23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeविशेष‘सिप’द्वारे फंडातील गुंतवणूक म्हणजे ‘थेंबे थेंबे तळे साचे’

‘सिप’द्वारे फंडातील गुंतवणूक म्हणजे ‘थेंबे थेंबे तळे साचे’

एकमत ऑनलाईन

‘‘सर मी कॉलेजमध्ये शिकतो. माझा छोटा व्यवसाय आहे. मला म्युच्युअल फंडामध्ये ‘सिप’मध्ये गुंतवणूक करायची आहे. दै.‘एकमत’मधील आपले सदर मी नियमित वाचतो. ‘सिप’ संदर्भामध्ये मला अधिक माहिती हवी आहे. ती माहिती द्याल काय?’’. काही दिवसांपूर्वी असा फोन सतीश नावाच्या व्यक्तीचा आला होता. अशा प्रकारचे हे सदर लोकप्रिय होत आहे. याचा मला सुखद अनुभवाचा धक्का बसला. सध्याच्या काळात ‘सिप’ हा शब्द म्युच्युअल फंडासंदर्भामध्ये सातत्याने वापरला जातो. नवीन गुंतवणूकदाराला ‘सिप’ म्हणजे म्युच्युअल फंडाची एक योजना आहे असे वाटते. ही एक म्युच्युअल फंडाची योजना नसून तो पैसे भरण्याचा अनेक पर्यायांपैकी एक पर्याय आहे हे सर्वप्रथम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. असे जवळपास २७ टक्के नवीन गुंतवणूकदारांना वाटते. एसआयपी ऊर्फ सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘सिप’ हा शब्द म्युच्युअल फंडात पैसे भरण्याचा एक लोकप्रिय पर्याय ठरला आहे.

म्युच्युअल फंड योजनेमध्ये पैसे भरण्याचे अनेक पर्यायी मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग म्हणजे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ होय. जेव्हा सामान्य गुंतवणूकदारास त्यांनी निवडलेल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करीत असताना, अशी रक्कम ही एकरकमी भरता येऊ शकते. त्याचबरोबर अशी रक्कम ठराविक कालावधीनंतर नियमित व सातत्याने भरता येते. अनेकांना अशा पद्धतीने पैसे भरणे म्हणजे रिकरिंग डिपॉझिट किंवा आर. डी. सारखे वाटते. दोन्हीमध्ये फरक आहे. रिकरिंग डिपॉझिटमध्ये महिन्याला पैसे भरल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये ठरवून दिलेले व्याज मिळत असते. ते वर्तमानकाळामध्ये समजत असते. परंतु सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये रक्कम गुंतविल्यानंतर त्यातून मिळणारा परतावा हा स्थिर नसतो.असा परतावा हा बाजाराचा परिणाम झाल्याने नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू हा अस्थिर व बदलता राहतो. आर. डी.वर प्राप्तिकर व्याजावर द्यावा लागतो. आर. डी. म्हणजे अल्पकालीन बचत करण्याची तरतूद होय. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करीत असताना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणूक प्रामुख्याने केली जाते. यासाठी ‘सिप’ हे माध्यम लोकप्रिय आहे.

सामान्य गुंतवणूकदारास गुंतवणूक करायची असेल व सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करायची असेल तर त्यांचे बँकेमध्ये बचत खाते असावे लागते. यासाठी संबंधित म्युच्युअल फंडसाठी प्रत्येक महिन्यास, तीन महिन्याला किंवा ठराविक कालावधीमध्ये नियमित गुंतवणूक करण्याची सुविधा अशा खात्यामार्फत मिळविता येते. यासाठी एक फॉर्म भरून सही करून बँकेला द्यावे लागते. ज्यामध्ये माझ्या खात्यांमधील असणारी रक्कम ठराविक कालावधीनंतर डेबिट करण्याची मी परवानगी बँकेला देत आहे. अशा स्वरूपाचे पत्र असते. असा कालावधी खातेदाराच्या सोयीनुसार विहित स्वरूपाची तारीख ठरविली जाते. अशी सुविधा सुरू झाल्यापासून ३० दिवसांनंतर या Auto deibt सुविधा मिळत असते. याचाच दुसरा असा अर्थ आहे की, फंडामध्ये पहिल्या महिन्याचा हप्ता स्वत:हून भरावा लागतो. ही सुविधा घेतल्यानंतर एसएमएस मिळण्याची सोय पण असते. मेसेज मिळण्यासाठी रजिस्टर मोबाईल नंबर द्यावा लागतो.

