36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeविशेषआरोग्यदायी लोणी

आरोग्यदायी लोणी

एकमत ऑनलाईन

लोणी हा दुग्ध वसा (दुधातील स्निग्ध पदार्थ) दही व पाणी यापासून बनलेला दुग्धजन्य पदार्थ आहे. जागतिक स्तरावर बहुतांश देशांत गायीच्या दुधापासून तयार होणा-या मलईपासून लोणी तयार करतात. तसेच म्हैस, शेळ्या, मेंढ्या, घोडे, उंट, याक यांसारख्या प्राण्यांच्या दुधापासूनसुध्दा लोणी तयार करण्याची पध्दत आहे. दुधाच्या सायीचे लोणी लावून व ते घुसळून बनवलेल्या ताकापासून काढलेले लोणी प्रकृतीसाठी खूपच हितकारक असते. लोण्यामध्ये प्रामुख्याने जीवनसत्व अ, ई, आणि ‘ड’ असतात. तसेच अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात. लोणी हे स्निग्ध गुणात्मक असून प्रामुख्याने त्यात ग्लुकोज पिंगो लिपीड नावाचे तत्त्व असते. ज्यामुळे आपल्या पचनसंस्थेचे संरक्षण होते. यामध्ये असलेल्या आयोडिनचा थायरॉईड ग्रंथीच्या तक्रारीवर खूप फायदा होतो. तसेच त्वचा, डोके व हाडाच्या आरोग्यासाठी सुध्दा लोणी अत्यंत उपयुक्त आहे. लोणी गोड, थोडे आंबट, पचनानंतर किंचित गोड, स्निग्ध, रुचिकर, अग्निदीपक, मल घट्ट करणारे, शुक्रवर्धक, डोळ्याला व हृदयाला हितकारक, जीवनास उपयुक्त व पौष्टिक, वात-पित्तनाशक असून प्लिहा, मूळव्याध, रक्तस्त्राव, सूज, डोळ्याचे रोग, विषावर उपयुक्त असून छातीत जळजळ न करणारे, बेचव नाहिसे करणारे तसेच क्षयाचा खोकला व क्षय व्रण याचा नाश करणारे आहे.

लोणी नेहमी ताजे असताना खावे. एका वेळी मोठा चमचा लोणी खाण्यास हरकत नाही. सकाळी लोणी आणि खडीसाखर खाल्ल्यास आरोग्याची कोणतीही तक्रार रहात नाही. आजारी असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लोणी खावे. लोणी जास्त खाल्ल्यास पोटात मळमळ होऊ शकते. जास्त लोणी खाल्ल्यामुळे अपचनाचा सुध्दा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदात काही औषधी लोण्याबरोबर दिली जातात. पिवळट झालेले किंवा वास येणारे लोणी औषधासाठी वापरू नये. सांधेदुखीच्या विकारावरही लोण्याचा खूप फायदा होतो. दुधावर असलेल्या स्निग्ध सायीला एखाद्या आंबट पदार्थाचे किंवा साधारणपणे आंबट दह्याचे विरजण लावले की त्या सायीचे दही बनते. असे हे दही, पाणी घालून रवीने घुसळून काढले की त्याच्या पृष्ठभागावर लोणी जमा होते. दही घुसळून लोणी काढणे ही प्रक्रिया सोपी वाटली तरीही ती तशी किचकट आहे. लोण्यामध्ये बुरशीविरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असल्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच ताप व पोटाच्या संसर्गजन्य विकारावर मात करण्यासाठी फायदेशीर होते. तसेच लोण्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्व अ, ब याचे प्रमाण शरीरात राखून ठेवण्यास मदत होते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायदा होतो.

लोणी लेसीथीनने समृध्द असलेले आहे. त्यामुळे चयापचय (पचन) प्रक्रियेला चालना मिळण्यास मदत होते. तसेच यामुळे शरीरात जमा झालेल्या चरबीचे विघटन अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते व परिणामी वजन कमी होते. त्याचबरोबर लोणी खाण्याची इच्छा पुन्हा होते आणि कमी उष्मांक पोटात गेल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. लोण्यामध्ये सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे आपला मूड चांगला राहण्यास मदत होते. सेलेनियम मेंदूच्या नसामध्ये जाऊन कार्यशक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे ज्या-ज्या वेळी आपला मूड खराब असेल त्या-त्या वेळी लोणी खाल्ल्यास फायदा होतो. लोण्यामध्ये अ, ई आणि ‘ड’ जीवनसत्वे विपुल प्रमाणात असतात. ड-जीवनसत्वामुळे कॅल्शियमचे शोषण व्यवस्थित होण्यास मदत होते. अ- जीवनसत्व हे एक प्रकारचे चरबी विद्राव्य स्वरूपाचे जीवनसत्व आहे. तसेच त्वचा, डोळे, तोंड आणि घसा याच्या आरोग्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास अत्यंत महत्त्वाचे आहे. लोण्यामध्ये सेलेनियम आणि ई-जीवनसत्व ही अँटीऑक्सिडंटस् मुबलक प्रमाणात असल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होते. तसेच त्वचेची लवचिकता टिकून राहण्यास मदत होऊन त्वचेचे आरोग्य चांगले राहते.

