23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeविशेषधर्मांधतेचा धोका वेळीच ओळखा

धर्मांधतेचा धोका वेळीच ओळखा

एकमत ऑनलाईन

देशाचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणा-या घातक विषवल्लींची ओळख पटली नाही तर भविष्यात आपल्या देशातील नागरिकांना मोठा धोका आहे. शेजारील देश आपल्या देशातील दोन समूहांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि अशा घटनांच्या आडोशाने राजकीय पोळी भाजली जात आहे, हेही उदयपूर येथील घटनेने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही धर्मातील अशा अराजक माजवणा-या घटकांना स्थान न देणेच उचित ठरेल.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये मंगळवारी धर्माच्या नावाखाली अमानुष हत्येची घटना उघडकीस आली. त्यामुळे एक सुसंस्कृत समाज म्हणून आपण खरोखर किती विकसित झालो आहोत, असे सर्वांना वाटू लागले आहे. उदयपूरमध्ये एका महिला राजकारण्याच्या श्रद्धेशी संबंधित वादग्रस्त विधानाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मत व्यक्त केल्यामुळे एका व्यक्तीची दोन पुरुषांनी निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर मारेक-यांनी त्यांच्या या क्रौर्याचा व्हीडीओ बनवून सार्वजनिक केला. अशा असंस्कृत कृत्यातून कोणत्याही धर्माचा किंवा त्याच्याशी संबंधित प्रतीकांचा सन्मान वाचवता येईल का? कोणता धर्म अशा रानटीपणाला परवानगी देतो? अशा कृत्याचे समर्थन करणारे लोक आपल्याच धर्माचा अपमान करत नाहीत का? शेवटी जे लोक आपल्या धर्माला मानवतेच्या कल्याणाचे सर्वांत महत्त्वाचे साधन मानतात, ते एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुद्यावर वेगळे मत व्यक्त केले म्हणून मारतात, याचे कारण काय? धर्म वाचविण्याच्या नावाखाली अशा हिंसेला धर्मांधताच म्हणता येईल, दुसरे-तिसरे काहीही नाही, हे उघड आहे. परंतु या दु:खद घटनेची जबाबदारी सरकारी खात्याची आणि पोलिसांचीही आहे. प्राप्त वृत्तानुसार मारल्या गेलेल्या व्यक्तीने सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर मिळालेल्या धमक्यांचीही माहिती पोलिसांना होती. कन्हैयालाल नावाच्या शिलाईकाम करणा-या या व्यक्तीची हत्या अत्यंत क्रूरपणे, अगदी तालिबानी पद्धतीने करण्यात आली आहे. त्याहून अधिक धोकादायक बाब म्हणजे, या घटनेचे पाकिस्तान कनेक्शन. कन्हैयालालची हत्या करणा-या दोघांपैकी एकाने काही दिवस कराची येथे जाऊन प्रशिक्षण घेतले होते.

पाकिस्तान भारतातील काही घटनांचा फायदा घेऊन त्यात संधी शोधण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे, हेच यातून सिद्ध होते. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याला पाठिंबा देणारी पोस्ट सोशल मीडियावर केल्यानंतर कन्हैयालाल याला सातत्याने धमक्या येत होत्या. परंतु प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. धमक्यांमुळे कन्हैयालाल दुकानही उघडत नव्हता. ज्या दिवशी त्याने दुकान उघडले, त्याच दिवशी त्याची हत्या करण्यात आली. ज्या क्रौर्याचे दर्शन या हत्येच्या घटनेत दिसले, त्याकडे डोळेझाक करता येत नाही. हा प्रकार व्हीडीओमध्ये कैद करून खुन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली, इतके त्यांचे धारिष्ट्य कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता राजस्थान पोलिसांबरोबरच एनआयएनेसुद्धा उदयपूरमध्ये पोहोचून तपास सुरू केला आहे, त्याचे हेच कारण आहे. ज्या दोघांनी कन्हैयालालची हत्या केली, त्यातील एकजण २०१४ मध्ये पाकिस्तानात गेला होता. तेथे त्याचे दावत-ए-इस्लामी या संघटनेशी संबंध आले होते.

वास्तविक, धर्माच्या नावाखाली हिंसक घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात साडेचार वर्षांपूर्वी अशाच प्रकारची अमानुष हत्या झाल्याची घटना समोर आली होती. मारेक-याने या हत्येचा व्हीडीओही बनवला होता. ही हत्याही धार्मिक कारणामुळेच झालेली होती. प्रश्न असा आहे की, अशा विविध धर्मांच्या लोकांच्या मनात असा रानटीपणा कसा काय निर्माण होतो. जर कोणताही धर्म किंवा त्यांचे संचालन करणा-या व्यक्ती त्यांच्या अनुयायांमध्ये कट्टरतेची भावना निर्माण करत असतील तर त्याचा परिणाम म्हणून अखेर असेच वर्तन समोर येईल. आपल्या धर्माला मानवी मूल्यांचे सर्वांत मोठे संरक्षक म्हणून जाहीर करणारे धार्मिक नेते त्याचे सार आपल्या अनुयायांच्या समुदायांपर्यंत का पोहोचवू शकत नाहीत किंवा एखादी व्यक्ती इतकी उद्धट आणि रानटी का बनते, हे समजणे कठीण आहे. धर्मांधता आणि हिंसेद्वारे आपल्या श्रद्धांचे रक्षण करण्याचा दावा करणारे प्रत्यक्षात आपला धर्म वाचवत नसतात, तर ते केवळ मानवतेची अशा प्रकारे हत्या करत असतात आणि त्यामुळे संबंधित धर्माचे नुकसानच होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

ज्या पद्धतीने कन्हैयालालची हत्या करण्यात आली आहे, ते पाहता मारेक-यांच्या मनात काठोकाठ विष भरले गेले होते, हे स्पष्ट दिसते. इस्लामच्या कथित अपमानाचा बदला घेण्याच्या नावाखाली हत्या करण्यास त्यांना प्रोत्साहित करण्यात आले होते, हेही स्पष्ट होते. ही हत्या इस्लामच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असे मुस्लिम संघटनांनीही स्पष्ट केले आहे, ही सकारात्मक बाब आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि हे एक भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. हिंदू समाजाबरोबरच मुस्लिम समाजानेही आता काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. देशाचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणा-या घातक विषवल्लींची ओळख पटली नाही तर भविष्यात आपल्या देशातील नागरिकांना मोठा धोका आहे. शेजारील देश आपल्या देशातील दोन समूहांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि अशा घटनांच्या आडोशाने राजकीय पोळी भाजली जात आहे.

-विनायक सरदेसाई

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या