केवळ ६ जण कोरोना बाधित

ज्यामुळे त्या खात्यामधून म्युच्युअल फंडामध्ये रक्कम गेल्याची सूचना गुंतवणूकदारास मिळत असते. अनेक वेळेस गुंतवणूकदाराला अशी रक्कम गेल्याची खात्री करून घ्यावी लागते. बँक ही गुंतवणूकदाराची कायदेशीर प्रतिनिधी असते. म्युच्युअल फंडाची कायदेशीर प्रतिनिधी बँक नसते. त्यामुळे पैसे भरले आहेत किंवा नाही? याची खात्री गुंतवणूकदारालाच करून घ्यावी लागते. कोरोनाच्या काळामध्ये गुंतवणूकदाराच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे ऑटो डेबिटची सुविधा बँकेस देता येत नव्हती. यासाठी सामान्य गुंतवणूकदाराने बचत खात्यामध्ये किमान दोन-तीन हप्ते भरतील एवढी रक्कम बचत खात्यामध्ये शिल्लक ठेवावी लागेल. या संदर्भामध्ये खात्री असायला पाहिजे. अनेक वेळेला सामान्य गुंतवणूकदारास असे वाटते की ऑटो डेबिटची सुविधा मिळाली की आपले काम झाले. यानंतर जबाबदारी बँकेची आणि म्युच्युअल फंडाची असते. हा गैरसमज कायमचा काढून टाकणे गरजेचे आहे.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करीत असताना काही ‘गोल्डन रूल’ ची अंमलबजावणी कठोर स्वरूपात करावी लागते. ज्यामुळे संपत्तीनिर्मितीचे समाधान गुंतवणूकदारास मिळत असते. यासाठी जेवढ्या लवकर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्याल, तेवढा फायदा गुंतवणूकदारास मिळत असतो. गुंतवणुकीची रक्कम वाढत असते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक नियमित स्वरूपामध्ये दीर्घकाळासाठी केल्यास भविष्यामध्ये गुंतवणूक ही संपत्ती निर्मितीसाठी वळविली जाऊ शकते. यामुळे सामान्य व्यक्तीला बचतीचे रूपांतर गुंतवणुकीसाठी करून संपत्तीची निर्मिती करता येते. या सूत्राचा परिणाम गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीवर सकारात्मक होतो. यासाठी गुंतवणुकीमधील अनियमितता कठोरपणे टाळावी. नियमित स्वरूपामध्ये व सातत्याने गुंतवणूक करावी.

वास्तविक पाहता ‘सिप’द्वारे म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. त्यामुळेच परताव्यातील चक्रवाढ याचा फायदा गुंतवणुकीस मिळत असल्याने, गुंतवणुकीतील वाढ जलद होऊन संपत्ती निर्माण करता येते. ‘सिप’द्वारे गुंतवणूक करीत असताना, छोट्या-छोट्या रकमेतून गुंतवणूक करता येते. त्यामुळेच ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण गुंतवणुकीसाठी चपखल बसते. ‘सिप’द्वारे गुंतवणूक केल्यामुळे सामान्य गुंतवणूकदारास आर्थिक ताणतणाव जाणवत नाही. गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्टे सहजरीत्या पूर्ण करता येतात. त्यामुळेच वरचेवर ‘सिप’द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक व गुंतवणूकदार यामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्यामुळेच अशी गुंतवणूक लोकप्रिय ठरत आहे. प्रामुख्याने पगारदार वर्ग, व्यावसायिक, मध्यमवर्ग यांच्या मनात विश्वासाचे घर निर्माण झाल्याने ‘सिप’मधील गुंतवणुकीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