लोण्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे डोळ्याचे संरक्षण होण्यास फायदा होतो. त्याचबरोबर डोळ्यामध्ये जळजळ किंवा वेदना होत असल्यास गायीच्या दुधापासून बनवलेले लोणी डोळ्यावर नियमितपणे २ ते ३ दिवस लावावे. त्यामुळे डोळ्याची जळजळ, वेदना कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते. लोणी हे बुध्दी वाढविणारे आहे. त्यामुळे ज्यांना बुध्दीची कामे करावयाची असतात त्यांनी दररोज लोण्याचे सेवन करावे. खास करून विद्यार्थ्यांसाठी लोणी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून एक ग्रॅम लोणी आणि दोन ग्रॅम मध असे मिश्रण विद्यार्थी, ग्रंथकार (लेखक) व शिक्षकांनी नियमितपणे अवश्य खावे, आयुर्वेदानुसार लोण्यामुळे बुध्दी तेज होते. लोणी मेद वाढविणारेसुध्दा आहे. ज्या व्यक्तीचे वजन खूप कमी झाले आहे व सतत जे शुष्क (हडकुळे) होत चालले आहेत त्यांनी लोण्याचे सेवन करावे त्यामुळे वजन वाढून बल येते. त्यासाठी २० ग्रॅम गायीच्या दुधाचे लोणी, २ ग्रॅम पिंपळीपूड व एक ग्रॅम खडीसाखर एकत्र करून काही दिवस नियमितपणे दररोज एक वेळ घेतल्यास लाभदायक होते. लोण्यामध्ये ओमेगा तीन आणि ओमेगा सहा हे फॅटी अ‍ॅसिडस् असतात. जे मेंदूचा विकास होण्यासाठी प्रोत्साहित करतात. विशेष म्हणजे ओमेगा तीन हे वाढत्या वयातील मुलांमध्ये खूप महत्त्वाचे असते. कारण लहान वयामध्ये मेंदूचा चांगला विकास होणे . लोणी पौष्टिक गुणधर्माने समृध्द असलेले आहे. लोण्यामधील चरबी फुफ्फुसांना मदत करतात व फुफ्फुसाची अस्वस्थता दूर करतात.

ज्या व्यक्तींना श्वासाचा किंवा दम्याचा त्रास आहे अशांनी लोण्याचे सेवन अवश्य करावे. त्यामुळे लोण्याचे ठराविक प्रमाणात नियमितपणे सेवन केल्यास दम्याचा त्रास होत नाही. लोणी अग्निदीपक असून रुचकरसुध्दा आहे. पाचक अग्नि कमकुवत झाल्यामुळे पोटाचे अनेक आजार वाढण्याचा धोका असतो. ब-याच वेळा भूक लागत नाही व अन्न न खाल्ल्यामुळे शरीर शुष्क होत जाते अशा वेळी १० ग्रॅम लोणी व ३ ग्रॅम सुंठ एकत्र मिसळून नियमितपणे काही दिवस दररोज दोन वेळा घेतल्यास अन्नाचे पचन होऊन भूक लागण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार लोणी संग्रही गुणधर्माचे आहे. त्यामुळे त्यामध्ये पाणी शोषण करणारे गुण आहेत. या आजारामध्ये वारंवार शौचाला गेल्यामुळे शरीरातील पाणी कमी होण्याचा धोका असतो. त्यासाठी या आजारामध्ये दररोज दोन वेळा १० ग्रॅम लोणी व एक अ सुंठ चूर्ण नियमितपणे काही दिवस खाल्ल्यास अतिसाराचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. लोणी हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार लोणी नियमितपणे सेवन केल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो असे सिध्द झाले आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोकासुध्दा कमी होतो. लोण्यामध्ये सेलेनियम व आयोडिनव्यतिरिक्त अ, ड आणि के ही जीवनसत्वे असतात जी हृदयाला आजारापासून वाचवितात. लोण्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते हे अंशत: सत्य आहे. लोणी उपयुक्त व फायदेशीर (एचडीएल) असलेले कोलेस्टेरॉल वाढविते. जे शरीराच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक व गरजेचे असते. त्यासाठी एक चमचा लोणी आपल्या कोलेस्टेरॉलची दैनंदिन गरज भागवते परंतु त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत नाही. सध्याच्या उद्योगजगतामध्ये अनेक व्यक्तींना बैठ्या व्यवसायामुळे व अवेळी खाण्यामुळे मूळव्याधीची समस्या आहे. त्यासाठी गायीच्या दुधाचे लोणी आणि तीळ समप्रमाणात मिसळून खावेत अथवा लोणी, मध आणि खडीसाखर मिसळून खाल्ल्यास रक्ती मूळव्याध कमी होते. टिप : वनौषधींचा वापर करताना आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या