36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeविशेषआरोग्यम् धनसंपदा वृद्धिंगत करा...

आरोग्यम् धनसंपदा वृद्धिंगत करा…

एकमत ऑनलाईन

कोरोना महामारीच्या काळात भीतीची दहशत सामान्यांच्या मनात घर करणारी आहे. त्यात दवाखान्याचा खर्च, उपचारासाठी झालेला खर्च इ. मानसिक व शारीरिक दडपण कमी करण्यासाठी आरोग्य विम्याचा दिलासा अनेकांना मिळतो. कोरोनाच्या काळात आरोग्य विमा सामान्यांसाठी कवचकुंडले ठरलेली आहेत. यासाठी आरोग्य विम्यात सहभागी होताना जागृत व सुज्ञ पॉलिसी होल्डर असणारा वर्ग संपूर्ण फायदा मिळवितो. असा वर्ग विरळ स्वरूपात असतो. अनेक व्यक्तींना आरोग्य विम्यासंदर्भात माहिती नसते. आरोग्य विमा पॉलिसी काढतात; पण त्या संदर्भात जागृत कमी असतात. त्यांना लाभ व सेवा मिळविता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. अशा वर्गाने जागृत व चोखंदळ असावे लागते.

भारताचा विचार करता आरोग्य विम्यामध्ये ५ टक्के वर्ग सहभागी असतो. कोरोनाच्या काळात याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. परदेशात दवाखान्यात उपचारासाठी आरोग्य विमा असेल तरच प्रवेश दिला जातो. कारण तेथील जनतेस आरोग्य विम्याचे महत्त्व समजले तसे भारतीय नागरिकांना ते समजले नाही, हेच खरे. नवीन पिढीतील तरुण आरोग्य विम्याच्या संदर्भात जागृत होत आहेत.

आरोग्य विम्यामध्ये सहभागी होणा-या कंपन्यांनी पुढील घटकांकडे लक्ष द्यावे लागते. त्यातील पहिला घटक म्हणजे आरोग्य विम्याच्या संरक्षणासंदर्भात अभ्यास करावा लागेल. स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य व त्याचा तपशील असावा. आजार व त्याचे निदानाचे प्राधान्यक्रम ठरवूनच विमा पॉलिसी घ्यावी. त्यात संबंधित रुग्णाचा आजार उपचार करत असताना संभाव्य खर्च किती येईल? अंदाजित प्रतिदिवसाचा खर्च, रुग्ण दवाखान्यात भरतीपूर्वी व नंतर येणारा खर्च विचारात घ्यावा लागतो.

विमा पॉलिसीमध्ये समावेश असणा-या व नसणा-या आजाराची यादी समजून घ्यावी. त्यानुसारच विमा पॉलिसीचे कवच घेण्याचा विचार करावा. तसेच प्रीमियम रक्कम देखील माफक असावी. कारण असा खर्च नॉन रिफंडेबल असतो हे आरोग्य विम्याच्या लाभार्थ्यास समजून घ्यावे लागेल. तसेच पॉलिसी कळल्यानंतर संबंधित आजाराचा पॉलिसी क्लेमचा फायदा मिळविण्याचा प्रतीक्षा कालावधी माहीत असावा लागतो.

बहुतेक विमा पॉलिसीच्या योजनेत विमा खर्च मर्यादा ओलांडल्यानंतर गरज भासल्यास तेवढी रक्कम पुन्हा २ ते ३ वेळा भरता येते काय? पुनर्भरणा झालेली रक्कम किती प्रकारच्या आजारांसाठी उपयोगी पडते. पॉलिसीमध्ये खर्चाची कमाल मर्यादा किती असते हे समजून घ्यावे. त्याचबरोबर संबंधित पॉलिसीसाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज भासते काय? काही आजारांसाठी वैद्यकीय तपासणी सक्तीची असते.

