21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeविशेष‘हॅक’नाक

‘हॅक’नाक

एकमत ऑनलाईन

जो मोबाईल आपला अवयव बनला होता, तो लांबून दिसला तरी माणसं जोरात किंचाळतायत. केवळ मोबाईलच नव्हे तर कोणतंही डिजिटल डिव्हाईस दिसलं तरी जीव खाऊन पळू लागतायत. अशाच वातावरणात आमच्या मोबाईलची रिंग वाजते… ‘अननोन नंबर’ असं टेक्स्ट ट्रू-कॉलरच्या निळ्या विन्डोमध्ये दिसतं. एका क्षणात कितीतरी विचार मेंदूत घुसतात. हा अनोळखी नंबर कुणाचा असेल? घ्यावा की घेऊ नये? फोन घेतला आणि दगाफटका झाला तर..? फोन नाही घेतला आणि नुकसान झालं तर..? हा आपल्या फायद्याचा तर फोन नसेल..? काही ठरायच्या आतच रिंग वाजणं बंद होतं… आता त्याच नंबरवरून एक टेक्स्ट मेसेज येतो.

उघडून पाहण्याची हिंमत होत नाही; पण मेसेज पाहिलाच नाही असं व्हायला नको म्हणून आम्ही तो उघडतो… डोळे अचानक विस्फारले जातात आणि आम्ही जोरात किंचाळून धावत सुटतो… आमच्या किंचाळण्यानं सौभाग्यवतींना जाग येते आणि त्या आम्हाला जागं करतात तेव्हा समजतं की आम्ही स्वप्न पाहत होतो. ‘‘नको त्या बातम्या सारख्या-सारख्या वाचू नका म्हणून किती वेळा सांगितलं तुम्हाला… पण ऐकाल तर शपथ!’’ अशा शब्दांत ‘सौं’चं झापणंसुद्धा दिलासादायक वाटू लागतं… मग अचानक प्रश्न पडतो, आम्ही स्वप्नात काय पाहिलं, हे ‘सौं’ना कसं कळलं? मानवी मेंदूही हॅक होतायत की काय..?

आजची फॅण्टसी म्हणजे उद्याचं वास्तव, हाच या तंत्रयुगाचा मंत्र आहे. आज इस्रायलच्या एकमेव कंपनीकडे असलेलं पेगॅसस तंत्रज्ञान उद्या अन्य कुणाकडे नसेलच असं नाही. ते किंवा तत्सम तंत्रज्ञान कुणाच्याही आवाक्यात येऊ लागलं, तर काय गहजब होईल याचा विचार आजच करून ठेवलेला बरा! आम्हाला पडलेलं स्वप्न खरं होईल का, हा खरा प्रश्न नाहीच! खरा प्रश्न असा की, त्या दिवसासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार तर होत नाही आहोत ना? एखाद्या हॉटेलात कॅमेरा आपल्याकडे रोखून पाहत असताना आपण शांतपणे जेऊ शकू, हे काही वर्षांपूर्वी अशक्य वाटत होतं. सोशल मीडियावरचा ट्रोल हा प्रकारही असाच आपल्या अंगवळणी पडत गेला. ‘मी ट्रोल्स एन्जॉय करतेय,’ असं एका मुलीचं विधान काही दिवसांपूर्वी धक्कादायक वाटलं होतं; पण आज ‘ट्रोल मनावर घेऊ नका,’ असं खुद्द रणवीरसिंहच सांगतोय.

लष्करी अधिका-यांच्या नावाने ३ हजार शस्त्र परवाने

अशाच प्रकारे आपल्यावर कुणीतरी नजर ठेवतंय, टेहळणी करतंय आणि आपल्याला त्याचं काहीच वाटू नये इतके आपण कोडगे झालो आहोत, हे चित्र उद्या खरं ठरलं तर ते खूपच गंभीर असेल. एखाद्याला साधा एसएमएस करून त्याच्या फोनमध्ये शिरकाव करता येतो, ही कल्पनाच सहन होण्यापलीकडची आहे. पेगॅसस प्रकरणाची राजकीय बाजू सोडून देणंच हितावह! ‘‘नेमकं अधिवेशनाच्या तोंडावर प्रकरण बाहेर कसं आलं,’’ वगैरे युक्तिवाद भंपक आहेत. कारण या प्रकरणाचा विस्तार पन्नास देशांत आहे आणि सगळीकडे अधिवेशनं सुरू नाहीत. यातलं खरं-खोटं पुराव्यासकट लोकांसमोर येणं हाच एकमेव पर्याय आहे. ‘हाईप’ करून आशय दाबण्यामुळं ‘हॅक’नाक काळ सोकावेल. पूर्वीही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हेरगिरीचा आरोप झाला होता. किमान यावेळी तरी फालतू आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे हा विषय जाईल, हीच अपेक्षा!

हिमांशू चौधरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या