24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेषहार्दिकच्या सोडचिठ्ठीचा अन्वयार्थ

हार्दिकच्या सोडचिठ्ठीचा अन्वयार्थ

एकमत ऑनलाईन

गुजरात काँग्रेसचा तरुण नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसला रामराम ठोकला आहे आणि कहर म्हणजे ज्या भाजपला विरोध करत हार्दिक पटेलने आपली राजकीय कारकीर्द सुरू केली, त्या भाजपातच तो प्रवेश करणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक पटेलने कितीही उलटसुलट राजकीय भूमिका घेतल्या असल्या तरी गुजरातमध्ये पाटीदार समुदायावर त्याचा प्रभाव आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आत-बाहेर करणारे राजकीय नेते सगळ्याच पक्षांत असतात. पण आधीच गलितगात्र झालेल्या पक्षाला उभारी देणा-या नेत्यांनीच त्या पक्षाला रामराम ठोकणे हे काही योग्य लक्षण नाही.

गुजरातमध्ये येत्या सहा-सात महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तेथील राजकारणात उलथापालथी सुरू झाल्या आहेत. निवडणुका आल्या की पक्षबदलू राजकारणाला उधाण येते आणि तसे आता येऊ लागले आहे. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि ते भाजपमध्ये सामील होणार अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.

पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर घणाघाती टीका करत हार्दिक पटेलने पक्ष सोडला आहे. त्याने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली सगळी खदखद स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्वाचे एकूणच पक्ष आणि कार्यकर्ते यांच्याकडे लक्ष नाही आणि गुजरात काँग्रेस नेते या नेत्यांसाठी चिकन सँडविचची व्यवस्था करण्यातच अधिक गुंतलेले असतात, अशी टीका त्याने केली आहे. हार्दिक पटेलचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे असे राजकीय विश्लेषक मानत असले तरी हे कधी ना कधी होणारच होते याची जाणीव काँग्रेस नेतृत्वालाही होतीच. हे सगळे भाजपनेच घडवून आणले आहे आणि हार्दिक पटेल भाजपात जाणार असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

हार्दिक पटेलच्या मनात वेगळे काही सुरू आहे याची कुणकुण गेल्या महिन्यांपासूनच लागली होती. गुजरातमधील एक प्रभावी पाटीदार नेता नरेश पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे हार्दिक पटेल अस्वस्थ झाला असे काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. नरेश पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षातील आपल्या स्थानाला धक्का लागेल अशी भीती हार्दिक पटेलला वाटू लागली आणि म्हणूनच त्याने नरेश पटेलना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणायचाही प्रयत्न केला होता. राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरालाही हार्दिक पटेल उपस्थित नव्हता. तसेच अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातचा दौरा केला तेव्हा हार्दिक पटेलला भेटण्याचे नाकारले. १० मे रोजी गुजरातच्या दाहोडमध्ये झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी जिग्नेश मेवानीचे कौतुक केले. पण हार्दिक पटेल त्या सभेला उपस्थित असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यातून हार्दिक पटेल आणि काँग्रेस यांच्यात काहीही सुरळीत नाही हे दिसून येत होते. त्यामुळे हार्दिक पटेल काँग्रेसमधून बाहेर पडणार हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक होते, असे दिसते.

अर्थात सहा महिन्यांनी होणा-या निवडणुकांना सामोरे जाताना एखाद्या प्रभावी नेत्याने पक्षाबाहेर पडणे हे काँग्रेसला जडच जाणार आहे. ज्या नरेश पटेल यांच्याबरोबर काँग्रेसची बोलणी सुरू आहेत, त्यांनी अद्याप आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केलेली नाही. पाटीदार समुदायाला आरक्षण मिळावे यासाठी गुजरातमध्ये मोठे आंदोलन उभे करत हार्दिक पटेल २०१५ मध्य प्रकाशझोतात आला. त्याचे तरुण नेतृत्व सगळ्यांनाच भावले आणि गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला त्यामुळे धक्का बसला. हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये सहभागी झाला आणि २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्याच्याच प्रभावी नेतृत्वामुळे काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली. इतकी की भाजपला निसटते बहुमत मिळाले. साहजिकच हार्दिक पटेलचे गुजरात काँग्रेसमध्ये प्रस्थ वाढले. हार्दिक पटेलबरोबर जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर यांचीही काँग्रेसला २०१७च्या विधानसभा निवडणुकीत मदत झाली होती.

पण त्यानंतरच्या पाच वर्षांत गुजरातमध्ये काँग्रेस अधिकाधिक बळकट होण्याऐवजी दुर्बळच होत गेली. अल्पेश ठाकोरने काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. आता हार्दिक पटेलही त्याच्याच पावलावर पाऊल टाकून भाजपात प्रवेश करेल असा अंदाज आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरी आणि वाद संपुष्टात आणून एकदिलाने काम करण्यासाठी प्रवृत्त करणे हे पक्षनेतृत्वाचे काम आहे. पण काँग्रेसमध्ये तसे काही दिसत नाही. हार्दिक पटेल याचे वर्तन वादग्रस्त असले तरी त्याचा त्याच्या समुदायावर प्रभाव आहे आणि त्याकडे कोणत्याच पक्षाला दुर्लक्ष करता येणार नाही.
१५ मे रोजी झालेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने गुजरात निवडणुकांसाठी काही धोरण आखले आहे, त्यानुसार ‘एक कुटुंब एक उमेदवारी’ आणि वय वर्षे ५० खालील नेत्यांना उमेदवारी देणे ही दोन धोरणे प्रामुख्याने आखली आहेत. पहिले धोरण कितपत अमलात येते ते दिसून येईलच, पण दुसरे धोरण अमलात यायचे असेल तर पक्षातील तरुण नेत्यांना वाव देण्याचे धोरण पक्षनेतृत्वाला आखावे लागेल. पण तसे होताना दिसत नाही. काँग्रेसचा राजकारणातील प्रभाव कमी व्हावा किंवा अगदी संपुष्टात यावा असाच भाजपचा प्रयत्न आहे. २०१४ आणि त्याही आधी काही वर्षांपासून काँग्रेसला सातत्याने अपयश आले आहे, तरीही काँग्रेसचा म्हणून असा मतदार आहे आणि तो जवळजवळ २० टक्के आहे. काँग्रेसला त्यात वाढ करता आली नसली तरी तो टिकवून ठेवण्यात यश आले आहे.

-विदुला देशपांडे
ज्येष्ठ पत्रकार

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या