24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeविशेष‘ईएसजी’च्या अंतरंगात

‘ईएसजी’च्या अंतरंगात

एकमत ऑनलाईन

शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विषय येताच ज्या कंपन्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत, त्यांचाच पर्याय पुढे येतो. परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून आपण बिगरवित्तीय निकषांकडे म्हणजेच पर्यावरणीय संवेदना, सामाजिक बांधीलकी आणि कॉर्पोरेट प्रशासन (ईएसजी) अशा मुद्यांवरही विचार करणे आवश्यक आहे. या निकषांद्वारे कंपन्यांचे मूल्यांकन समग्र समाजासाठी सकारात्मक आणि नकारात्मक योगदानाच्या आधारावर केले जाते. भारतात ईएसजीसारखे निकष अद्याप बाल्यावस्थेत असले, तरी जागतिक स्तरावर गुंतवणुकीच्या क्षेत्रात हा विचार चांगलाच रुजला आहे. भारतात तो लोकप्रिय होण्यात तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरेल. या पार्श्वभूमीवर, ईएसजी निकष म्हणजे काय, हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे.

जागतिक तापमानवाढीमुळे जागतिक स्तरावर सरासरी तापमान वाढत आहे आणि त्यामुळे हिमनद्या वितळत चालल्या आहेत. मानवजातीने पर्यावरणाची सातत्याने उपेक्षा केल्यामुळे वनक्षेत्रात घट होत चालली आहे. नद्यांचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे आणि वातावरणात घातक वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे देशात एकाच वेळी कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टी, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारपीट अशी संकटे येत आहेत. अर्थात, आता सर्वकाही संपुष्टात आले असे समजण्याचे कारण नाही. हरितक्षेत्र वाढविणे, अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर, उत्तम सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रदूषणावर नियंत्रण असे उपाय योजल्यास आपण पर्यावरणाचे संरक्षण अजूनही करू शकतो. कंपन्या आपला व्यवसाय चालविण्यासाठी विशिष्ट क्षेत्रातून कच्चा माल म्हणजेच नैसर्गिक स्रोत आणि श्रमबळ घेत असतात. या संसाधनांचा वापर करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कंपन्यांनी त्या संसाधनांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. कंपनी अधिनियम २०१३ अन्वये निव्वळ नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी (सीएसआर फंड) खर्च करण्याची तरतूद आहे. अनेक कंपन्या स्थानिक पर्यावरणाचे रक्षण, स्थानिक लोकांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सोयी तसेच आरोग्य सुविधा प्रदान करण्यासाठी मदत करतात. अशा कामांमुळे एका समृद्ध समाजाची रूपरेषा तयार करता येते.

कंपनी व्यवस्थापनात निष्ठा आणि प्रामाणिकपणाला खूपच महत्त्व असते. या निकषावर कंपनी उत्कृष्ट ठरल्यास अशा कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक येण्याच्या वाटा खुल्या होतात. सेबी या शेअर बाजारातील नियामक संस्थेने बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या प्रशासनात कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे पालन करण्यासंदर्भात काटेकोरपणे लक्ष ठेवले आहे. काही कंपन्या सेबीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना उत्साहाने पूर्ण करतात तर उर्वरित कंपन्या केवळ कागदोपत्री पूर्तता करतात. परंतु इतिहास असे सांगतो की, काटेकोरपणे नियम पाळणा-या कंपन्याच दीर्घकाळात यशस्वी ठरतात आणि सतत प्रगती करत राहतात. अशा प्रकारे इकॉलॉजी (ई), सोशल (एस) आणि गव्हर्नन्स (जी) असे हे ईएसजी निकष कंपन्यांच्या सातत्यपूर्ण विकासासाठी सा भूत ठरतात.

कोरोना प्रतिबंधक लस आल्यावर आरोग्य कर्मचा-यांना प्राधान्य !

चांगली कामे केल्यास चांगले फळ मिळते अशी प्राचीन काळापासून धारणा आहे. व्यापार आणि गुंतवणुकीतसुद्धा हा मंत्र लागू पडतो. जर कंपन्या चांगल्या कार्यप्रणालीचे पालन करत असतील, तर ग्राहकांचा त्यांच्याविषयीचा विश्वास वाढतो आणि ब्रँड मजबूत होतो. या संपूर्ण प्रक्रियेचे पालन केल्यामुळे कंपनी चांगला नफा कमावू शकते. आजकाल काही उद्योगसमूह कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी हॉटेल्स नि:शुल्क उपलब्ध करून देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचा-यांना त्यांच्या कार्यस्थळी भोजन पोहोच करीत आहेत. अशा प्रकारच्या कामांकडे पाहून अनेक ग्राहक अशा कंपन्यांच्या उत्पादनांना प्राधान्य देत आहेत. यामुळे दीर्घावधीसाठी ब्रँडबाबत निष्ठा आणि नफा या दोन्हींमध्ये आकर्षकरीत्या वाढ होऊ शकते. जी कंपनी ईएसजी निकषांचे पालन दीर्घावधीसाठी करत राहते त्या कंपनीचा ब्रँड निश्चितपणे मजबूत होतो.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी भारतात सूचिबद्ध सर्व कंपन्यांकडून ईएसजी निकषांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणे शक्य नाही. म्युच्युअल फंड कंपन्यांकडून सादर केल्या जाणा-या ईएसजी फंडात गुंतवणूक करून या निकषांचे पालन गुंतवणूकदार करू शकतात. सध्या तरी या क्षेत्रात क्वांटम इंडिया ईएसजी इक्विटी फंड, एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड आणि अ‍ॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड यांसह तीन योजना आहेत. याच यादीत आता आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचाही समावेश झाला आहे. कंपनीने २१ सप्टेंबर रोजी आपला एनएफओ जारी केला आहे. ज्या कंपन्या तंबाखू, दारू किंवा जुगारासारख्या समाजासाठी घातक उत्पादनांच्या व्यवसायांमध्ये आहेत, किंवा ज्या कंपन्या जास्त प्रदूषण करतात, अत्याधिक पाणी वापरतात, अशा कंपन्यांना नकारात्मक श्रेणीत ठेवले जाते. अशा कंपन्या ईएसजी फंडात समाविष्ट केल्या जात नाहीत. ईएसजी फंडाचा पोर्टफोलिओ तयार करतेवेळी फंड मॅनेजर सेबीद्वारे जारी करण्यात आलेल्या १००० टॉप कंपन्यांच्या व्यावसायिक जबाबदारी अहवालावर विश्वास ठेवतात. या अहवालात कंपन्यांच्या ईएसजीसंदर्भात तपशीलवार खुलासे होतात. फंड मॅनेजर विविध पैलूंचे मूल्यांकन करून आंतरिक प्रक्रियाही अवलंबितात. ज्या कंपन्या या कसोटीवर पात्र ठरतील, त्यातच गुंतवणूक केली जाते. अशा प्रकारे ईएसजी गुंतवणूक हा दीर्घावधीसाठी नैतिक स्वरूपाचा फायदेशीर सौदा ठरतो.

बळवंत जैन
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या