32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeविशेषजिंदादिल सागर

जिंदादिल सागर

प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांचे नुकतेच निधन झाले. इतिहासात डोकावल्यास सरहदींचा काळ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा उतरता काळ होता. पण त्या काळात कधी साहीर लुधियानवीचे शेर, संतोष आनंद यांचे गीत, कैफी आझमी यांच्या नज्म आणि सागर सरहदी यांचे संवाद या गोष्टींची भुरळ पडलेली होती. सरहदींचे वेगळेपण म्हणजे प्रसिद्धी मिळूनही ते सायन येथे असलेल्या आपल्या घरी अंधेरीला लोकलने येत असत. लिहायचे असेल तर जगायला शिका. जगणे शिकायचे असेल तर लोकांना भेटत राहा, असे ते सांगत. खिलाडूवृत्ती हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. बॉलिवूडमध्ये असूनही ते कधीच ‘फिल्मी’ नव्हते.

एकमत ऑनलाईन

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक सागर सरहदी यांचे नुकतेच देहावसान झाले. लिहिण्यासाठी, सांगण्यासाठी ही घटना एका बातमीपुरती मर्यादित राहू शकते, परंतु असे नाही. पाकिस्तानच्या गंगा सागर तलवार यांचे भारतात सागर सरहदी होणे सोपे नव्हते. हिंदी चित्रपटसृष्टीत दोन मोठे लोक मोठ्यातल्या मोठ्या धनाढ्य मंडळींना शिव्या देऊन बोलण्यासाठी चर्चेत राहिले आहेत. एक सुपर सिनेमा ट्रेड मॅग्झिनचे संपादक विकास मोहन आणि दुसरे म्हणजे सागर सरहदी. जेव्हा या दोघांचा कधीतरी समोरासमोर सामना व्हायचा तेव्हा त्यांनी जिभेवर नियंत्रण ठेवले. वरवर कठोर वाटणा-या या मंडळींच्या मनात नेहमीच आपुलकी, प्रेम आणि सन्मानाची भावना राहिली. विकास मोहन यांचे निधन होऊन बरीच वर्षे झाली.

परंतु आता सागर सरहदी देखील जगाची बंधने तोडून निघून गेले. सागर सरहदी यांचा काळ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा उतरता काळ होता. या काळात कधी साहीर लुधियानवीचे शेर, संतोष आनंद यांचे गीत, कैफी आझमी यांच्या नज्म आणि सागर सरहदी यांचे संवाद या गोष्टींची भुरळ पडलेली होती. मुंबईला त्यांना भेटण्यासाठी येणा-या लोकांना ते चित्रपट ‘सिलसिला’च्या शूटिंगचा किस्सा नेहमीच सांगायचे. काश्मीरमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना अमिताभ बच्चन यांच्याशी दररोज संवाद व्हायचा. आपल्या पात्रावर लिहिलेल्या संवादाबाबत अमिताभ हे सागर सरहदी यांचा खूपच सन्मान करत असत. ते सागर सरहदींजवळ बसायचे आणि त्यांच्या पायावर हात फिरवायचे. ही आपुलकी आता पाहावयास मिळत नाही. अर्थात अमिताभ यांचे अन्य सहका-यांसमवेत जसे संबंध जुळले, तसे सागर सरहदी यांच्यासमवेत नव्हते, हे ही तितकेच खरे. विशेषत: जावेद अख्तर. सागर यांच्या मते, ताठ मानेने जगणे हीच लेखक असण्याची खरी ओळख आहे.

सात-आठ वर्षांपूर्वी सागर सरहदी आजारी पडले आणि ते शुद्ध हरपल्याने स्वगतच बोलायचे. परंतु मृत्यूला देखील डोळ्यात डोळे घालून बोलण्याची त्यांची हिंमत असायची. औषधांमुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता. परंतु एक-दोन किश्श्यांची आठवण करून दिल्यानंतर ते बोलायचे. अमिताभ बच्चन यांची आठवण काढल्यानंतर ते थेट म्हणायचे की, लेखक एखाद्या व्यक्तीला सुपरस्टार करू शकतो, परंतु कोणताही सुपरस्टार इच्छा असूनही लेखक होऊ शकत नाही. त्यासाठी साधना, तपश्चर्येची गरज आहे.

शेवटपर्यंत जनतेशी नाळ दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर म्हटले होते की, मी झोपतो, मी जागतो आणि जागे होऊन परत झोपतो. अनेक काळापासूनचा हा खेळ सुरू आहे, मरूनही मला अमरत्व लाभते. अली सरदार जाफरी यांनी लिहिलेल्या या दोन ओळी सागर सरहदी यांनी मित्र खय्याम यांच्यासाठी पोस्ट केल्या होत्या. सागर हे मित्रांचे जीवलग होते. खूपच दिलदार व्यक्ती म्हणून त्यांची ओळख. ते पन्नास वर्षांपूर्वीच्या चित्रपटांवरही तितक्याच उत्साहाने गप्पा मारायचे तेवढे की ऋतिक रोशनच्या चित्रपटांबाबत. युवकांच्या भेटीगाठी घेणे हा त्यांचा आवडता कार्यक्रम. त्यांच्या मते, अमिताभ बच्चनपासून शाहरूख खान आणि ऋतिक रोशनपर्यंतच्या सर्व लोकांनी मला काही ना काही शिकवले आहे.

