27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeविशेषआयपीओच्या दुनियेत...

आयपीओच्या दुनियेत…

एकमत ऑनलाईन

मार्च २०२० च्या कोरोनानंतर जे शेअर मार्केट वधारले त्यामध्ये आपण आयपीओ हा शब्द नक्कीच ऐकला असेल. आपल्याला कदाचित प्रश्न पडला असेल की हे आयपीओ प्रकरण नक्की आहे तरी काय? हे आयपीओ का बाजारात येतात? याची जी प्रचंड रक्कम असते ती नक्की कशी ठरवली जाते? आयपीओची जी प्रत्येक शेअरमागची किंमत असते ती कशी ठरवली जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून पाहणार आहोत.

गेल्या दोन वर्षांत ज्याप्रकारे शेअर मार्केट वधारत होते, त्यामध्ये ब-याच आयपीओंनी आपले लिस्टिंग केले. त्यामध्ये एसबीआय कार्डस्, एंजल वन, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सिटीम्स, हॅप्पीएस्ट माईंड टेक्नॉलॉजी, बर्गर किंग, रूट मोबाईल, इंडिगो पेंट्स, इझी ट्रिप, अनुपम रसायन, कल्याण ज्वेलर्स, नझारा टेक्नॉलॉजी, पॉवरग्रीड, बार्बीक्यु नेशन्स, झोमॅटो, तत्व चिंतन फार्मा, पेटीएम, आनंद राठी, आयआरसीटीसी आणि यावर्षी २०२२ मध्ये आलेले डेल्हीव्हरी, ई मुद्रा आणि एलआयसी, अदानी विल्मार असे आयपीओ. गेल्या दोन वर्षांत १०० पेक्षा जास्त कंपन्या या शेअर मार्केटवर लिस्ट झाल्या आहेत. १०० कंपन्यांनी एकत्र मिळून जवळपास २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे उभे केले आहेत. यामध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सचे प्रमाण खूप जास्त आहे. गेल्या दोन वर्षांत जवळ जवळ १० कोटींपेक्षा जास्त डीमॅट अकाऊंट्स ओपन झाली आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वाढते प्रमाण आणि वधारणारा बाजार हे आयपीओच्या वाढलेल्या संख्येचे मुख्य कारण आहे. आयपीओ म्हणजे नक्की काय आयपीओ म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग, म्हणजेच कंपनी बाजारात लिस्ट होण्यासाठी गुंतवणूकदारांना ठराविक रकमेच्या बदल्यात काही शेअर म्हणजेच समभाग उपलब्ध करून देते आणि ते जितके समभाग ठरवले गेले आहेत ते कंपनीच्या मालकांकडून गुंतवणूकदारांकडे येतात त्याला आपण इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणतो. आता शेअर मार्केटमध्ये ती कंपनी लिस्ट होते आणि आपल्याला कधीही खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध होते.

आयपीओ शेअर बाजारात का येतात..
आयपीओ हा कंपनीच्या व्यवसायवाढीसाठी आणला जातो. शेअर मार्केटमध्ये असलेला शेअर हा त्या कंपनीला दर्शवित असतो. जेव्हा कंपनीला व्यवसायवाढीची प्रचंड संधी दिसत असते आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल लागणार असते त्यावेळी कंपनीला हे भांडवल आपले समभाग विकून तयार करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. हे समभाग आयपीओच्या माध्यमातून इच्छुक गुंतवणूकदारांना विकले जातात. यातून उभी झालेली प्रचंड रक्कम ही त्या कंपनीच्या व्यवसाय वृद्धीसाठीचे भांडवल असते. आयपीओ बाजारात येताना त्या कंपनीचे मूल्यांकन ठरवले जाते आणि आपल्याला आपले किती समभाग विकायचे आहेत हे कंपनी ठरवून त्यानुसार आयपीओची रक्कम ठरवली जाते.
आयपीओच्या वेळी प्रत्येक शेअरची किंमत कशी ठरवली जाते

