21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeविशेषविरोधकांमुळेच मोदींना ‘संधी’

विरोधकांमुळेच मोदींना ‘संधी’

एकमत ऑनलाईन

उपराष्ट्रपती निवडणुकीतसुद्धा ज्या चाली भाजपने खेळल्या त्यामुळे धनखड यांचा विजय निश्चित केलाच, शिवाय भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अधिक बळकटी दिली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकांकडे पाहिले असता असे दिसून येते की, नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा कोणताही फॉर्म्युला अद्याप देशातील राजकीय पक्षांकडे नाही. म्हणजेच, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हॅट्ट्रिक पूर्ण करणार, कारण मोदींना पराभूत करण्यासाठी ज्या तत्त्वांची आणि कारणांची गरज आहे, ती देण्यास कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता तयार नाही. याचीही अनेक कारणे आहेत.

तसे पाहता दोन निवडणुकां-वेळच्या परिस्थितीत साम्य असत नाही. दोन निवडणुकांच्या निकालां-मध्ये तुलना करता कामा नये, त्याचप्रमाणे पुढील निवडणुकीत मागील निवडणुकीचा फॉर्म्युला योग्य ठरेल असेही गृहित धरता कामा नये. अर्थात, कोणतीही निवडणूक पुढील निवडणुकीची पार्श्वभूमी निश्चित करते हे खरे. परंतु त्यासाठीही त्या दोन्ही निवडणुका दोन समान पक्षांमध्ये व्हायला हव्यात. दोन्ही पक्षांचे नेतृत्व करणारे चेहरे बदलता कामा नयेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकांकडे पाहिले असता असे दिसून येते की, नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा कोणताही फॉर्म्युला अद्याप देशातील राजकीय पक्षांकडे नाही. म्हणजेच, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हॅट्ट्रिक पूर्ण करणार, कारण मोदींना पराभूत करण्यासाठी ज्या तत्त्वांची आणि कारणांची गरज आहे, ती देण्यास कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता तयार नाही. याचीही अनेक कारणे आहेत.

सर्वप्रथम, मोदींना पराभूत करण्यासाठी त्यांच्यासमोर जो चेहरा उभा केला जाईल तो आत्यंतिक प्रामाणिक असणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, मोदींशी लढण्यासाठी अल्पसंख्याकांच्या मतांचा मोह टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणताही नेता किंवा पक्ष तयार नाही. तिसरे असे की, संबंधित नेता द्रष्टा असणे गरजेचे आहे आणि नेहरूंच्या नंतर मोदी हेच देशातील सर्वांत द्रष्टे नेते आहेत, यावर जनतेचा विश्वास बसला आहे. आता नव्याने एखाद्या नेत्याने देशाच्या उन्नतीची स्वप्ने लोकांसमोर मांडली तर ती लोकांमध्ये रुजण्यास आणि लोकांचा विश्वास प्राप्त करण्यास बराच वेळ लागेल. तोपर्यंत २०२४ च्या निवडणुका होतील आणि मोदी बाजी मारतील. हे सर्व वास्तव आपल्याला राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालांमधून दिसून येते. या निवडणुकांचा अभ्यास कुणीही केला, तरी त्याला हेच वास्तव सापडेल. द्रौपदी मुर्मू यांना ६५ टक्के मते मिळतील, असा दावा सत्ताधारी भाजपने निवडणुकीच्या खूप आधी केला होता. त्यांना ६४ टक्के मते मिळाली. वास्तविक त्यांना केवळ ६१.१ टक्के मतेच मिळणे अपेक्षित होते. मुर्मू यांच्यासाठी २.१ टक्के क्रॉस व्होटिंग झाले. १७ खासदार आणि ११० आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. लोकसभेच्या ४७ आणि विधानसभेच्या ६०४ जागांवर भाजपचा प्रभाव वाढल्याचे मुर्मू यांच्या विजयानंतर स्पष्ट होत आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीतसुद्धा ज्या चाली भाजपने खेळल्या त्यामुळे धनखड यांचा विजय निश्चित केलाच, शिवाय भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अधिक बळकटी दिली. धनखड जाट आहेत. त्यांच्या विजयानंतर भाजपला दिल्ली, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये राजकीय लाभ मिळण्याची आशा वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहिल्यास पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या सुमारे ४० जागा अशा आहेत, जिथे जाट मतदार प्रभावी आहेत. शेतकरी कुटुंबातील धनखड यांच्या निवडीतून भाजपने शेतकरी कुटुंबांना मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी धनखड यांना किसानपुत्र म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने धनखड यांच्या माध्यमातून आपले समीकरण ठीकठाक करण्यात यश मिळवले आहे. म्हणूनच ज्या शिरोमणी अकाली दलाने शेतीविषयक कायद्यांच्या विरोधात एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, त्याच पक्षाने उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत धनखड यांना समर्थन दिले. यावरून असे दिसून येते की २०२४ च्या निवडणुकीत विरोधी पक्षांची एकी हे एक दिवास्वप्नच आहे. भाजपच्या विरोधात विरोधकांकडून एक भक्कम चेहरा उभा केला जाणेही दुरापास्तच वाटते. उपराष्ट्रपती निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांना अवघी २४.६४ टक्के मते मिळाली तर धनखड यांना ७४.३६ टक्के मते मिळाली. पराभवानंतर अल्वा यांनी सांगितले की, ही निवडणूक म्हणजे विरोधकांसाठी एक चांगली संधी होती. पूर्वीच्या गोष्टी विसरून सर्व पक्ष एकमेकांबद्दल विश्वास निर्माण करू शकले असते. परंतु आम्ही ही चांगली संधी गमावली आहे.