यश चोप्रा यांच्यासमवेत त्यांचे नंतर कधीही पटले नाही. त्याचप्रमाणे राकेश रोशन देखील हे त्यांच्या गूडबुक मध्ये नव्हते. नामवंत कलाकारांनी माझा सन्मान केला, आदर केला, हे काय कमी आहे काय, असे ते म्हणत. मी तीन पिढ्यांसमवेत काम केले आहे आणि यश मिळवले. सागर सरहदी यांच्या इच्छा कधीही अवास्तव नव्हत्या. प्रसिद्धी मिळूनही ते सायन येथे असलेल्या आपल्या घरी अंधेरीला लोकलने येत असत. अंधेरीतील आपल्या कार्यालयातून ते अंधेरी स्थानकापर्यंत पायी येत असत. यामागचे कारण सांगायचे की, ज्यांच्यासाठी आपण लिहितो, त्यांना न भेटता कसे लिहू शकतो. सर्वांशी संवाद साधण्यात त्यांची हातोटी असायची. लिहायचे असेल तर जगायला शिका. जगणे शिकायचे असेल तर लोकांना भेटत राहा. खिलाडूवृत्ती हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता.
बॉलिवूडमध्ये असूनही ते ‘फिल्मी’ नव्हते

सागर सरहदींचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाच्या दुनियेत असूनही ते नॉन फिल्मी जीवन जगले. आजच्या काळात आश्चर्य वाटणारी ही गोष्ट आहे. आपल्या बिरादरीत सन्मान न मिळाल्याने ते खंत व्यक्त करायचे. मीना कुमारी एकदा त्यांच्या लिखाणावरून काहीतरी बोलल्या होत्या तेव्हा, सागर ताडकन म्हणाले, की मी कधी तुमच्या अभिनयाबद्दल बोललो का? मला जर अभिनयाचे काहीच येत नसेल तर मला त्यावर बोलण्याचा अधिकार देखील नाही.

१९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी कभी’ या चित्रपटाने ते प्रसिद्ध झाले. त्यांनी यशराज फिल्मसाठी नूरी, चांदनी, सिलसिला आणि ‘फासले’ साठी देखील लेखन केले. त्याचवेळी फारूख शेख, स्मिता पाटील आणि नसिरूद्दीन शहासारख्या कलाकारांनी नटलेल्या ‘बाजार’चे देखील ते दिग्दर्शक होते. ‘बाजार’ चित्रपटाचा सिक्वेल देखील त्यांनी लिहून ठेवला होता. अविनाश दास हे दिग्दर्शन करणार होते. पत्रकार रामजनम पाठक यांनी लिहिलेली कथा पाहून ते त्यांना भेटण्यासाठी मुरादाबादला गेले देखील होते. या कहाणीवर आधारित चित्रपट ‘चौसर’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता सुभाष आहेत. दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्याचा त्यांना बराच मानसिक त्रास झाला.

दिल्लीच्या निर्वासितांच्या छावण्यांपासून मुंबईच्या झोपडपट्टीत दिवस घालवणारे सागर सरहदी हे लग्नापासून दूरच राहिले. ते स्वत:च संघर्ष करत राहिले. दुस-या व्यक्तीची आपल्यासमवेत फरफट नको, म्हणून ते संसारात पडले नाहीत. शेवटपर्यंत ते अविवाहित राहिले. परंतु ते प्रेमावर भरभरून बोलायचे. एकदा तर ते प्रेम करणा-या व्यक्तींची नावे आठवू लागले तर हाताची बोटेही कमी पडली. सागर हे ख-या अर्थाने जिंदादिल होते. मायानगरीने त्यांना ‘सिलसिला’पासून ओळखले असले तरी साहित्यजगात त्यांची एन्ट्री ‘रक्खा’ने झाली होती. याच कथानकावर नूरी चित्रपटाची निर्मिती झाली. त्यांनी लिहिलेले भगत सिंग की वापसी, ख्याल की दस्त, राज दरबार, तन्हाई या पुस्तकांना वाचकांनी भरभरून प्रेम दिले. काही वर्षांपूर्वीच त्यांनी एक नाटकही मुंबईत सादर केले. ‘ऐ मोहब्बत’ असे त्या नाटकाचे नाव. प्रेम आपल्याला त्यांच्या लेखनातून कळाले, वाचनातून कळाले आणि समजण्यातून कळाले…आणि शत्रुत्व. त्यांना विचारलं असतं तर ते म्हणाले असते ‘ते काय असतं?’

पंकज शुक्ल, सिनेअभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या