म्युच्युअल फंडामध्ये सिपद्वारे गुंतवणूक करीत असताना ठराविक रक्कम भविष्यामध्ये नियमितपणे गुंतवणूक करता येते. यामध्ये लवचिकता करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षात विहित स्वरूपातील रक्कम वाढविता देखील येते. यास ‘स्टेप अप पद्धत’ म्हणतात. त्यामुळे गुंतवणुकीमध्ये जलद वाढ होते. गुंतवणूकदारास कमी काळामध्ये जास्त रक्कम मिळविता येते. खरे पाहता वर्तमानकाळात थोडासा आर्थिक त्याग केला तर, भविष्यामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होते. आर्थिक स्वातंत्र्याकडे गुंतवणूकदाराची वाटचाल होत असते. ‘सिप’द्वारे गुंतवणूक करीत असताना तेजी-मंदीच्या आवर्तनाचा मानसिक तणाव सामान्य गुंतवणूकदारावर येत नाही. कारण अशा तेजी-मंदीच्या काळात सातत्याने व नियमित स्वरूपात गुंतवणूक केल्याने सरासरी मूल्यास चांगले शेअर्स खरेदी केल्याचे समाधान फंड मॅनेजरला मिळते. याचा अप्रत्यक्ष फायदा युनिटधारकास ‘सिप’द्वारे मिळत असतो. त्यामुळे गुंतवणूकदाराच्या आर्थिक गरजांशी असा फंड समन्वय साधला जाऊ शकतो. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदाराच्या बचतीचा प्रवास व त्याचा प्रवाह गुंतवणुकीकडे जाणीवपूर्वक वळवून आर्थिक ध्येय सोप्या पद्धतीने सोडविले जातात. सामान्य गुंतवणूकदाराच्या बचतीस आर्थिक शिस्त लागते. त्यातून पॅसिव स्वरूपाचे उत्पन्न मिळविता येते.

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करीत असताना जोखिमेचे व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने करावे लागते. सध्याच्या काळात प्रत्येक गुंतवणूक योजनेमध्ये लाभ मिळवीत असताना, जोखीम वाढत चाललेली आहे. त्यामुळे गुंतवणुकीमधील सुरक्षितता व जोखीम याचे प्रमाण व्यस्त झाल्याने परतावा देखील कमी स्वरूपामध्ये मिळतो. महागाईचा विचार करता तो अनेक वेळा नकारात्मक मूल्य देत असतो. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणूक ही वाळवी लागल्यासारखी कमी होते. त्यामुळे अशा गुंतवणूकदारास गुंतवणुकीची रक्कम मुदतीनंतर घेत असताना समाधान मात्र राहात नाही. अनेक नवखे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यानंतर अर्ध्यामध्ये गुंतवणूक मोडत असतात. त्याचा विपरीत परिणाम गुंतवणुकीवर होतो. अचानक आर्थिक समस्या गुंतवणूकदारासमोर उद्भवल्यास ती सोडविण्यासाठी गुंतवणुकीवर कर्ज मिळू शकते. त्याची परतफेड करून मूळ फंडाच्या रकमेचा लाभ ख-या अर्थाने उपभोगता येतो. ‘सिप’द्वारे गुंतवणूक करीत असताना बाजारात घडणा-या अनेक घटना, बातम्या, तेजी-मंदी, इत्यादी घटकांवर लक्ष ठेवून काळजी घेण्यापेक्षा गुंतवणूकदार काळजी करीत असतात. शेअर बाजारांमध्ये अशा अनेक घटनांचा परिणाम होत असतो जो अल्पकालीन, मध्यमकालीन, व दीर्घकालीन स्वरूपापैकी एकावर परिणाम होतो. याचा अभ्यास सामान्य गुंतवणूकदारास असावा लागतो.

बदलत्या काळात ‘सिप’द्वारे एखाद्या आवडत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. कर्मचारी वर्गास मिळणा-या पगाराद्वारे देखील म्युच्युअल फंडाचा फायदा घेता येतो. ‘सिप’द्वारे गुंतवणूक केल्याने आर्थिक ताणतणाव येत नाही. जसे ‘थेंबे थेंबे तळे साचे’ याप्रमाणे संपत्तीचे तळे निर्माण करता येते. वास्तविक पाहता तहान लागल्यावर पाणी पिण्यासाठी विहीर खोदणारा वर्ग असतो. परंतु विहीर खोदून गरजेप्रमाणे पाणी पिणे, असे वर्तन ठराविक व्यक्तीलाच जमते. यासाठीच सामान्य गुंतवणूकदाराला आर्थिक गरजांच्या पाय-या सहज पूर्ण करता येतात. यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करून अशा वर्गांचा भविष्यकाळ हा सुरक्षित करता येतो.आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करता येते.

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या