31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeविशेषबस्स झाले आता...!

बस्स झाले आता…!

छत्तीसगडमधील जोन्नागुडा जंगलात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करून २५ जवानांची हत्या केली. बीजापूरमध्ये नक्षलवादी आले असून, जवानांवर हल्ला करण्याची तयारी करीत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेने आधीच दिलेली होती. परंतु तरीही नक्षलवादी जवानांना लक्ष्य करण्यात यशस्वी झाले, याचाच अर्थ नक्षलविरोधी मोहिमेचे अपयश आणि त्रुटी गडदपणे समोर आल्या आहेत. नक्षलवाद्यांचा फणा ठेचण्याबरोबरच सरकारने नक्षली हिंसाचाराचे समर्थन करणा-यांवरही कडक कारवाई केली पाहिजे.

एकमत ऑनलाईन

संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी दोन हात करीत असताना नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील तरेंम पोलिस ठाण्याअंतर्गत येणा-या जोन्नागुडा जंगलात हल्ला करून २५ जवानांची हत्या केली. या हल्ल्यात बरेच नक्षलवादीही मारले गेले असल्याचे सांगण्यात येते. परंतु धक्कादायक वास्तव असे आहे की, बीजापूरमध्ये नक्षलवादी आले असून, जवानांवर हल्ला करण्याची तयारी करीत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेने आधीच दिलेली होती. परंतु तरीही नक्षलवादी जवानांना लक्ष्य करण्यात यशस्वी झाले, याचाच अर्थ नक्षलविरोधी मोहिमेचे अपयश आणि त्रुटी गडदपणे समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या भागातील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून पाच जवानांचा जीव घेतला होता. गेल्या वर्षी सुकमा जिल्ह्याच्या चिंतागुफा ठाण्याच्या हद्दीत १७ जवानांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. मार्च-एप्रिल महिन्यांत नक्षलवादी अधिक सक्रिय होतात असे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे, एकीकडे नक्षलवादी सरकारबरोबर शांतता वाटाघाटी करण्यासाठी प्रस्ताव देण्याचे नाटक करतात आणि दुसरीकडे आपल्या हिंसक कारवाया सुरूच ठेवतात. मग त्यांच्यावर विश्वास कोणी आणि कसा ठेवायचा?

आकडेवारीकडे लक्ष केंद्रित केल्यास असे दिसते की, गेल्या पाच वर्षांत नक्षलवाद्यांकडून हिंसाचाराच्या सुमारे ६००० घटना घडल्या आहेत. त्यात १२५० नागरिक आणि ६०० सुरक्षा कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलांच्या सावधगिरीमुळे गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांना लगाम घालण्यात थोडेफार यश आले आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची आक्रमकताही कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांतील चकमकींत नक्षलवादी मोठ्या संख्येने मारले गेले आहेत आणि त्यांचे मनोबल कमी झाले आहे. जवानांच्या सावधगिरीमुळे छत्तीसगड वगळता नक्षलग्रस्त अन्य १० राज्यांत नक्षलवाद्यांकडून होत असलेल्या हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत.

वस्तुत: एका खास रणनीतीचा भाग म्हणून नक्षलवादी सरकारी योजनांमध्ये बाधा उत्पन्न करीत आहेत. रोजगारपूरक सरकारी योजनांवरील ग्रामीण जनतेचा विश्वास वाढावा, असे त्यांना वाटत नाही. नक्षलग्रस्त भागात सरकारी योजना यशस्वी झाल्या तर आदिवासी तरुणांना रोजगार मिळेल आणि ते नक्षलवादी संघटनांचा हिस्सा बनणार नाहीत, अशी भीती नक्षल्यांना वाटते. याच कारणांमुळे सर्व सरकारी योजनांमध्ये अडथळे आणून नक्षलवादी आदिवासी युवकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याकडे आकर्षित करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. ते आपल्या संघटनेत सहभागी होणा-या युवक-युवतींना सरकारी नोकरीसारख्या अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत आहेत. आता तर नक्षलवादी संगणक शिक्षण घेतलेल्या अशा तरुणांचा शोध घेत आहेत, जे दहशतवाद्यांप्रमाणे ‘हायटेक’ होऊन विध्वंसक कारवाया पार पाडतील. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे गांभीर्य यावरून लगेच समजते. पारंपरिक लढाईचा मार्ग सोडून नक्षलवादी आता दहशतवादी संघटनांच्या मार्गावर चालले आहेत.

