20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeविशेषप्रेरणा देणारा ‘काजवा’

प्रेरणा देणारा ‘काजवा’

एकमत ऑनलाईन

तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. घरी दोन वेळा जेवणाची भ्रांत असणारा ऊसतोड कामगाराचा एक
मुलगा शिक्षणासाठी अंबाजोगाईच्या महाविद्यालयात शिक्षणासाठी येतो. ‘नापास झालास तर शिक्षण बंद’ ही वडिलांनी घातलेली अट त्याच्या काळजात पक्की असते. क्षणाक्षणाला दारिद्र्याचे चटके बसलेल्या या विद्यार्थ्याला प्रचंड मोठा धक्का बसतो तो मित्राच्या वर्तनाने. त्याला कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी आय.टी. आय.ला प्रवेश मिळाल्याचे खोटे पत्र टाकतात. प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातून टी.सी. काढून देण्यासाठी मदतही करतात. प्रवेशाच्या तारखा संपून गेलेल्या. आता काय करायचं? हा प्रश्न होता.

ऊसतोड कामगार असणारे मायबाप आणि आता आपलीही नियुक्ती उसाच्या फडातच या भयावह कल्पनेने त्या विद्यार्थ्याच्या पायाखालची वाळूच घसरली. कोयता आणि उसाचा फड त्याच्याभोवती फेर धरून नाचू लागले.दुर्दैवाची कहाणी ऐकायला कुणी समोर उभा राहू दिलं तरी पाहिजे. बीडच्या बलभीम कॉलेजचे प्राचार्य शिंदे सरांनी जर मानवीय दृष्टिकोन घेतला नसता तर ..आज ना ’काजवा’ प्रकाशित झाला असता ना शिक्षण खात्याला पोपट काळे यांच्यासारखा उपक्रमशील अधिकारी मिळाला असता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तावून-सुलाखून निघालेल्या पोपट काळे यांनी मग शिक्षणासाठी वाट्टेल ती कष्टाची कामं केली. वडिलांच्या संतापाला सामोरे जाताना सळसळत्या रक्ताच्या या तरुणाने आपली वाट चुकू दिली नाही. जिवावर उठलेल्या प्रसंगानंतरही या पठ्ठ्याने शिक्षणाची वाट सोडली नाही. महाविद्यालयीन जीवनातच वसंत इंगोले नावाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेचा दीप प्रज्ज्वलित केला. सरांनी घेतलेल्या जिद्दीच्या परीक्षेत पोपटराव उत्तीर्ण झाले.

शासकीय सेवेत राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाल्यावर त्यांनी नागरसोगा प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून केलेल्या शैक्षणिक प्रयोगातून या शाळेचे रूपडे बदलले. शासकीय सेवेत असताना वेगवेगळ्या जबाबदा-या पार पाडताना त्यांनी नि:स्पृहतेने केलेली कामे अनेकदा आव्हानात्मक ठरली. वास्तविक पाहता कॉपीमुक्त परीक्षा घेणे, पटपडताळणी, संचमान्यता ही शिक्षण क्षेत्रातील नियमित कामं. पण त्यांना नियमाच्या अधीन राहून करणं एक अग्निदिव्य असतं. अधिकारी म्हणून काम करत असताना व जबाबदा-या सांभाळत असताना एक दृष्टिकोन ठेवून काम केले की मग त्याची दिशा ठरते. ही ठरलेली दिशा मग तुम्हाला कर्तव्यासाठी प्रोत्साहित करते. मात्र त्यानंतरचे सारे अवघड असते. आपल्या मनासारखं काम करून घेणा-या मंडळींना मग हे पचत नाही. नियमाची वाट चालणा-याच्या वाटेत काटे पेरले जातात. अमिषांना बळी पडला नाही तर पाहून घेण्याची धमकी दिली जाते. ‘आपलं काय जातंय, घ्या ना अ‍ॅडजेस्ट करून’असा साळसूद सल्लाही दिला जातो. अन् शेवटी हा नियमवाला कुठं सापडतो हे पाहून त्याची कोंडी केली जाते. आणि एवढ्यावर तो पांढरे निशाण फडकवत नसेल तर बदनामी, चौकशा, बदली ही अस्त्रं असतातच.

विविध पदांवर काम करताना त्यांनी घेतलेल्या अनुभवांचा हा दस्तऐवज केवळ त्यांच्यापुरता उरत नाही. तो त्यांनी लेखणीच्या माध्यमातून समाजापुढे आणला आहे. व्यक्ती हे निमित्त असतं आणि नोकरी हा पण आयुष्याच्या दैनंदिनीचा भाग असतो. पण एखाद्या अधिका-याची ही दैनंदिनी पथदर्शक असते. यातील अनुभव हे या वाटेवर पुढे चालणा-यांसाठी मोलाचे ठरतात. आपण केवळ नियमाचे बांधील असून चालत नाही तर त्यासाठी नि:स्पृह असावं लागतं. नियम आणि नि:स्पृहतेबरोबरच मानवीय दृष्टिकोन असावा लागतो. तो असल्यामुळेच हा ‘काजवा’ आपलं अस्तित्व टिकवून तर राहिलाच पण त्यानं अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचं काम केलं. जगण्यासाठी व शिकण्यासाठीचा संघर्ष हा पहिला भाग आणि सेवेतील संघर्ष हा दुसरा भाग. हा दुसरा संघर्ष त्यांनी ज्या पद्धतीने केला आहे तो लाजवाब आहे. आक्रस्ताळेपणा अथवा नायकत्व घेण्याच्या मोहात अनेकदा तत्त्वांच्या लढाईत नायक हरलेले आहेत. काळे सरांनी नायकत्व घेण्याचा मोह टाळला आणि विधायक संघर्षातून आष्टी ते पुणे व्हाया नांदेड, लातूर झालेला प्रवास केवळ वाचनीय ठरत नाही तर पथदर्शक ठरतो. मराठी साहित्य-विश्वात एखाद्या पुस्तकाची एक आवृत्ती संपणं ही मोठी घटना असताना प्रस्तुत पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.

-धनंजय गुडसूरकर,
मोबा. : ९४२०२ १६३९८

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या