24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeविशेषचुरस वाढली, प्रतिष्ठा पणाला!

चुरस वाढली, प्रतिष्ठा पणाला!

एकमत ऑनलाईन

२० जूनला राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या शिवसेनेने दोन, राष्ट्रवादीने दोन, काँग्रेसने दोन तर भाजपने पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तसेच सदाभाऊ खोतांना आपल्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून नवी खेळी केली आहे. १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत आणि म्हणूनच ही निवडणूक चुरशीची होणार आहे. यामध्ये अपक्ष आणि छोटे पक्ष यांची भूमिका निर्णायक राहील. २०२४ मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे. ते स्वबळ किती मजबूत आहे, याची झलक या निवडणुकीत पहायला मिळेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

येत्या २० जूनला राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार हे आता सगळ्याच पक्षांकडून होणा-या धावाधावीतून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळेही ही निवडणूक उत्कंठा वाढवणारी होईल यात शंका नाही. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी प्रत्येकी दोन तर भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे हे निवडणूक लढवणार आहेत तर भाजपचे राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे उमेदवार आहेत. याखेरीज सदाभाऊ खोतांना आपल्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून भाजपाने या निवडणुकीतील चुरस आणखी वाढवली आहे.

उमेदवार निश्चित झाल्यावर आता एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झाले आहे. लहान पक्ष आणि अपक्ष यांच्यावर सगळ्याच पक्षांचा डोळा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधी मतदान होण्याची भीती आहेच.
राज्यातील राजकारण सध्या अतिशय संवेदनशील बनले आहे. महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही अशी भाजपची अटकळ होती. पण अनेक प्रकारची टीका होऊनही हे सरकार टिकले आहे आणि मुख्य म्हणजे कामही करत आहे. त्यामुळे भाजपला राज्यातील आपले मजबूत स्थान परत मिळवायचे असेल तर त्याला आपली ताकद वाढवावी लागणार आहे. कारण आता राज्यात भाजपला कुणीही साथीदार नाही. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाजपला पाठिंबा मिळेल असा अंदाज आहे. पण खुद्द राज ठाकरे यांनी त्याबाबत कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही. २०२४ मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर निवडणूक लढवावी लागली तर ते स्वबळ हा पक्ष राज्यात मिळवू शकेल का याची झलक या विधान परिषद निवडणुकीत पहायला मिळेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

भाजपकडे विधान परिषदेतील चार आमदार निवडून आणू शकेल इतके संख्याबळ आहे. पण पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला मुत्सद्देगिरीने प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच सदाभाऊंना विजयी करण्यासाठीही भाजपला कूटनीती अवलंबावी लागणार आहे. काँग्रेसनेही चंद्रकांत हांडोरे यांना निवडणूक रिंगणात आणले आहे. म्हणजे आता दहा जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या परिस्थितीत भाजप जर आपला पाचवा उमेदवार आणि सदाभाऊंना निवडून आणू शकला तर तो महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना विधानसभा निवडणुकीत चांगली टक्कर देऊ शकेल हे स्पष्ट होईल. नाहीतर या पक्षाला राज्यात आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील.

शिवसेनेने यावेळी ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांपेक्षा तरुण नेत्यांना संधी देण्याचे ठरवले आहे. सचिन अहीर आणि आमशा पडवी हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून चार वर्षांपूर्वी शिवसेनेत आले. वरळी हा त्यांचा मतदारसंघ. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी तो त्यांनी सोडला. त्याची दखल आता कुठे घेतली गेली आहे. अर्थात अहिर यांच्याविरोधात शिवसेनेत नाराजी आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आमशा पडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. त्यांनी या भागात शिवसेनेला उभे करण्यासाठी बरेच काम केले आहे. सचिन अहिर यांना विधान परिषदेची संधी मिळणार याची अपेक्षा होती. पण आमशा पडवी यांना ही उमेदवारी देऊन शिवसेनेने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पडवी हे सामान्यांमधून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याने सामान्य शिवसैनिकाला समाधानच मिळेल, असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे.

राज्यसभेसाठी संजय पवार यांच्यासारख्या सामान्य पण सेनेशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकाला उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनात पक्षनेतृत्वाविषयीचा आदर वाढवण्याचे काम केले आहे. आमशा पडवी हे नंदुरबारचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये अक्कलकुवा मतदारसंघातून के. सी. पडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा ते पराभूत झाले. पण २०१९ च्या निवडणुकीत त्यांना ८० हजारहून अधिक मते मिळाली होती. नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तेथे आमशा पडवी यांनी शिवसेना रुजवली. या जिल्ह्यात मजबुतीने पाय रोवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. म्हणूनच पडवी यांना विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमधून नाराज होऊन बाहेर पडलेले एकनाथ खडसे यांना विधान परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आणखी सक्रिय होणे शक्य होणार आहे. एका अर्थाने नाथाभाऊंचे राजकीयदृष्ट्या पुनर्वसन होणार आहे. त्यातून खानदेशात भाजपच्या गिरीश महाजन यांच्यासमोर खडसे यांच्या रूपात राष्ट्रवादीला आव्हान उभे करता येणार आहे.

काँग्रेसचे भाई जगताप यांची उमेदवारी निश्चित होतीच. पण दुसरा उमेदवार काँग्रेस उभा करणार की नाही याबाबत संभ्रम होता. चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने विधान परिषद निवडणूक अटीतटीची होईल याची व्यवस्था केली आहे.
भाजपने निश्चित केलेल्या पाच उमेदवारांपैकी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि राम शिंदे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, त्यासाठी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्नही केले. पण दिल्लीतील पक्षनेतृत्वाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्याऐवजी गोपीनाथ मुंडे यांच्याच कट्टर समर्थक आणि विश्वासू अनुयायी उमा खापरे यांना संधी दिली आहे. उमा खापरे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. अत्यंत आक्रमक स्वभावाच्या उमा खापरे पिंपरी-चिंचवडच्या असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या निष्ठावान सहकारी होत्या. प्रदेश भाजप कार्यकारिणीत त्यांनी गेली २० वर्षे विविध पदांवर काम केले आहे. धडाडीच्या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. एका अर्थाने पंकजा यांना पर्याय उभा करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो आहे. भागवत कराड यांना राज्यसभेवर उमेदवारी आणि केंद्रात राज्यमंत्रिपद देणे हा याच रणनीतीचा भाग होता.

श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. अभ्यासू आणि तितकेच आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ते जवळचे सहकारी आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना ते त्यांचे ओएसडी होते. २०१९ मध्ये फडणवीसांचे स्वीय साहाय्यक अभिमन्यू पवार यांना थेट विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. तसेच त्यांच्या विजयासाठी स्वत: फडणवीसांनी प्रयत्नही केले होते. आता श्रीकांत यांच्या उमेदवारीने फडणवीसांचा आणखी एक मोेहरा लोकप्रतिनिधी बनत आहे. यातून पक्षावर असलेली आपली पकड आणखी मजबूत करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न सहज लक्षात येतो.
सगळ्याच पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्याची शपथ घेतली आहे. त्यासाठी सर्व प्रकारची धावपळ ते करत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची ठरणारी ही निवडणूक राजकारणात कुणाचे हात आणखी बळकट करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

-विदुला देशपांडे
ज्येष्ठ पत्रकार

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या