२०२४ च्या राजकीय लढाईत सर्वांत मोठा सवाल विरोधी पक्षांकडून कोणता चेहरा पुढे केला जातो, हा असेल. या बाबतीत अद्याप कोणतेही एकमत झाल्याचे दिसत नाही. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना विरोधकांचा चेहरा बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेसला राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त अन्य चेहरा मंजूर नाही. एनडीएमध्ये सामील नसलेले मजबूत प्रादेशिक पक्षही आपापला वेगळा राग आळवीत आहेत. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकांनी एनडीएच्या घटकपक्षांची संख्या वाढेल असे संकेत दिले आहेत. ज्याप्रकारे टीडीपी, अकाली दल, झारखंड मुक्ती मोर्चा, वायएसआर काँग्रेस या पक्षांनी उदार दृष्टिकोन दाखवून दिला, त्यावरून तरी तसेच दिसते. एवढेच नव्हे, जर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा विचार केला, तर भाजपला क्रमश: १७,१६६०,२३० व २२,९०७,६८६९ इतकी मते मिळाली होती. मोदींनी नव्याने पाच कोटी मतदार मिळविले.

यावेळीही लाभार्थ्यांचा जो वर्ग तयार झाला आहे, तो मोदींची मतसंख्या वाढविणारा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला याच काळात क्रमश: १०,६९,३५,९४२ आणि ११,९४,९५,२१४ इतकी मते मिळाली. मतांची टक्केवारी क्रमश: १९.५२ आणि १९.६७ इतकी होती. दुसरीकडे भाजपला २०१४ मध्ये ३१.३४ आणि २०१९ मध्ये ३७.७ टक्के मते मिळाली होती. अकरा कोटी मते मिळवणारा पक्ष विरोधकांचा चेहरा म्हणून दोन-तीन कोटी मते मिळविणा-या एखाद्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्याचा चेहरा पुढे करण्यास तयार होईल, हे शक्य वाटते का? नाही! मग वेगवेगळे लढून मोदींवर मात करणे शक्यच नाही, कारण हिंदू अस्मितेच्या आधारावर मते देणा-यांची संख्या वेगाने वाढत आहे. भाजपने जातीय राजकारण कमकुवत केले आहे. ब-याच वर्षांपासून चालत आलेल्या गंगाजमनी संस्कृतीमधील पाखंड उघड करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारे नाहीत, तेथेही जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर तेथे झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्के मते मोदींना अधिक मिळताना दिसतात. मते आणि जागा जिंकण्याचा मोदींचा जो क्रम दिसून येतो तो पाहता किंवा राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकांनी जी पार्श्वभूमी तयार केली आहे, ती पाहता लोकसभेच्या ३१३ जागा जिंकण्यापर्यंत भाजपची मजल जाईल, असे दिसते.

-योगेश मिश्र,
ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या