खूप दिवसांनी काँग्रेसमधील ‘चिंतन समूह’ जागा झालेला दिसतो आहे. गेल्या सहा वर्षांत भाजपच्या ‘थिंक टँक’ने विचारपूर्वक अविचारी प्रचार किती प्रभावी होऊ शकतो, सामान्य माणसाला कसे फसवले जाऊ शकते याचे अनेक प्रयोग करून दाखवले. महागाई वाढल्याच्या नावावर, देशातल्या काळ्या पैशाच्या नावावर, भ्रष्टाचाराच्या नावावर…. या सगळ्या प्रचार-अपप्रचारात भाजपच्या या चिंतन ग्रुपमागे काही बुध्दिवादी लोक होते. भ्रम पैदा करण्यात ते पटाईत होते. त्यांच्या सहाय्याला अनेक वाहिन्या होत्या, त्यामुळे प्रचाराच्या निमित्ताने अपप्रचाराची एक रणधुमाळी सहा वर्षे धूळवडीसारखी खेळली गेली, त्यामुळे सहा वर्षांत जेव्हा महागाईमुळे माणसे हैराण झाली, सामान्य माणसांचे जीवन अशक्य झाले त्यावेळी भाजपच्या या गोबेल्स प्रचारतंत्राला त्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे होते. ब-याच दिवसांनंतर काँग्रेसच्या वतीने जारी झालेले एक भित्तिपत्रक पाहण्यात आले. त्याचा परिणाम किती होईल, ते काळ ठरवील. पण ग. दि. माडगूळकर यांनी ‘गीतरामायणात’ म्हटल्याप्रमाणे
‘अन्त उन्नतीचा होई रे जगात,
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अन्त’
या ओळी आता भाजपला लागू पडत आहेत. अपप्रचाराचे शिखर गाठून भाजप आणि त्यांचे पंतप्रधान अत्युच्च शिखरावर पोहोचले. लोकप्रियतेची आणि पाठिंब्याची उंचीच आता संपली. त्याच्यावर आता उंची नाही, तिथून आहे तो उतारच आहे. त्यामुळे काँग्रेसने या सगळ्याचा विचार करून एक प्रभावी पोस्टर टाकले आहे. राहुल गांधी आक्रमक झालेले आहेत. राज्य पातळीवरचे काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर, प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष नाना पटोले यांनी मैदानात उतरण्याची सुरुवात केलेली आहे.
कधी नव्हे ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस – दोन्ही काँग्रेसचे अध्यक्ष कमालीचे एकरूप होऊन कामाला भिडलेले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे. अशा या सगळ्या नव्या वातावरणात काँग्रेस आक्रमक झाली तर, २०२४ पर्यंत सहा वर्षांतील महागाई, बेकारी, काळ्या पैशाचा निर्माण केलेला खोटा भ्रम, शेतक-यांवर जुलूम, जबरदस्ती करणारे कायदे, जी. एस. टी., नोटाबंदी या सगळ्या धोरण आणि घोषणांचा शेवटी झालेला परिणाम महागाईच्या स्फोटात होईल. सहा वर्षांत पेट्रोलचे दर ५० रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत गेले आहेत, डिझेलचे दर ४४ रुपयांवरून ९० रुपयांवर गेले, घरगुती गॅस सिलेंडर ३५० वरून ८०० रुपयांवर आला आणि प्रत्येक पेट्रोलपंपावर पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रासह रसोई तयार करणा-या महिलेचे चित्र छापून पुन्हा घोषणाबाजी झाली, त्या जाहिरातीचा भांडाफोड एनडी. टीव्हीने निकालात काढला.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळेना
