23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeविशेषजगन्मित्र कलाकार

जगन्मित्र कलाकार

एकमत ऑनलाईन

जन्म-मृत्यूचा फेरा कुणालाही चुकलेला नसला आणि कोणाच्याही जाण्याने होणारे दु:ख हे नैसर्गिक असले तरी काही व्यक्तींचे जाणे हे मनाला अत्यंत चटका लावून जाते. प्रदीप पटवर्धन माझ्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा. माझा ज्येष्ठ मित्र. तसे पाहता तो माझ्या आधीच्या पिढीचा. आमच्या ‘घडत्या’ वयात त्याची ‘मोरूची मावशी’सारखी नाटकं पाहिलेली. पण नंतर दोन नाटकांमध्ये त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि विनोदाच्या टायमिंगमधील त्याचं प्रभुत्व जवळून अनुभवता आलं. बँकेतील नोकरी काटेकोरपणाने सांभाळत नाटकांच्या तालमी, दौरे करणारा प्रदीप कधी थकलेला पाहिला नाही की त्याचा हसरेपणा मावळलेला पाहिला नाही. असा हा जगन्मित्र कायमचा सोडून गेला याचे दु:ख खूप मोठे आहे.

मराठी रंगभूमीच्या, चित्रपटांच्या इतिहासामध्ये आजवर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिभेने आणि अभिनयकौशल्याने स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला. छाप उमटवली. या कलाकारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्यक्तिरेखा पाहताना त्यांच्या जागी दुस-या अभिनेत्याची कल्पना करणेही पचनी पडत नाही. अनेक सहकलाकारांबाबतही अगदी तसेच होते. याचे कारण त्या-त्या कलाकारांनी त्या भूमिका अत्यंत चपखलपणाने आणि समरसून केलेल्या असतात. यातूनच कोणाही कलाकाराची एक प्रतिमा बनत जाते. प्रेक्षकांमध्येही मग त्या कलाकाराच्या अभिनयाबाबत कुतुहल असते. अशा कलाकारांच्या यादीमध्ये प्रदीप पटवर्धनचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

प्रदीपच्या अभिनयाचा पिंड हा मूलत: विनोदनिर्मितीचा. गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आला आहे. अतिशय खडतर संघर्षातून त्याने स्वत:च्या अभिनयाची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आणि जनमानसात लोकप्रिय झाला. अभिनयाचे बाळकडू त्याला कुठून मिळाले यापेक्षा त्याला बालपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. महाविद्यालयीन जीवनात अनेक एकांकिका स्पर्धांमधून त्याने अभिनयकौशल्य दाखवून दिले होते. पण अर्थातच ते एका मर्यादित समूहाला माहीत होते. संपूर्ण महाराष्ट्राला प्रदीप पटवर्धन या नावाची, कलाकाराची ओळख झाली ती नव्वदीच्या दशकामध्ये आलेल्या ‘मोरूची मावशी’ या नाटकामुळे. मुळातच हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक सुवर्णपान. विजय चव्हाण यांची मुख्य भूमिका असणा-­या या नाटकामधील अभिनयाने प्रदीपमधील कलागुणांची ओळख तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना झाली. त्याने दूरदर्शनवरील ‘गजरा’ या मालिकेतही सुरुवातीला काम केले होते; पण ‘मोरूची मावशी’ने त्याला ओळख मिळवून दिली. या नाटकामध्ये त्याने साकारलेला भैय्या पाटील सदैव स्मरणात राहणारा आहे.

विनोदी धाटणीच्या अभिनयामध्ये सर्वांत महत्त्वाचं असतं ते टायमिंग. त्यामध्ये अचूकता नसेल तर कित्येकदा पटकथेतील विनोद कितीही सक्षम असला तरी त्याची नेमकी परिणामकारकता दिसत नाही किंवा प्रेक्षकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळणे शक्य नसते. दुसरा घटक असतो तो चेह-­यावरील हावभाव आणि शारीरिक हालचाली. या दोन्हींमध्ये प्रदीपची मास्टरी होती. त्यामुळेच सहकलाकार असूनही त्याचे वेगळेपण लपून राहिले नाही. विनोदनिर्मिती ही कित्येकदा संवादांमधील पॉझमधूनही होत असते. हा पॉझ घेताना प्रदीपच्या चेह-यावरचे हावभाव हे विलक्षण असायचे. त्यामुळे प्रेक्षकांतून हशा पिकला नसता तरच नवल. टायमिंगच्या बाबतीतील त्याची अचूकता ही कुठेही, कधीही चुकली नाही, हे त्याच्या अभिनयाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. किंबहुना, कित्येकदा सहकलाकाराला सांभाळून घेण्यासाठीही तो प्रत्यक्ष दिग्दर्शनात नसलेला अभिनय करायचा. म्हणजेच इथेही पुन्हा टायमिंगवरील प्रभुत्व लक्षात येते. प्रदीपने नाटकं, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही प्रकारांमध्ये मुशाफिरी केली आणि प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवला. नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, भुताळलेला नवरा, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, चष्मे बहाद्दर, जमलं हो जमलं, एक शोध, पोलिस लाईन, एक दोन तीन चार अशा अनेक चित्रपटांची यादी सांगता येईल. याखेरीज दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, सखी प्रिय सखी, बायकोची खंत यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

