28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeविशेषहृदयगर्भी स्वातंत्र्यदिन

हृदयगर्भी स्वातंत्र्यदिन

एकमत ऑनलाईन

स्वातंत्र्यदिन हा खरंतर राष्ट्रीय सण. पण आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोेनातून पाहतो? केवळ एक सुटीचा दिवस म्हणूनच आपण त्याच्याकडे पाहात नाही ना? या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. खरंतर राष्ट्रप्रेम ही काही दिवाळीच्या चार दिवसांत दारात पेटविली जाणारी पणती नाही की जी फक्त रोषणाईसाठी वापरली जाते आणि काम झाले की पुढच्या वर्षासाठी गुंडाळून ठेवली जाते. राष्ट्रप्रेम हा तर एक अखंड तेवणारा नंदादीप आहे. जो मनामध्ये आयुष्यभर प्रज्ज्वलित ठेवणे हे प्रत्येकाचे परमकर्तव्य आहे.

दरवर्षी येणारे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन्हीही खरेतर आपले राष्ट्रीय सण. जे साजरे करणे अपेक्षित आहे अपूर्व उत्साहात. १५ ऑगस्टने आपल्याला स्वतंत्र चेहरा दिला आणि २६ जानेवारी १९५० रोजी त्या चेह-याला स्वत:ची ओळख दिली. ओळख स्वतंत्र नीतिनियमांची, ओळख स्वतंत्र आणि आदर्श नागरिक म्हणून जगताना पाळाव्या लागणा-या जाबाबदा-यांची, ओळख संपूर्ण राष्ट्राच्या विचारसरणीची. आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा आनंदोत्सव साजरा करत आहोत. राज्यघटनेच्या भक्कम पायावर कधीकाळी साप-गारूड्यांच्या आपल्या देशाने समाज सुधाराची आणि विकसनशीलतेची नवी शिखरे गाठली आहेत. बुद्धिमान, प्रामाणिक, कष्टाळू अशी भूषणावह ओळख आज नव्याने जगाला होऊ लागली आहे. कधीकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या भूमीवरील विझलेल्या ढिगा-यातही भारतीयांच्या प्रतिमेचे आणि सृजनशीलतेचे निखारे अजूनही फुलत आहेत याची जाण जगाला नक्कीच आहे. म्हणूनच आपल्या प्रगतीसाठी ‘आरंभ’ असलेल्या या दोन सणांप्रती असलेली उदासिनता कुठेतरी नाराज करते. वैयक्तिक आयुष्यातील कुठलीही आनंददायी घटना आपण दरवर्षी साजरी करून नव्याने जगतो. मग या सार्वत्रिक उत्सवांमध्येच असे का? पावसाळ्यात उगवणा-या छत्र्यांप्रमाणे केवळ या दोनच दिवशी समाजामध्ये उगवणारा राष्ट्रप्रेमाचा अतिरेक? की वर्षभर केवळ टीआरपी वाढविण्यासाठी कमरेचे सोडून डोक्याला बांधणा-या वाहिन्यांंनाच या दिवसात येणारे राष्ट्रप्रेमाचे भरते? की एकूणच सर्वच माध्यमातून पाजला जाणारा राष्ट्रक्तीचा ओव्हरडोस? एक कारण शोधायला जावे तर १०० कारणे सापडतील.

खरंतर राष्ट्रप्रेम ही काही दिवाळीच्या चार दिवसांत दारात पेटवली जाणारी पणती नाही की जी फक्त रोषणाईसाठी वापरली जाते आणि काम झाले की पुढच्या वर्षासाठी गुंडाळून ठेवली जाते. राष्ट्रप्रेम हा तर एक अखंड तेवणारा नंदादीप आहे. जो मनामध्ये आयुष्यभर प्रज्ज्वलित ठेवणे हे प्रत्येकाचे परमकर्तव्य आहे. म्हणूनच फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी झेंडे घेऊन मिरविणा-यांचे प्रेम बेगडी वाटते. खादीच्या कडक पोषाखातून माईकसमोर सराईत भाषणबाजी करणारे दांभिक वाटतात. शेवटी राष्ट्रप्रेम म्हणजे असते काय? तर राष्ट्राची अस्मिता जपणे आणि तिचा आब राखणे. राष्ट्राची शान वाढविणे यामध्येच दडलेले असते राष्ट्रप्रेम. राष्ट्राची अस्मिता असते गड-किल्ल्यांमध्ये, पुरातन, प्राचीन मंदिरांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये, नैतिक मूल्यांंमध्ये, राष्ट्रपुरुषांची कर्मभूमी, जन्मभूमी आणि विचारधारा जपण्यामध्ये, राष्ट्राच्या वनजीव आणि सांंस्कृतिक विविधतेमध्ये, राष्ट्रभाषेमध्ये आणि विचारवंतांनी लिहिलेल्या आणि जपलेल्या ग्रंथसंपदेमध्ये. राष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू आपल्या अगदी जवळ असतात; पण आपण ते किती जपतो?