५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास उत्तर प्रदेशात बंदी

सर्वांत धोकादायक बाब अशी की, नक्षलवादी संघटनांचा संबंध आता दहशतवादी संघटनांशी येऊ लागला आहे. गेल्या वर्षी ईशान्येकडील दहशतवादी संघटनांकडून नक्षलवाद्यांना प्रशिक्षण मिळत असल्याचे देशासमोर उघड झाले आहे. गेल्या वर्षी आंध्र प्रदेश पोलिस दल आणि केंद्रीय सुरक्षा संस्थेच्या संयुक्त कारवाईत सहा लोकांना अटक करण्यात आली होती आणि हे लोक नक्षलवादी संघटनांना लाखो रुपयांची मदत देत होते, हे उघडकीस आले होते. पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तहेर संघटना नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अंडरवर्ल्डच्या मदतीने नक्षलवाद्यांना आर्थिक मदत पोहोचवीत आहे, अशीही एक बातमी होती. नक्षलवाद्यांच्या देशविरोधी कृत्यांमध्ये नेपाळी माओवादी आणि पाकपुरस्कृत दहशतवादी रस घेत आहेत, हे वास्तव आहे. गेल्या वर्षी आयएसआय आणि नक्षलवाद्यांचे नागपूर कनेक्शन उघडकीस आले होते.

नक्षलवाद्यांकडे असलेली अत्याधुनिक परदेशी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पाहता त्यांचा संबंध भारतविरोधी शक्तींशी आहे, हे उघड आहे. आजच्या घडीला नक्षलवाद्यांकडे रशिया आणि चीनमध्ये तयार झालेली अत्याधुनिक, घातक शस्त्रास्त्रे असून, त्यात थॉमसन बंदुका, एके-४७ आणि एके-५६ रायफलींचा समावेश आहे. याखेरीज नक्षलवाद्यांकडे आजमितीस मोठ्या संख्येने एसएलआरसारखी घातक शस्त्रास्त्रे आहेत. काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावणीवर नक्षलवाद्यांनी रॉकेट लाँचरच्या साह्याने हल्ला केला होता, हे आठवत असेलच. अशा पार्श्वभूमीवर, नक्षलवाद्यांना ही घातक परदेशी शस्त्रास्त्रे पुरवते तरी कोण, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. नक्षलसमर्थक बुद्धीजीवी वर्गसुद्धा नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी नक्षलवाद्यांशी सरकार अमानवी व्यवहार करते, असे सांगण्यात धन्यता मानतात. एवढेच नव्हे तर ते नक्षलवादाचा उल्लेख ‘व्यवस्था परिवर्तनाची लढाई’ असा करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. सर्वांत दु:खद बाब अशी की, या बुद्धिजीवी वर्गाला विद्रुप, असैद्धांतिक आणि तर्कहीन अशा नक्षलवाद्यांचे दु:ख समजते; मात्र त्यांच्या हातून मारले जाणारे निष्पाप नागरिक, सुरक्षा जवान यांचे दु:ख समजत नाही. लाखो-करोडो रुपयांच्या संपत्तीची नक्षलवाद्यांनी केलेली नासधूस या बुद्धिवाद्यांना दिसत नाही.

ज्या-ज्यावेळी निमलष्करी दलांकडून नक्षलवाद्यांना चकमकीत मारले जाते, त्या-त्यावेळी ही बुद्धिजीवी जमात अचानक झोपेतून जागी होते आणि छाती बडवायला सुरुवात करते. चकमक बनावट असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न तर ते करतातच; शिवाय सुरक्षा दलातील जवानांच्या हौतात्म्याचाही अपमान करतात. हे देशविरोधी कृत्य आहे. नक्षलवाद्यांचा फणा ठेचण्याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारांनी नक्षली हिंसाचाराचे समर्थन करणा-या अशा बुद्धिजीवी लोकांवरही कडक कारवाई करावी, हेच योग्य ठरेल.

विश्वास सरदेशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या