प्रदीप हा माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी मोठा. त्याअर्थाने तो माझ्या आधीच्या पिढीचा. ‘भ्रमाचा भोपळा’, ‘मोरूची मावशी’ ही नाटकं पहात आम्ही मोठे झालो. त्याचं ‘खरे खोटे दिवस’ नावाचं नाटक मी पाहिलं होतं. त्यामुळे त्याला मी ज्येष्ठ मित्र म्हणेन. गेल्या अनेक वर्षांपासून आमची ओळख आहे. प्रदीपबरोबर मी दोन नाटकंही केली. एक म्हणजे ‘वा-यावरची वरात’ आणि दुसरं ‘वस्त्रहरण.’ या सर्वांमधून मला सतत जाणवलं ते त्याचं अतिशय सुंदर कॉमिक टायमिंग. पे्रक्षकांची नस त्याला पटकन कळायची. आम्हाला स्टेजवरही तो पटकन सांगायचा की हा पंच असा घे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रदीपने कधीही विनोदामध्ये दुस-यावर कुरघोडी केली नाही. त्याला त्याचं टायमिंग अचूक माहीत असायचं. ‘वा-यावरची वरात’ हे श्रीकांत मोघेंनी बसवलेले नाटक होते. या नाटकादरम्यान एकदा असं झालं होतं की, एका कलाकाराला पोहोचायला उशीर होणार होता. त्यावेळी तो पहिला प्रवेश पटकन प्रदीपनी केला होता. मला त्याचं मोठं अप्रुप वाटलं होतं.

आपण मोठे आर्टिस्ट आहोत, नव्या कलाकाराची एखादी छोटी भूमिका आपण का करायची अशा प्रकारचा कसलाही विचार न करता नाटकासाठी म्हणून त्याने पटकन वेश बदलून तो सीन पार पाडला होता. कलाकार म्हणून चतुरस्र असणा-­या प्रदीप पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सदैव हसतमुख आणि अत्यंत जगन्मित्र असा माणूस. प्रदीपशी कोणाचेही कसलेही भांडण आहे, असे कधीही ऐकायला मिळाले नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, नवोदितांपासून दिग्गजांपर्यंत सर्वांशी त्याचे अत्यंत उत्तम संबंध होते. अनेकांना माहीत असेलच की, प्रदीप बँकेमध्ये नोकरी करायचा. ही नोकरी सांभाळत त्याने अभिनयाच्या क्षेत्रात मुशाफिरी केली. विशेष म्हणजे आम्हाला नाटकांच्या दौ-यांवरून परतायला कितीही उशीर झाला तरी दुस-या दिवशी सकाळी तो वेळेत बँकेत हजर असायचा आणि त्यानंतर मग आराम करायचा. पुण्यामध्ये त्याने घर बांधले तेव्हा आम्हा सर्वांना आवर्जून घरी बोलावले होते. अशा अनेक आठवणी आज त्याच्या निधनाच्या बातमीनंतर मनात जाग्या झाल्या. मध्यंतरी तो आजारी असल्याचे समजले होते. पण अगदी परवाच माझी आणि त्याची भेट झाली होती. झी टॉकिजच्या कॉमेडी ऍवॉर्डसाठी तो परीक्षक होता. त्यावेळी त्याची तब्येत उत्तम वाटली. अत्यंत हसतखेळत तो वावरत होता. पण शेवटी नियतीपुढे कुणाचंही काही चालत नाही. त्याच्या जाण्याने रंगभूमी-सिनेसृष्टीतील एक प्रतिभावान कलावंत हरपला आहेच; पण आम्हा सर्वांचा जिवाभावाचा मित्र गेल्याची भावना आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
(शब्दांकन : हेमचंद्र फडके)

-आनंद इंगळे, अभिनेते

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या