23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeविशेषतेजीचे वारे

तेजीचे वारे

एकमत ऑनलाईन

फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढ करताना पुढील काळासाठी नरमाईचे धोरण घेण्याचे दिलेले संकेत, ब्लूमबर्गच्या अहवालातून भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचा व्यक्त झालेला सकारात्मक अंदाज, विदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीकडे वळलेला कल, तिमाही निकाल यांमुळे गतसप्ताहात भारतीय शेअर बाजारात दमदार तेजी दिसून आली आणि निफ्टीने १७,१०० चा टप्पा पार केला. चालू आठवड्यातही ही चढती भाजणी कायम राहण्याच्या दाट शक्यता दिसताहेत. इतकी मोठी उसळी घेतल्यानंतर होणा-या नफावसुलीमुळे थोडीफार घसरण दिसू शकेल. परंतु गुंतवणूकदारांनी या काळात खरेदीची संधी साधल्यास चांगला परतावा मिळू शकेल.

फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या घसरणीमुळे संभ्रमात असणा-या आणि भयभीत झालेल्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना थोडासा दिलासा देण्यात सरता आठवडा यशस्वी ठरला आहे. हा दिलासा केवळ निर्देशांकातील भरारीपुरता मर्यादित नाही. त्यापलीकडे जात भारतीय शेअर बाजारातील घसरणीला जागतिक पातळीवरील जे नकारात्मक घटक कारणीभूत ठरले होते, त्यांमध्ये काही अंशी सुधारणा झाली आहे. यातील सर्वांत मोठा घटक म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हची व्याजदरवाढ. उच्चांकी पातळीवर पोहोचलेली अमेरिकेतील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढीचे अंतिम हत्यार वापरले आणि भारतासह अनेक देशांतील शेअर बाजारात गडगडाट सुरू झाला. कारण स्पष्ट होते.

अमेरिकेमध्ये व्याजदर शून्य टक्के होता. उलट तेथील बँका गुंतवणूकदारांचे पैसे सांभाळण्यासाठी शुल्क आकारत होत्या. सबब हा सर्व पैसा जगभरातील शेअर बाजारांमध्ये गुंतवून चांगला परतावा घेण्याकडे या गुंतवणूकदारांचा कल राहिला. साहजिकच व्याजदरात वाढ झाल्यानंतर असुरक्षित अशा शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आपल्याच देशातील बँकांमध्ये हा पैसा ठेवण्याकडे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचा ओढा वाढण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. २७ जुलै रोजी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीचा दुसरा डोस देण्यात येणार होता. दरम्यानच्या काळात अमेरिकेतील महागाईचे आकडे प्रसिद्ध झाले आणि जून महिन्यातील महागाईने चार दशकांतील उच्चांकी पातळी गाठल्याचे समोर आले. त्यामुळे यंदा फेडकडून १ टक्क्यांची वाढ होईल अशा शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या. परंतु अमेरिकन केंद्रीय बँकेने आपले धोरण फारसे कठोर न करता ०.७५ टक्क्यांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. हे पाऊलही खरे पाहता भारतासारख्या देशांच्या बाजारासाठी नकारात्मकच आहे; परंतु ही घोषणा करताना बँकेकडून आगामी काळातील धोरणात आक्रमकता कमी करण्याचे सूतोवाच करण्यात आल्यामुळे बाजाराने सुटकेचा नि:श्वास टाकला. याखेरीज अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबतही सकारात्मक भाकित वर्तवले गेल्याने सकारात्मक संकेत मिळाले आणि जगभरातील बाजारात उत्साह संचारला.

