32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home विशेष हट्टी मुलांना हाताळायचं कसं?

हट्टी मुलांना हाताळायचं कसं?

एकमत ऑनलाईन

मुलांची योग्य प्रकारे काळजी घेत असताना कमी अधिक प्रमाणावरती पालकांना मुलांचे हट्ट आणि मागण्या पूर्ण कराव्याच लागतात. पालक आपल्या गरजा बाजूला ठेवून आपल्याला जे मिळालं नाही तसं किमान आपल्या मुलांसोबत होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पण ते आपल्या मुलांना समजेलच असं काही नाही. नव्या पध्दतीच्या कार, फॅशनचे कपडे, खेळणी, शुज, स्टेशनरी, नवे पदार्थ ऑनलाईन मागवणे, अशा एक ना अनेक गोष्टींची मुलांची डिमांड चालू असते.

मागच्या आठवड्यात पाचवीतल्या शुभमने ऑनलाईन रायटिंग बोर्ड मागवला. घरी डिलीव्हरी आल्यानंतर सुमनला हे समजलं, सुमनला म्हणजे शुभमच्या आईला नकार देणं त्यावेळी अवघड गेलं. या ठिकाणी काय होतं तर, मी माझ्या वाढदिवसाला मम्मा-पपांशी बोर्ड घेऊयात म्हणून बोललो होतो, एक महिना झाला तरी त्यांनी बोर्ड घेतलेला नाही मग मीच त्यांना अचानक ऑर्डर करून चकित करतो. अशा शेकडो क्लृप्त्या मुलांकडे असतात.

माही ४ वर्षांचा आहे. त्याला घराबाहेर घेऊन गेलं की, तो हमखास एक तरी वस्तू घे म्हणून आग्रह करतो.. आई आणि बाबाला वेठीस धरतो. अचानक गडबडा लोळून घेतो अशा वेळी लोक काय म्हणतील या भीतीने नाइलाजाने ते माहीचा हट्ट पुरवतात पण कधीकधी आई- बाबांचा तोल सुटतो आणि माहीला जोरदार चापटही बसते. या कृतीचा त्याच्या पालकांना पश्चातापही होतोच. ही अशी एकापेक्षा एक वेगळी उदाहरणे सतत आपल्या अवतीभोवती पहायला मिळतात. अशा वेळी तुम्ही जगातील असे एकमेव हट्टी मुलाचे पालक नाही आहात. हा प्रश्न सर्वांना सतावतो.

दुष्काळग्रस्त गावाचे चित्र अधिका-याने पालटले

– पहिल्यांदा आपण आपल्या मुलाला पूर्णपणे ऐकून घ्या तिला किंवा त्याला नक्की काय सांगायचं आहे आणि ते तुमच्यापर्यंत अगदी योग्य शब्दांत पोहोचलंय याची तुमच्या नजरेतून, शब्दांमधून, स्पर्शातून त्याला अनुभूती जाऊ द्या. Non-judgmental होऊन म्हणजे, आपल्याला जे वाटतं तोच निर्णय पाहिजे असा विचार किंवा भावनांची निर्मिती करू नका.

– अशा वेळी मी पालक म्हणून तुझ्याशी कनेक्ट आहे, तुझं ऐकतेय/तोय आम्ही. तू एकटा नाहीस ही भावना त्याला जाणवू द्या. डोक्यावरून हात फिरवावा, त्याला जवळ कुशीत घ्या.

– मुलांना आपल्या नाहीचा अर्थ ‘नाही’ असाच गेला पाहिजे. आपल्याला कितीही जड गेलं तरी एखादी वस्तू देण्याविषयी मुलांना व्यवस्थित समजावून सांगा. ते न देण्यामागील असमर्थता दर्शवताना स्वर हळुवार पण भूमिका मात्र कठोर असायला हवी. ४ मुलासोबत बसा आणि त्याला मागणी आणि गरज यातील अंतर समजावून सांगा. मागणी करणे आणि आदराने संवाद साधणे यातील फरकावरती देखील उदाहरणासह चर्चा करा, त्याला सभ्य भाषेत कसं बोलतात ते नम्रपणे समजावून देण्याची ही छान संधी आहे. ती तुम्ही घ्यायला हवी.

– आपल्या मित्र किंवा मैत्रिणीकडे अमुक एक गोष्ट आहे आणि म्हणून मला ती हवीये असा आग्रह जर मूल धरत असेल तर आपण त्याला, ती संयम शिकतील म्हणून ठामपणे नाही म्हणता यायला हवं. त्यामधून मुलांना स्वत:च्या मनावरती नियंत्रण मिळवायचं कसं हे शिकता येईल.

– मुलांना नाही म्हणायला अर्थातच दोन्ही पालकांनी संमतीने हे ठरवायला हवे नाहीतर आई नाही म्हणते आणि बाबा हो म्हणतो असे जर असेल तर त्याचा विपरीत अर्थ मूल काढू शकतं .

– मुलांनी ऐकल्यानंतर त्यांचे कौतुकही मनापासून करायला हवे. पूर्वीच्या काळी साधा पतंग घ्यायलासुध्दा कितीदा तरी मन मारायला लागायचं. पण आत्ताचा काळ तसा नाही आज मार्केट आणि जग तात्काळ मुलांना आकर्षित करतं.

– दरवेळी आपण मुलांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत असं काही नाही त्यामुळे शांतपणे स्वत:ला समजून घ्यायला वेळ द्या.

– आपण पालक म्हणूनसुध्दा काळजी घ्यायला हवी. मुलांच्या समोर आपण देखील हट्टी आणि आक्रमकपणे घरातल्या इतरांशी संवाद करत असू तर मुलांना आपला बाबा असेच ओरडतो आणि मग घरातले त्याला हवं ते कसं देतात हा मेसेज जायला नको. ‘‘ठीक आहे नाही मिळणार का.. काही हरकत नाही. नंतर पाहूयात.’’ असे संवाद मुलांसमोर विधायक अर्थाने रुजवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना हे पटतं की, आपल्या बाबाला सुध्दा काही गोष्टी मागता क्षणी नाही मिळत. तो शांत बसतो तर आपणही तसं शांत बसणं आवश्यक आहे.

– आई-बाबाव्यतिरिक्त इतरही सदस्यांनी उदा. आजी- आजोबांनीसुध्दा मुलांच्या हट्टाला नाही म्हणायचं असेल तर एकमताने ‘नाही’वरती ठाम रहायला हवं, त्यांनी लवचिक होता कामा नये. याचा परिणाम उलट होऊ शकतो.

– मुलांनी काही अवाजवी मागणी केली तर त्याला शारीरिक इजा किंवा दंड देऊ नका. त्याला हळुवारपणे सांगा की आत्ता आपल्याला काय करता येणार आहे. जर इतरांनी आपल्याला आदराने वागवावं असं वाटत असेल तर मुलांनाही तसंच वाटत असतं हे कायम ध्यानात असायला हवं.

बाकी पालकत्व हा एक सुंदर प्रवास आहे. मुलांनी काही आगळीवेगळी मागणी किंवा हट्ट केला तर समजून घ्या की, तुम्हाला त्याला नव्या पध्दतीने शिकवण्याची संधी आली आहे. हॅप्पी पॅरेंटिंग.

प्रा. पंचशील डावकर
मो. ९९६०० ०१६१७

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या