दोरखंड आत्मकथनकार प्रदीपराव साने यांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरलेली ‘कष्टाळू माणसे’ सदर पुस्तकात आपणास भेटतात. त्यांची आपल्या कामावर अत्यंतिक श्रद्धा आहे. कोल्हापूरचा माणूस आणि कोल्हापूरच्या परिसराची ओळख करून देणारी ही व्यक्तिचित्रे. कोल्हापुरी भाषेचे विशेष म्हणून, कोल्हापुरी माणसाचा नमुना म्हणून ही व्यक्तिचित्रे मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवणारी आहेत.
‘कष्टाळू माणसे’ या संग्रहातील सर्वच माणसे सानेच्या जीवनाच्या घडणीत आलेली आहेत. त्यांचे व्यक्तिविशेष, भाषाशैली हे कोल्हापुरी भाषा, कोल्हापूरचा परिसर, कोल्हापुरी माणसाचा स्वभाव या व्यक्तिचित्रणातून स्पष्टपणे दिसून येतो. प्रत्येक व्यक्तिचित्रणाची काही वैशिष्ट्ये आहेत. ती त्यांची ओळख आहे. त्या त्या व्यक्तीचे जगणे. त्या भूसांस्कृतिकतेशी जोडलेले असते. व्यंकटेश माडगूळकरांची माणदेशी माणसे, आचार्य अत्रे यांची वडीलधारी माणसं, प्रभाकर पाध्ये यांची आगळी माणसे, विद्याधर पुंडलिक यांची आवडलेली माणसं, वि. द. घाटे यांची पांढरे केस हिरवी मने, रवींद्र प्ंिगे यांची शतपावली, शिवाजी सावंत यांची अशी मने असे नमुने, बाबूराव गायकवाड यांची ‘माणसे : जनातली आणि मनातली’, ‘ विलोभनीय माणसे’ यांनी मराठी साहित्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
साने यांच्या कष्टाळू माणसाचे वेगळेपण हे त्याच्या स्वभावगुणासह कोल्हापुरी भाषा, कोल्हापुरी जीवन जाणिवा, रीतिभाती या व्यक्तिचित्रणातून विलोभनीय आणि प्रभावीपणे मांडल्या आहेत. ही माणसे मायाळू आहेत, दयाळू आहेत. सोशिक, पीडित, पिचलेली आहेत. अनेक वृत्ती- प्रवृत्तीची पण साधी आहेत. यांची कष्टावर श्रद्धा आहे. जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान ठरलेले आहे. रक्ताच्या नात्यापलीकडेही या माणसांमध्ये एक माणसाचे नाते आहे. ही साने यांची ‘कष्टाळू माणसे’ वाचता येतात म्हणण्यापेक्षा अनुभवता येतात. एवढी साने यांच्या भाषेत चित्रमयता आहे. कथनाची एक वेगळी शैली आहे. लक्षवेधक वर्णन आणि उत्कंठा लावणारे प्रसंग, अगदी बारकाव्यानिशी व्यक्तीची वर्णने ही साक्षात व्यक्तींना उभे करतात.
अडीनडीला भटजी होणारा पांडू मास्तर, पाणक्याचे काम करणारा रामा, जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान अगदी साध्या शब्दांतून व्यक्त करणारा हॉटेलात काम करणारा संजू, पायात कुरपं असल्याने लंगडत लंगडत पाय ओढत चालणारा राऊ आजा, सायकलीवरून पाव विक्रीचा धंदा करणारा ऐंशी वर्षाचा बापू मा, अभावग्रस्ततेत जगणारा, हात-पाय छोटे, डोके मोठे, बटबटीत डोळे, बसके नाक तेही आकाराने मोठे, कान मोठे असणारा किसना, जगण्याच्या लढाईत कष्ट हेच भांडवल, लांडी लबाडी स्वभावात नसणारा ‘गाडीवान गुंडातात्या’, हिशेबाला पक्के असणारे दुस-याचे पंचवीस पैसे जरी त्याच्याकडे राहिले तरी झोप न लागणारे मारुती डिकमले,
पान खाण्याची सवय असलेला रंग्या चव्हाण, कोणावरही विश्वास नसणारा पण त्याला मित्राने चांगलं म्हणावं एवढीच एक प्रामाणिक अपेक्षा असणारा गावडे काका, चारा, लाकडं, वैरण, मक्याची कणसं, भाजीपाला, भेंड्या, भोपळे, मिरच्या चोरून तोडून आणणारी शेवंता, भक्तीच्या वाटेवर चाललेला पण त्याच्या वाटेवर अंधार असणारा ‘प्रकाश’, आपण आणि आपली मुलं एवढेच विश्व असणारा आणि पोट भरण्यात दर्दी असणारा देवराव पोटे, शेतीचा आणि बैलाचा छंद असणारा, पोलिसाची नोकरी करणारा बापू, संशयी स्वभावाचा राजाराम बापू ही सारीच माणसे साने यांनी ‘कष्टाळू माणसे’ म्हणून चित्रित केली नाहीत तर ती कोल्हापुरी जगणे, वागणे, कोल्हापुरी खुबी, भाषा आणि निसर्गसौंदर्य यासह ‘कोल्हापुरी माणसे’ म्हणून अजरामर केली
आहेत.
‘कष्टाळू माणसं’
-प्रदीपराव साने
अक्षय प्रकाशन, रत्नागिरी
पृष्ठे -१९० , मूल्य – रु. १७०/-