24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeविशेषहैदराबाद मुक्तीसंग्राम; स्वातंत्र्यातील एक उज्ज्वल पर्व

हैदराबाद मुक्तीसंग्राम; स्वातंत्र्यातील एक उज्ज्वल पर्व

एकमत ऑनलाईन

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, जगात सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. परंतु याच देशावर दीडशे ते पावणेदोनशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले. देश स्वातंर्त्यासाठी अनेक देशभक्तांनी वेगवेगळे लढे दिले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये वेगवेगळे विचारप्रवाह होते. न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले या नेमस्त पुढा-यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सनदशीर मार्गानेच चळवळ उभी केली पाहिजे,असे मत मांडले तर सुभाष चंद्र बोस, योगी अरविंद घोष, आदी क्रांतिकारी नेत्यांनी सशस्त्र क्रांतिकारी मार्गानेच देशाला स्वातंत्र्य मिळेल, असा विचार मांडला.

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी देशव्यापी चळवळ उभी केली पाहिजे आणि या चळवळींमध्ये जनसामान्यांनी भाग घेऊन अहिंसक मार्गानेच सत्याग्रह करून देशाला स्वातंत्र्य मिळेल, असे आग्रहाने सांगून त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली. अशा या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये हैद्राबादचा मुक्तिसंग्राम हा अतिशय बिकट होता. तरीही तेथील जनतेने व स्वातंत्र्यसैनिकांनी हा लढा निर्धाराने चालविला. मोठे अग्निदिव्य केले. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली.अनेक हुतात्मे झाले. अनेकांचे संसार लयास गेले आणि हुतात्म्यांच्या प्रयत्नांचे पर्यवसान भारत सरकारच्या ‘पोलिस अ‍ॅक्शन’मध्ये होऊन १७ सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थान निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाले.

हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा,तेलंगणा आणि कर्नाटक मधील काही जिल्हे होते. असे एकूण १६ जिल्हे निजामाच्या आधिपत्याखाली होते. अतराफ बल्दा, हैदराबाद, नलगोंडा, वरंगल, करीमनगर,आदिलाबाद, निजामाबाद, महेबूबनगर,रायचूर, गुलबर्गा, बिदर,नांदेड, औरंगाबाद, परभणी, बीड आणि उस्मानाबाद या १६ जिल्ह्यांमध्ये आठ जिल्हे तेलगु बोलणारे, पाच जिल्हे मराठी आणि तीन जिल्हे कन्नड बोलणारे होते. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये उर्दू बोलणा-यांची संख्या अधिक होती. हैद्राबाद संस्थानावर १७७४ ते १९४८ पर्यंत निजामाचे अतिशय जुलमी शासन होते. या संस्थानांमध्ये ७ निजाम होऊन गेले. पहिला आसफजाह नवाब कमरुद्दीन किलिज खान, दुसरा आसफजाह नवाब निजाम अली खां निजाम उल्ल मुल्क,तिसरा आसफजाह नवाब सिकंदर जहा बहादूर, चौथा आसफजाह नवाब नासिरूदौला बहादुर, पाचवा आसफजाह नवाब आफजदौला बहादूर, सहावा आसफजाह नवाब मीर महबूब अली खाँ बहादूर आणि सातवा आसफजाह नवाब मीर उस्मान अली खाँ बहादूर.

हा शेवटचा सातवा मीर उस्मान अली खान च्या शासनामध्ये काही प्रधानमंत्री आणि काही लढाऊ संघटना होत्या. त्यापैकी लातूर निवासी कासीम रझवी हा अतिशय धर्मवेडा, क्रूर, खुनशी प्रवृत्तीचा होता, तसाच दुसरा बहादूर यार जंग कट्टर निजामाचा नवाब होता. हैद्राबाद संस्थानचा सर्व कारभार उर्दूमधून चालत असे. त्यामुळे उर्दू भाषा सर्वांना शिकावी लागत होती. त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी हैद्राबादला जावे लागे, त्यामुळे हैदराबादी रीतिरिवाज आणि उर्दू भाषेचा प्रभाव सर्व सुशिक्षितांवर पडला होता . परंतु अशा अवस्थेमध्ये ही या तिन्ही प्रदेशातील राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी आपापल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला होता. निजामी राजवटीमध्ये राजकीय निर्बंध अतिशय तीव्र आणि कठोर असल्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून देशप्रेमाचा संस्कार तरुण पिढीवर करण्याचा निर्णय हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांनी घेतला होता. मराठवाड्यामध्ये हसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने सर्व स्वातंत्र्यसैनिक, नेते आणि तरुण एकत्र आले होते.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे वारे हैद्राबाद संस्थानापर्यंत पोहोचले होते. मराठवाड्यातील लातूरशीही त्यांचा निकटचा संबंध होता. इंग्रज अधिकारी जॅक्सनची हत्या करून हुतात्मा झालेले कान्हेरे हे यावेळी औरंगाबाद येथे शिकायला होते. पुढे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह, वेगवेगळे आंदोलने झाली. हैद्राबाद संस्थानच्या लढ्यांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवि नारायण रेड्डी आदींनी भाग घेतला व त्यांनी कारावासही भोगला. म्हणजे हैद्राबाद मधील स्वातंत्र्य चळवळीचे उगमस्थान भारतातील स्वातंत्र्याची चळवळ हीच होती. हैद्राबाद स्वातंत्र्य चळवळ या भूमिकेपासून स्वामी रामानंद तीर्थ कधीही मागे हटले नाहीत. स्वामीजींनी आर्य समाजी नेत्यांशीही सतत स्रेहाचे व सहकार्याचे संबंध ठेवले होते.