‘जिथे जाऊ तिथे’ आपले नाव एखादे शिल्प विकल्याच्या आविर्भावात कोरताना जपतो आपण आपली अस्मिता, ऐतिहासिक संग्रहालयांची, ग्रंथालयांची नासधूस करतात. त्यांच्यात असते राष्ट्रप्रेम की राष्ट्रपुरुषांच्या स्मृती म्हणून सांभाळलेल्या वास्तूंची अक्षम्य दुर्दशा आणि हेळसांड करतात तिथे असते राष्ट्रप्रेम? सार्वजनिक ठिकाणांना कचराकुंड्या बनविणारे आणि रस्त्यांना पिकदाण्या समजणारे असतात का राष्ट्रप्रेमाने प्रेरित? की कुठल्याही छोट्याशा विषयाचे अवडंबर माजवून त्याचा आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी उपयोग करून घेताना सार्वजनिक संपत्तीचा मनमुराद नाश करणारे असतात? कर्तव्यकठोरतेबाबत किती सतर्क असतो आपण राष्ट्राच्या? कोण कोठून कसाबसारखा अतिरेकी एवढ्या मोठ्या शस्त्रसाठ्यासह आणि सहका-यांसह येऊन रक्ताची होळी खेळून जातो आणि आपल्यासारख्या झापड लावून वावरत असलेल्या जनसमुदायापैकी कोणालाही साधा संशय देखील येत नाही.

एखादा अपघातग्रस्त व्यक्ती रस्त्यावर गंभीर अवस्थेत असताना आपण केवळ बघ्याची भूमिका घेतो आणि पाहतापाहता त्या देहाची ‘बॉडी’ होते. शेजारच्या घरांतून येणारा विव्हळणारा आवाज आपण सोयीस्करपणे कानामागे टाकतो, इथे आठवते का आपल्याला बंधूप्रेम? जरा आठवून पाहूया बरं आपण शाळेमध्ये रोज म्हणत होतो ती प्रतिज्ञा. मला खात्री आहे ‘भारत माझा देश आहे’ या ओळीच्या पुढच्या ओळी आठवण्यासाठीही आपल्याला बरेच प्रयास करावे लागतील. या सर्वांचे मूळ खरेतर इथे आहे. घटनेने बहाल केलेल्या ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ या एकाच अधिकाराचा उपभोग घेण्यात आपण सर्वजण मश्गुल आहोत. जी जातपात नष्ट करण्यासाठी, समाजातील उच्च-नीच स्तर समतोल राखण्यासाठी कित्येक शहाण्या सवरलेल्या लोकांनी आयुष्य वेचले, त्याच जातीपातीच्या राजकारणाला आज उधाण आले आहे. एखाद्याने अग्निहोत्र पेटते ठेवावे त्याप्रमाणे या विषयांना पेटते ठेवून जनतेची दिशाभूल सुरू आहे. राष्ट्रध्वजामध्ये लपेटले जाऊन आपला शेवट व्हावा असा परमोच्च राष्ट्रप्रेमाचा विचार मनात ठेवून जे शहीद होतात, मृत्यूला कवटाळतात त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या वीरत्वाची चिरफाड होत आहे. आपल्या स्वार्थासाठी डोंगरांच्या टेकड्या आणि नद्यांची गटारे करतानाही त्यांच्यामध्ये कुठेही अपराधीपणाचा लवलेशही नाही.

राजकारणातील नीतिमूल्यांना तिलांजली देणारे जेव्हा राष्ट्रध्वजाला सलाम करतात तेव्हा म्हणूनच थोडीसुद्धा वीरश्री जागृत होत नाही मनात. पण हीच वीरश्री जागृत होते आपल्या जवानांची लयबद्ध संचलने, आपल्या पूर्ण ताकदीनिशी त्यांनी राष्ट्रध्वजाला दिलेली दमदार सलामी बघताना! मन कौतुकाने भरून येते ते संस्कृतीच्या चित्ररथांवरील सादरीकरणातून त्याचे दर्शन होते तेव्हा. अक्कडबाज मिशांच्या आणि भरदार शरीरयष्टीच्या शूर जवानांचे फोटो छातीशी कवटाळून त्यांच्या तरुण विधवा जेव्हा उदास चेह-याने त्यांना मिळालेले मरणोत्तर पुरस्कार स्वीकारतात तेव्हा दाटतो हुंदका आपल्याही घशात. म्हणूनच या सर्वांची आठवण वर्षभर मनात जागृत ठेवून विधायक आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी पूरक आचरण करणे हीच खरी सलामी आहे. त्या राष्ट्रध्वजाला आपल्या वैयक्तिक उन्नतीसाठी केवळ ठराविक क्षेत्रांकडेच ओढ न घेता शक्य असेल तर लष्करातील विविध पदांवरती काम करून राष्ट्रसेवा करता आली तर ती होईल खरी श्रद्धांजली त्या अनाम वीरांना. हे प्रत्येकाला साध्य होईल असे नक्कीच नाही; पण म्हणून त्या शक्यतेचा, त्या संधीचा विचारही करू नये असेही नाही. शेवटी कोणीतरी लष्करात भाक-या भाजत आहेत म्हणून आपण दोनवेळा सुग्रास जेवत आहोत हे कधीही विसरता कामा नये. स्वातंत्र्याच्या बहरलेल्या झाडावरच्या सगळ्या ‘सोनेरी चिमण्या’ उडून गेल्या, तर ‘वो भारत देश था मेरा’ असे म्हणण्याची वेळ येऊ नये ही सदिच्छा या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने.

-अपर्णा देवकर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या