विम्याचा फायदा घेताना सर्वप्रथम दवाखान्यातील संपूर्ण खर्च करायचा व त्यानंतर ठराविक दिवसांत सर्व बिले खर्च झालेली विमा कंपनीकडे क्लेमसाठी पाठवावी लागतात. त्यानंतर जेवढ्या खर्चाचा क्लेमसाठी अर्ज करता त्यातील खर्चाची तपासणी करून योग्य खर्च दिला जातो. दुसरी पध्दत म्हणजे रोखविरहित अथवा कॅशलेस पध्दतीत विविध दवाखान्यांची खात्री केली जाते. संबंधित आजाराची सोय असेल तरच कॅशलेसची सुविधा मिळते.

आरोग्य विमा पॉलिसी घेताना थर्ड पार्टीची सुविधा आहे काय? थर्ड पार्टी इन्शुरन्स संदर्भात विमा कंपनीव्यतिरिक्त आपल्या दाव्याची प्रक्रिया करणारी कंपनी असते. यासाठी कंपनीची प्रतिमा तपासावी. पूर्वीचा अनुभव गुगलवर सर्च करावा. क्लेम सेटलमेंट रेशो हा खूपच महत्त्वाचा असतो. कारण लाभार्थ्याचे दावे मंजूर करण्याचे गुणोत्तर असते. दावा फेटाळल्यास विमा कंपनीची पत घसरत असते. याचा शोध पण घ्यायला हवा.

आरोग्य विमा दावा पुढील कारणामुळे नाकारला जातो. त्यासाठी विम्याचा लाभ घेण्यापूर्वी कागदपत्रे, टर्म व कंडिशन व्यवस्थित समजून घ्याव्या. अनेक व्यक्ती विमा कंपनीस चुकीची किंवा अपूर्ण माहिती देतात. ज्यात कुटुंबाची माहिती, वय, उत्पन्न याचा समावेश होतो. त्यामुळे आपला क्लेम हा फेटाळला जाऊ शकतो. तसेच ज्या आजाराची सुविधा मिळत नाही, पात्र विमा सेवा दिल्या जात नाहीत अशाची माहिती असावी.अनेकवेळा प्रतीक्षा कालावधीचा अंदाज आलेला नसतो. त्यामुळे विम्याचा दावा फेटाळला जाऊ शकतो. काही आजारांचा समावेश हा ठराविक कालावधीत केलेला नसतो. यामध्ये तीन प्रकारचे वर्गीकरण केले आहे. याची कल्पना विमा लाभार्थ्यास असावी लागते.

आजाराचा लाभ मिळण्यापूर्वी आजाराचा कालावधी असतो. जो अपघाताव्यतिरिक्तचा कालावधी साधारणत: तीस दिवसांचा असतो. प्रीहासिस्टिंग कालावधी म्हणजे संबंधित आजाराचा कालावधी समजणे आवश्यक असते. हा २ ते ४ वर्षांचा असू शकतो. ज्यामध्ये जुने आजार मधुमेह, रक्तदाब उच्च प्रकारचा यामध्ये समावेश असतो. नवीन विशिष्ट प्रकारचे आजार यामध्ये स्पेशल डिसीजचा समावेश असतो. अशा आजाराची माहिती लाभार्थी वर्गास असावी लागते. रुग्णालयात वेळेच्या बंधनाकडे दुर्लक्ष केले. जसे रुग्णाची दवाखान्यात भरती व डिस्चार्ज मिळाल्यापासून २४ तासांत व ३० दिवसांत सूचना अनुक्रमे द्यावी लागते.

वार्षिक विम्याचा हप्ता भरण्यास विलंब झाला तरी दावा फेटाळला जाऊ शकतो. यासाठी कोरोनाच्या काळात आरोग्य विमा घेण्याचा विचार आहे. त्याचबरोबर स्वत: व कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याचे संरक्षण केले जाते. वास्तविक पाहता आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. दुर्दैव हेच आहे आरोग्य सोडून धनसंपदेकडेच सा-या विश्वाचे लक्ष असते. अशांना एक चपराक बसली आहे की आरोग्य हीच धनसंपदा, संपत्ती आहे. आपले आरोग्य निरोगी असेल तरच आपल्या संपत्तीला अर्थ व सौभाग्य असेल. तेव्हा आरोग्य सांभाळा, मास्क बांधा, सुरक्षित राहा. आपल्या (घर)कामात व्यस्त राहा.

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

धर्माबाद तालुक्यात,३७ टक्के लसीकरण पूर्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या