पुढे कासिम रझवीने रझाकार ही मुस्लिम अतिरेक्यांची सशस्त्र संघटना उभारून हिंदुवर व सर्वसामान्य जनतेवर अनन्वित अन्याय-अत्याचार केले. मराठवाड्यातील नेत्यांनी व तरुणांनी या रझाकार संघटनेला कडवी झुंज दिली. त्यांच्या जुलमी अन्यायाला प्रतिकार करताना भूमिगत चळवळ चालविली. हे कार्य करताना स्वामीजी, गोविंद भाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, अनंतराव भालेराव आणि त्यांचे वेगवेगळ्या जिल्ह्यातील सहकारी यांनी स्वतंत्र चळवळीची व्यापक भूमिका कायम ठेवली,हे अतिशय महाकठीण काम होते तरी ते निजाम रझाकार संघटनेशी जिकरीने लढत होते.

या जुलमी निजामी राजवटीला येथील स्वातंत्र्य सैनिकांनी बंड पुकारून सशस्त्र लढा दिला. या स्वातंत्र्यवीरापैकी अतिशय पराक्रमी व धाडसी पोलादी सैनिक म्हणजे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीच्या मातीत जन्मलेले देशबंधु पंडित वीरभद्रजी आर्य व भालकी तालुक्यातील स्वातंत्र्यवीर यशवंतराव सायगावकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अगदी तरुण वयात निजामी सत्तेविरूद्ध, रझाकारा विरुद्ध सशस्त्र संघर्ष केला.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला. या देशांमध्ये ६६४ संस्थाने होती. यापैकी बोटावर मोजण्याइतकी काही संस्थाने होती. ज्यांनी आपल्या सत्तेचा व अधिकाराचा उपयोग शोषित, पीडित समाजाच्या उन्नतीसाठी केला. त्यामध्ये एक करवीर अर्थात कोल्हापूरचे संस्थान ज्यामध्ये लोकराजा शाहू महाराजांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबवून सामाजिक स्तर उंचावला. बडोदा संस्थान,इंदोरचे संस्थान अशा कल्याणकारी संस्थांचा उल्लेख करता येईल.

अशी सर्व संस्थाने स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली. परंतु हैदराबादचा संस्थानिक निजाम मीर उस्मान खां भारतामध्ये विलीन होण्यास तयार नव्हता. मराठवाड्यातील, कर्नाटकातील देशभक्तांनी अनेक रक्तरंजित लढे दिले. या लढ्यामध्ये अनेक हुतात्मे झाले. स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक बैठक होऊन लष्करी कारवाई करण्याचा निर्णय झाला. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याने देशांतर्गत लष्करी कारवाई करता येणार नाही, असे सांगितले व त्याचे भारत सरकारच्या ‘पोलीस अ‍ॅक्शन’मध्ये रूपांतर करून पोलीस कारवाई केली व नंतर निजाम मीर उस्मान खां हा शरण आला व हैद्राबाद संस्थान हे स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्यात आले, तो दिवस होता १७ सप्टेंबर १९४८. ख-या अर्थाने मराठवाडा व हैदराबाद संस्थानातील प्रजा याच दिवशी स्वतंत्र झाली. या मुक्तिसंग्रामातील शहिदांना भावपूर्ण आदरांजली.

– यु.डी.गायकवाड
राज्य सहसचिव, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ विभाग, लातूर
मो.नं.९०११६ ६५५९१

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या