हणजे अक्षय दान.
आपल्या संस्कृतीत, गुरु सांदिपनी-कृष्ण, गुरु द्रोणाचार्य-अर्जुन, परशुराम-कर्ण, एकलव्य-गुरु द्रोणाचार्य, गुरु समर्थ रामदास-शिवाजी महाराज, गुरु समर्थ रामदास-कल्याणस्वामी-शिष्य वेणाबाईपण, संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू वडील बंधू निवृत्तीनाथ. स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, परमहंस- परिव्राजकाचार्य. टेंबे स्वामी महाराज यांचे शिष्य श्री गुळवणी महाराज… अशी गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.

दुथडी भरून वाहणा-या नदीत आपण नावाड्यावर श्रद्धा, विश्वास ठेवूनच नावेमध्ये बसतो व पैलतीर गाठतो. तसे हे लौकिक देहधारी गुरू आपल्या पारमार्थिक जीवनाचे नावाडी-मार्गदर्शक असतात. काहीजण गुरूकडून शक्तिपात दीक्षा घेतात. म्हणजे गुरू दूर गावी असतील तर ठराविक वेळेस साधनेला बसून, गुरूकडून त्याना शक्तिपात दीक्षा मिळते. मग त्यांचा आध्यात्मिक प्रवास चांगला, योग्य दिशेने सुरू होतो. म्हणूनच म्हणतात-
‘ज्ञानदाता मार्गदर्शक, हस्तं धरती नित्यं ब्रह्मवीत, योग क्षेमकृत सदगुरुं त्वं नमामि।’ हात धरून चालवितो, परमेश्वराशी अनुसंधान टिकवितो व स्वत:सारखे शिष्याला ब्रह्मवीत; ब्रह्मज्ञानाने भरपूर करतो अशा सद्गुरूंना नमस्कार असो..
सर्वजणांनी देहधारी, लौकिक गुरू केलेले नसतात. पण साधन, साधना व ज्ञान घेत घेत परमेश्वराला जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतात!

सृष्टीची ‘रचना’, त्यात ब्रह्मदेव कार्यरत होत. ‘पालना’ हे श्री विष्णूचे कार्य होय. ‘विनाशाचा’ तिसरा नेत्र श्री महेश उघडतात. तर ब्रह्मा-विष्णू -महेश यांचे एकात्म रूप श्री दत्तगुरूच होय. गुरुपौर्णिमा म्हणजेच दत्तगुरू, म्हणजेच गुरुतत्त्वाचा अनुभव घेण्याची संधी, अनंताचा स्पर्श अनुभवण्याची आत्मस्थिती होय. ज्यांनी गुरू केला नाही ते या विश्वव्यापी गुरूला, निराकार तत्त्वाला, सगुण रूपात पाहून दत्तगुरूची उपासना करतात. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे- ‘आता विश्वात्मके देवे, येणे वाङ्यज्ञे तोषावे’ विश्वात्मक देव ‘वल्ल्र५ी१२ं’ ङ्मल्ल२ू्रङ्म४२ल्ली२२’ हेच तर सदगुरू तत्त्व. चेतन तत्त्व, सत् चित् आनंदघन होय. ‘अभ्यासवैराग्याभ्यां तन्मिरोध:।।’ अभ्यास नि वैराग्य या दोन उपायांनी चित्तवृत्तींचा निरोध करून जी शांत अवस्था प्राप्त होते, तेव्हा चेतन तत्त्रव अवस्था होय. या अवस्थेतच साधन ध्यान योगामध्ये या गुरुतत्त्वाचा अनुभव प्राप्त करून घेऊ शकतो ‘ब्रह्मानंदम् परम् सुखदम्’ हा अनुभव येतो.

सदगुरु तत्त्व अशेष जिवांना कल्याणकारी पथाकडे घेऊन जाणारे प्रेमाचे सुखासन, गुरुतत्त्व व्यापकतेची व्यापकता, विशालतेची विशालता, गगनाहूनी वाड, ते तत्त्व सर्वांत आहे, म्हणून त्याची काळावर सत्ता. म्हणूनच अतुल बलशाली, सदगुरू शिष्यांना सर्वस्व देऊन टाकतात, म्हणून उदाराहून उदार स्वत:सारखे शिष्याला घडवितात म्हणून ‘अनुपमेय’. ‘अमृतानुभव’मध्ये म्हटले आहे ‘लघुत्वाची मुद्दले। बैसला गुरुत्वाचीये शेले।’ सद्गुरू सेवेतच ज्ञानाचा उदय आहे. भक्तीची प्राप्ती आहे नि वैराग्याचा आदर आहे, योगाची संपन्नता आहे, अनासक्तीय माधुर्यता आहे. म्हणून सद्गुरूतत्त्व ‘नमो सुभाष भजन भाजना।’ ‘स्तुती स्तोततरणप्रिय।’ असा आहे. शेवटी
एकनाथ महाराज म्हणतात –
‘‘नमावे ते एक सद्गुरूंचे पाय
आणिक उपाय करू नये
एका जनार्दनी गुरुचरण सेवा
प्रिय होई देवा सर्वभाव
गुरुचरणावीन भावू नये कोणा
वेदशास्त्र पाही हेचि सांगो’’
ॐ श्री गुरवे नम: गुरुतत्त्वाय नम:

-सौ. शुभलता पाटील
लातूर, मो. ९४२१४ ४९००३

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या