आयपीओची प्राईस त्यालाच प्राईस बँड असे म्हटले जाते. ही किंमत कंपनीचे मालक आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्स मिळून ठरवतात. यामध्ये कंपनीचे असलेले नाव, कंपनीचा धंदा आणि गुंतवणूकदारांमधील लोकप्रियता हे घटकसुद्धा बघितले जातात. आयपीओची प्राईस अशी ठरवली जाते की जी गुंतवणूकदारांना योग्य वाटेल आणि गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात त्या आयपीओला अप्लाय करतील. बाजारात आयपीओ आणण्यासाठी सेबीचे काही नियम आहेत का? आयपीओ विक्रीस आणण्याआधी सेबीची परवानगी असणे आवश्यक आहे. आता सेबी कोणत्या कंपनींना परवानगी देते? तर आयपीओमध्ये लिस्ट होण्यासाठी सेबीचे काही नियम आहेत ते आपण आता बघू. १. सेबी सर्वांत प्रथम कंपनीचे मूल्यांकन तपासते. म्हणजेच कंपनीची आजची संपूर्ण किंमत तपासली जाते. ही किंमत प्रत्येक कंपनीची मालमत्ता, नफा, गुंतवणूक अशा अनेक घटकांवर ठरत असते. एनएससीमध्ये लिस्ट होण्यासाठी कंपनीचे संपूर्ण मूल्यांकन २५ कोटींपेक्षा जास्त असावे लागते आणि बीएससीवर लिस्ट होण्यासाठी ३ करोडपेक्षा जास्त असावे लागते.

२. कंपनीचा निव्वळ नफा हा १ कोटीपेक्षा जास्त असला पाहिजे आणि मागील तीन वर्षे तो १ कोटीपेक्षा जास्त आणि वाढत राहिला असला पाहिजे. ३. याचबरोबर कंपनीची पत, कंपनीचे मूल्यांकन योग्य आहे की नाही, कंपनी भांडवलाच्या किती टक्के भाग हा लिलावात काढते, किती समभाग लिलावात काढले जाणार आहेत, लिलावाची पद्धत या सर्व गोष्टी सेबीसमोर मांडाव्या लागतात. या सर्व गोष्टी सेबी तपासते आणि मगच कंपनी लिस्ट होऊ शकते. एखाद्या कंपनीचा जेव्हा आयपीओ येतो तेव्हा त्याआधी ३-५ वर्षे ती कंपनी त्याच्या तयारीत असते आणि सेबीकडे त्यांनी आधीच नोंदणी केलेली असते. म्हणजे कंपनीचा आयपीओ हा खूप आधीपासून ठरलेला असतो. आणि सेबीकडून मान्यता मिळाल्यावरसुद्धा कंपनी बाजारात लिस्ट होण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करत असते. ब-याचदा शेअर बाजारात लोकांचा जेव्हा खूप जास्त सहभाग असतो आणि बाजार जेव्हा खूपच वधारत असतो तेव्हा कंपनी आपला आयपीओ बाजारात आणते. २०२१ मध्ये जवळपास ५० पेक्षा जास्त आयपीओ येण्याचे वधारणारा बाजार हेच कारण होते.

बरेच गुंतवणूकदार आयपीओमध्ये छोट्या कालावधीतील परताव्यासाठी इन्व्हेस्ट करतात ज्याला लिस्टिंग गेन्स असे म्हणतात. बरेच लोकप्रिय आपल्याला खूप लिस्टिंग गेन्स देऊन जातात. त्यापैकी आयआरसीटीसी, डी मार्ट, झोमॅटो, अदानी विल्मार, पारस डिफेन्स, नझारा टेक्नॉलॉजीज या आयपीओंनी इन्व्हेस्टर्सना पहिल्याच दिवशी चांगला परतावा मिळवून दिला. काही असेही आयपीओ आहेत की जे लिस्टिंगच्या दिवशी तोट्यातच लिस्ट झाले आणि तोट्यातच जात राहिले. त्यामध्ये पेटीएम, एलआयसी अशा आयपीओंचा समावेश आहे. एकूणच आयपीओमध्ये लिस्ट होणारी कंपनी ब-याचदा नवनिर्मित असते आणि आपल्याला त्यांची मागची कामगिरी आणि नफा-तोटा हे सहजतेने समजत नसल्याने आयपीओमध्ये आपण असणा-या जोखमीचा अंदाज घेऊनच गुंतवणूक केली पाहिजे. आयपीओ आपल्याला ब-याचदा चांगला परतावा देत असल्याने त्याची लोकप्रियता जास्त आहे. आयपीओचा व्यवस्थित अभ्यास करून त्यात गुंतवणूक केल्यास आपल्याला चांगला नफा कमावता येऊ शकतो.

-रुचिर थत्ते,
शेअर बाजार अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या