27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeविशेषआरोग्यदायक विड्याचे पान

आरोग्यदायक विड्याचे पान

एकमत ऑनलाईन

विड्याचे पान खाणे हा भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अत्यंत महत्वाचा व प्रमुख भाग आहे. अगदी राजामहाराजाच्या काळापासून ते आजपर्यंत भरपेट जेवण झाल्यावर किंवा मिष्टान्न भोजनानंतर आपल्या तोंडाची चव चांगली राहण्यासाठी पानाचा उपयोग केला जातो आहे. आयुर्वेदानुसार विड्याचे पान त्याच्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशिर आहे. स्वादानुसार विड्याच्या पानाचे कडू, आंबट, तुरट, तिखट आणि गोड असे विविध प्रकार आहेत. विड्याच्या पानामधील औषधी गुणधर्माचा नामोल्लेख चरक संहिता या ग्रंथात सुध्दा केलेला आढळतो. प्रत्येक प्रकारच्या पुजेमध्ये किंवा विविध सणावाराला विड्याच्या पानाचा वापर हा शुभ मानला जातो. हिंदु धर्मात घरात कोणतीही पुजा असली तरीही प्रत्येक पुजेची सुरुवात ही विड्याच्या पानाने होते.

आपल्या भारतीय परंपरेत देवाला नैवैद्य दाखविल्यानंतर पानाचा विडा करून वाहिला जातो व नंतर प्रसादाच्या स्वरूपात तो सेवन केला जातो. यामुळे विड्याचे पान कोणत्याही कार्यारंभाचे शुभ प्रतिक तर आहेच पण त्याचबरोबर त्यात अनेकविध आयुर्वेदिक औषधी गुणधर्म सुध्दा आहेत. त्यामुळे विड्याच्या पानाचा दुहेरी फायदा आहे. सतत पान खाण्याची सवय असल्यास दात खराब होण्याची दाट शक्यता असते, असे असली तरी विड्याचे पान खाणे आपल्या आरोग्यासाठी खुपच लाभदायक आहे. या पानामध्ये तंबाखू मिसळून खाल्यास ते तब्येतीसाठी हानिकारक असते. पानामध्ये कात, चुना, सुपारी व बडीसोप हे चार घटक टाळून पान खावे. त्याशिवाय लवंग, विलायची, गुलकंद मुखवास, केशर, जायपत्री, गुंजेची पानं, जेष्ठमध मिसळून केलेला विडा म्हणजे त्रयोदश गुणी समजला जातो. तसेच पानात एकही पदार्थ न टाकता किंवा काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ मिसळून विड्याचे पान खाल्ले तरीही ते आरोग्यासाठी उत्तम आहे. ४पचनशक्ती : विड्याच्या पानामध्ये नैसर्गिक पाचक गुणधर्म आहेत. ही पाने चघळून खाल्यामुळे आपल्या लाळग्रंथीची क्रीया सुधारते ज्यामुळे अधिकाधिक लाळेची निर्मिती होते त्यामुळे आपले पचनतंत्र सुधारण्यास मदत होते. लाळेमध्ये विविध प्रकारचे एन्झाईमस असतात जे विशिष्ट जैवरासायनिक क्रियासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतात व ज्यामुळे आपण खाल्लेल्या अन्न पदार्थाचे विघटन व्यवस्थित होते. कदाचित त्यामुळेच मिष्टान्न भोजन झाल्यावर पान खाल्यानंतर लवकर अन्नाचे पचन होते.

४ तोंडातील अल्सर: विड्याच्या पानामध्ये जीवाणू विरोधी गुणधर्म आहेत. विड्याची पाने चघळल्याने तोंडातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे जीवाणूमुळे तोंडावाटे होणारे संक्रमणास प्रतिबंध घातला जातो. ज्यामुळे तोंडात होणा-या अल्सरपासून मुक्त होण्यासाठी मदत होते. तसेच वारंवार तोंड येत असल्यास विड्याच्या पानावर तूप लावून (विडा बनवून नाही) खावे. तोंडातील अल्सर व तोंड येणे बंद होऊन आराम मिळण्यास मदत होते. ४ वजन नियंत्रण : विड्याचे पान वजन नियंत्रीत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. विड्याच्या पानाच्या सेवनाचे चयापचय क्रिया चांगली होते ज्यामुळे आपल्या शरीरात जास्तीची चरबी जमा होत नाही. आयुर्वेदानुसार विड्याचे पान खाल्यामुळे शरीरातील मेद धातू काढून टाकण्याचे काये होते. तसेच या पानाच्या अर्कामुळे (रस) शरीरातील ऑक्सिडेशन (ज्वलन) प्रक्रियेस चालना मिळते व भुकेवर परिणाम न होता वजन संतुलीत ठेवता येते. ४मधुमेह : विड्याच्या पानामध्ये मधुमेह विरोधी घटक आहेत.