भारतीय शेअर बाजाराचा विचार करता सामान्यत: फेडच्या बैठकीचे निकाल येण्याआधी गुंतवणूकदार सावध पवित्रा घेऊन नफावसुलीला प्राधान्य देतात आणि बाजारात घसरण होते, असे चित्र यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. तथापि, यंदा बड्या गुंतवणूकदारांना फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा अंदाज असल्याने त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांना चकवा देत खरेदीकडे कल वळवला. परिणामी गतसप्ताहात २७ तारखेला बाजारात तेजी दिसून आली आणि फेडच्या निर्णयानंतर या तेजीला आणखी बळ मिळाले व सप्ताहाची अखेर तेजीचा झेंडा फडकावतच झाली. निफ्टीने १७ हजारांचा टप्पा पार करत १७.१५८.२५ असा झंझावाती प्रवास केला; तर सेन्सेक्स ५७,५७०.२५ वर बंद झाला. या तेजीला आणखी एक प्रमुख कारण ठरले ते म्हणजे ‘ब्लूमबर्ग’ या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातून भारत मंदीच्या गर्तेत सापडण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह ओसंडून वाहिलेला दिसला. याला आणखी बळ मिळाले ते विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या खरेदीचे. २८ आणि २९ जुलै रोजी एफआयआयकडून अनुक्रमे १६३७ कोटी आणि १०४६ कोटींच्या समभागांची खरेदी करण्यात आली. तर स्टॉक फ्युचर्समध्ये अनुक्रमे २८१० कोटी आणि ९८८ कोटींची गुंतवणूक करण्यात आली. यामुळे अनेक कंपन्यांच्या समभागांमध्ये पुन्हा एकदा उसळी पहायला मिळाली आहे. गतसप्ताहातील तेजीला अनेक दिग्गज कंपन्यांच्या दमदार तिमाही निकालांनीही बळ दिले.

या पार्श्वभूमीवर चालू आठवड्याचा विचार करताना तेजीचा हा सिलसिला असाच पुढे सुरू राहण्याची शक्यता स्पष्टपणाने दिसत आहे. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली आहे. डाऊ फ्युचर्स ३१६.८० अंकांनी, तर नॅसडॅक फ्युचर्समध्ये २३५.८० अंकांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजाराची सुरुवात चढत्या भाजणीने होण्याच्या दाट शक्यता दिसताहेत. बाजाराचा मूड सध्या तेजीचा असला तरी इतकी मोठी उसळी घेतल्यानंतर काही प्रमाणात नफावसुली होऊन बाजारात थोडीशी घसरण दिसू शकते. त्यावर लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे. निफ्टी १७००० च्या पातळीच्या वर आहे तोपर्यंत फारशी चिंता करण्याचे कारण नाही. कारण या पातळीवर दमदार सपोर्ट आहे. तो तुटल्यास १६६०० च्या पातळीवर सपोर्ट आहे. अर्थव्यवस्थेचा गाभा व्यापणा-या आठ प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरात जूनमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. देशाची वित्तीय तूट वाढल्याचे समोर आले आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात तैवानच्या मुद्यावरून युद्ध भडकण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. यांसारख्या घटनांचा बाजारावर काय परिणाम होतो हे पहावे लागेल.

अर्थात, गुंतवणूकदारांचा वाढलेला उत्साह, तिमाही निकाल आणि आगामी सणासुदीचा काळ पाहता बाजारात येत्या काळात तेजीच्या शक्यता अधिक आहेत. चालू आठवड्यात भारती एअरेटल, गेल, रत्नमणी मेटल्स, गुजरात अम्बुजा सिमेंट, किर्लोस्कर इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, डीएलएफ, युनायटेड बेव्हरीज, कमिन्स, जेके सिमेंट, द राम्को सिमेंट, किर्लोस्कर ब्रदर्स, मारुती सुझुकी, कोफोर्ज, बाटा, क्रिसिल, एलंती फडस् आदी कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. या समभागांनी लाभांशाची घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्यांवर लक्ष ठेवून खरेदी करता येईल. याखेरीज टाटा स्टीलचा स्टॉक स्प्लिट होऊन १०७ रुपयांवर आला आहे. पोर्टफोलियोमधील दमदार समभाग म्हणून त्याची खरेदी करता येईल. आयआरसीटीसीचा समभागही लवकरच मोठी झेप घेऊ शकतो. याखेरीज इन्फोसिस १७०० रुपयांचे लक्ष्य, सीईएट १३७६ रुपयांचे लक्ष्य, मुथ्थुट फायनान्स ११२५ रुपयांचे लक्ष्य, नाल्को ८५ रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करावा. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचा समभाग १३२ रुपयांवर असून तो लवकरच १७० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

-ंसंदीप पाटील,
शेअर बाजार अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या