प्रत्येक गोष्टीमध्ये गेल्या ६ वर्षांत सरकार उघड्यावर पडले आहे. रिझर्व्ह बँक आणि सरकार असा संघर्ष कधीच नव्हता, विकासदर घसरत गेला, त्याची काळजी रिझर्व्ह बँकेला वाटली. पण अर्थमंत्र्यांना आणि केंद्र सरकारला वाटली नाही. देशातल्या एक-एक संस्था विकायला सुरुवात झालेली आहे. कालचा दुय्यम, तिय्यम दर्जाचा उद्योग व्यावसायिक गेल्या सहा वर्षांत देशात क्रमांक दोनचा उद्योगपती झालेला दिसतो आहे आणि सामान्य माणसं महागाईच्या वणव्यात होरपळून गेली, असे हे अतिशय विसंगत चित्र सातत्याने लोक अनुभवत आहेत. परिणामी येणा-या प्रत्येक निवडणुकीत देशातल्या सामान्य माणसांचा मुख्य शत्रू भाजप ठरणार आहे. काही राज्यांत होणा-या निवडणुकांमध्ये राजकारण खेळले जातेय, बंगालसारख्या राज्यात आठ टप्प्यांत कधीही निवडणूक झाली नव्हती, ‘ही व्यवस्था’ कोणासाठी केली आहे हे न समजण्याएवढा बंगाली मतदार मूर्ख नाही. त्यामुळेच ‘भाजप विरुध्द सर्व विरोधक’ अशी बंगालमधली लढाई, मोदी-शहा यांचे बेत हाणून पाडेल. जे महाराष्ट्रात घडले ते बंगालमध्येही घडेल.
पश्चिमेकडचे हे महत्त्वाचे पुरोगामी राज्य फडणवीस, चंद्रकांत पाटील टोळीच्या हातातून आघाडीने हिसकावून घेतले, आता तीच आघाडी बंगाल भाजपच्या हातात जाऊ देणार नाही. सहा वर्षांपूर्वीच्या महागाईच्या प्रचार वाक्यांमध्ये बदल करून काँग्रेसने सुरुवात चांगली करून दिली. त्यामुळे मोदी सरकार सामान्यांसाठी फार महागात पडले आहे, त्याची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागणार आहे. मोदींचे खास मित्र अमेरिकेचे ट्रम्प यांच्या प्रचाराकरिता मोदींनी अमेरिकेतील निवडणूक प्रचार मोहिमेत सहभागी होऊन आपण कोणाचे मित्र आहोत हे जाहीरपणे सांगून टाकले. अमेरिकेतल्या जनतेने मोदींच्या मित्राला नाकारले. या देशातली जनता वाढत्या महागाईमुळे आता मोदींनाच नाकारण्याची वेळ आली आहे म्हणून काँग्रेसने योग्य वेळी प्रसिध्द केलेल्या
‘जनतापर महंगाई की मार,
महंगी पडी मोदी सरकार…’
या प्रचार फलकाचे परिणाम निश्चितच प्रभावी ठरणार आहेत. सहा वर्षांपूर्वीचे ते दिवस… त्या घोषणा… खासकरून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपने निवडणूक प्रचारात केलेला वापर, भडकत्या महागाई-विरोधातील ती आगपाखड, काळ्या पैशाविरोधातील पध्दतशीरपणे रचलेले कुंभाड… त्यावेळच्या धादांत खोट्या प्रचाराचा ठेका घेतलेल्या काही वाहिन्यांनी भाजप आणि मोदी यांची उचललेली पालखी, त्यावेळचे देशात निर्माण झालेले भय, खुद्द मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या भाजपच्याच मंत्र्यांना गुदमरून टाकणारे देशातील ते वातावरण, सामान्य माणसांचा कसलाही विचार न करता गेल्या ६ वर्षांत देशातल्या एक-एक संस्थांची सुरू झालेली विक्री… गेल्या सहा वर्षांचे हे फलित आहे. ज्यांनी महागाईविरोधात फलक लावून मते मागितली त्याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात अधिकारावर आलेल्या भाजपच्या ६ वर्षांच्या काळात सामान्य माणसाचे अशक्य झालेले जगणे… जरा आठवून बघा.
मधुकर भावे