ज्यामुळे आपल्या शरीरामधील रक्तातील साखर कमी करण्यास मदत विड्याच्या पानात अ‍ॅन्टी हायपरग्लासेमिक गुणधर्म असतात जे रक्तातील ग्लुकोज पातळी संतुलीत ठेवण्याची महत्वाची भूमिका निभावतात एका संशोधनानुसार जे लोक नियमितपणे विड्याच्या पानाचे सेवन करतात त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो. टाईप-२ मधुमेहात डॉक्टरच्या सल्याने या पानाचे सेवन करता येते. ४ कर्करोग : कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी विड्याची पाने अत्यंत महत्वाची आहेत. विड्याच्या पानामध्ये एस्कॉर्बिक आम्ल असते जे एक चांगले अ‍ॅन्टीऑक्सिडंट असून त्यामुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी होतात. पानातील अर्कामुळे कर्करोग वाढण्यास प्रतिबंध होतो व तसेच टयुमरची (गाठ) वाढ रोखण्यास प्रभावी परिणाम होतो. ४जखम :- विड्याच्या पानाचा उपयोग जखमा लवकर भरून येण्यासाठी फार पूर्वीपासून केला जातो आहे. कारण त्यात जखम भरून येण्याचे घटक आहेत. त्यासाठी विड्याच्या पानाचा रस जखमेवर लावावा आणि त्यावर विड्याचे पान ठेवून पट्टी बांधावी. या पानामुळे हायड्राक्सीप्रोलिन आणि सुपर ऑक्साईड डिसम्युटेस वाढविण्यास मदत होते ज्यामुळे जखम लवकर भरण्यास फायदा होतो. एका संशोधनानुसार मधुमेहामुळे झालेल्या जखमा लवकर भरण्यासाठी विड्याच्या पानाचा अर्क फायदेशिर आहे. तसेच या अर्कामुळे संक्रमण करणा-या सुक्ष्मजंतूच्या वाढीस प्रतिबंध होतो. ४ मुरूम : चेह-यावर असलेले डाग, पुरळ, मुरूम कमी करण्यासाठी विड्याच्या पानाचा उपयोग होतो.

कारण या पानामध्ये जीवाणू विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचेला संसर्ग होत नाही व त्वचेचे सौंदर्य अबाधित राहते. त्यासाठी विडयाची पाने बारीक वाटून त्याचा स्वरस तयार करावा व त्यामध्ये हळद मिसळून चेह-यावर लावावा व नंतर २० ते २५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा त्यामुळे मुरूम/पुरळ कमी होऊन चेहरा डाग विरहीत होईल. ४कामोत्तेजना : विड्याचे पान खाल्यामुळे कामोत्तेजना वाढण्यास मदत होते. संभोग करताना शरीर सुख घेण्यासाठी कामोत्तेजना आवश्यक असते. ज्यामुळे समाधान व आनंददायी संभोगाची भावना मिळते. हा मिळणारा आनंद आपल्यासाठी आरोग्यदायी तर असतोच शिवाय त्यामुळे दीर्घायुष्यही मिळते. ४श्वेतप्रदर : या आजारामध्ये महिलांच्या अंगावरून पांढरे पाणी जाणे ही समस्या सर्रास आढळते. ताण-तणावामुळे स्त्री शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडणे हे एक प्रमुख कारण असून त्याचा परिणाम शरीरावर होते. त्यासाठी ८ ते १० विड्याची पाने स्वच्छ धुवून २ लिटर पाण्यात मंद आचेवर उकळून थंड झाल्यावर त्या पाण्याने योनी धुवावी यामुळे श्वेतप्रदर समस्या कमी होते. ४ खोकला : या आजारामध्ये छातीमध्ये व फुफ्फुसात कफ जमा होतो व त्यामुळे श्वसनाचा त्रास होतो.

विड्याच्या पानामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि सुक्ष्मजीवाणू विरोधी गुणधर्म असतात जे संसर्ग दूर करण्यास मदत करतात. तसेच खोकल्यामुळे होणारा रक्तसंचय कमी होऊन घसा साफ करण्याचे कार्य करतात. याशिवाय विड्याच्या पानाचा उपयोग श्वास घ्यायला त्रास होत असल्यास जुना कफ बाहेर पडण्यासाठी व अस्थमाचा आजार कमी करण्यासाठी होतो. ४ दाताचे आरोग्य: हिरड्याच्या आरोग्यासाठी व दाताच्या मजबुतीसाठी विड्याचे पान बारीक चावून खाल्यास फायदा होतो. पानात असलेल्या जिवाणू विरोधी गुणधर्मामुळे जीवाणूच्या संसर्गामुळे दाताचे व हिरड्याचे होणारे नुकसान कमी होते. तसेच दात दुखत असल्यास पानात कापूर मिसळून हिरवे पान चावून खाल्यास फायदा होतो. ४गॅसची समस्या : कामाच्या व्यापामुळे खाण्याकडे दुर्लक्ष होते व त्यामळे जठरासंबंधीच्या समस्या निर्माण होतात. विड्याच्या पानात जठराचे संरक्षण करण्याचे गुणधर्म असतात ज्यामळे खाल्लेल्या अन्नाचे पचन सरळीत होऊन गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. टिप: वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या