31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home विशेष हाती फक्त खबरदारी!

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाची दुसरी लाट सुरू होत आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. लस येण्यास अद्याप बराच अवकाश आहे आणि लस उपलब्ध झाली तरी ती अतिथंड जागेत साठवून ठेवावी लागत असल्यामुळे मोठी खर्चिक यंत्रणा त्यासाठी उभारावी लागेल. या पार्श्वभूमीवर, काळजी घेणे एवढेच आपल्या हातात आहे. सणासुदीच्या दिवसांत नियम मोडल्यामुळेच दुसरी लाट येत आहे, हे लक्षात घेऊन स्वत:ला शिस्त लावून घेतली पाहिजे.

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला आहे आणि दररोज शंभराहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. सध्या दिल्लीत संसर्गाचा दर १२ टक्क्यांच्या आसपास आहे. संसर्गाचा राष्ट्रीय दर अवघा ३.५ टक्के असून, दिल्लीतील दर त्याच्या तुलनेत तिपटीने अधिक आहे. दिल्लीत कोरोनामुळे होणा-या मृत्यूचा दरही दीड टक्क्याच्या आसपास पोहोचला आहे. दिल्ली सरकारने काही दिवसांपूर्वी खूपच चांगले काम केले होते. राजधानी दिल्लीत संसर्ग कमी होत होता. परंतु संसर्गाचे प्रमाण कमी होताच लोक निर्धास्त आणि बेफिकीर झाले. सणासुदीच्या काळात लोकांनी घराबाहेर पडून एकमेकांना भेटण्यास सुरुवात केली.

या कारणामुळे संसर्ग वेगाने वाढू लागला. बाजारपेठांमध्ये वाढती गर्दीसुद्धा संसर्ग वाढण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरली. सणासुदीच्या काळात दिल्लीच्या बाजारपेठांची जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली, ती पाहिली असता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन कुठेही झाल्याचे दिसत नाही. मास्क न घातलेले अनेकजण दिसतात तर काहीजणांनी मास्क योग्य पद्धतीने लावला नसल्याचे दिसते. अशा गर्दीत अनेकजण ‘पॉझिटिव्ह पण लक्षणे नसलेले’ (असिम्प्टोमॅटिक) असू शकतात. गर्दीत आपण जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला मोठ्याने, जोर लावून बोलावे लागते आणि जोर लावून बोलताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या तोंडातील विषाणू खूप मोठे अंतर पार करू शकतो आणि अधिक लोकांना संसर्गग्रस्त करू शकतो.

बाजारपेठेत आपल्याला ग्राहकांबरोबरच विक्रेत्यांवरही नजर ठेवावी लागेल, कारण ते दिवसभरात असंख्य लोकांच्या संपर्कात येतात आणि त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. दिल्लीतील वाढते प्रदूषणसुद्धा कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्यास कारणीभूत ठरले. प्रदूषणाने विषाणूसाठी वाहक म्हणून भूमिका बजावली आहे. दिल्लीत सार्वजनिक परिवहनास दिलेल्या परवानगीमुळेही संसर्ग वेगाने वाढला आहे. कोरोना काळात दिल्लीतील सार्वजनिक वाहतूक करणा-या बसमध्ये केवळ ५० जणांनाच बसण्याची अनुमती होती. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीच्या काळात हा नियम शिथिल करण्यात आला. दिल्ली मेट्रोमध्येही गर्दी वाढू लागली. दिल्लीत यापूर्वी लग्नसमारंभातही लोकांच्या संख्येवर निर्बंध होते. परंतु कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ते हटविण्यात आले. लोकांना मिळालेल्या मोकळिकीमुळे त्यांच्यात बेफिकिरीची भावना बळावली आणि यामुळेच दिल्लीत पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रुग्ण वाढू लागले. देशाच्या अन्य राज्यांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे आणि तेथेही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले आहेत.

पुर्णेत भरधाव कारने दोघांना चिरडले

जगभरात ज्या-ज्या ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आली, त्यातील अधिकांश देशांनी पुन्हा लॉकडाऊन जारी केला आहे. लॉकडाऊन जारी करून कोरोनाच्या रुग्णसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते. परंतु दिल्ली सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यास नकार दिला आहे. कारण त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होते. आपल्या देशात मोठ्या संख्येने लोक रोजंदारीवर काम करतात. त्यांना दरदिवशी मिळणा-या मेहनतान्यावर जगावे लागते आणि कुटुंबाला जगवावे लागते. काही दिवस चरितार्थ चालविता येईल, एवढी बचतसुद्धा या लोकांकडे नसते. जर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, तर आपल्यासमोर भूकबळींची समस्या उभी राहील. संसर्ग रोखण्यासाठी काही नवे उपायसुद्धा आपल्याजवळ नाहीत. आपल्याला घरातून बाहेर पडताना मास्क लावावाच लागेल आणि बाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालनसुद्धा करावेच लागेल. सरकारला कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्या लागतील आणि संसर्गग्रस्तांना आयसोलेट करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे लागेल.

दिल्ली सरकारने मास्क न लावणा-यांकडून २००० रुपये दंड आकारण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. हा एक उत्तम निर्णय आहे. परंतु अनेक गरीब लोक हा दंड भरू शकत नाहीत. अशा व्यक्तींना मोफत मास्क पुरविण्याचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. लोकांना मास्क वापरण्यास प्रवृत्त करूनच संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकतो. रेस्टॉरंटसारखी खाण्या-पिण्याची ठिकाणे आणि बाजारपेठा खुल्या राहण्याची वेळ सरकारने कमी करायला हवी. जेणेकरून लोक कमी वेळासाठीच बाहेर पडतील. प्रशासकीय पातळीवरही काही सुधारणा करणे आवश्यक आहे. अजूनही काही ठिकाणी कोरोना चाचणी करण्यासाठी तीन-तीन दिवस प्रतीक्षा करावी लागते. चाचणीला इतका वेळ लागत असल्यामुळेही अनेक रुग्णांची परिस्थिती बिघडते.

जिल्ह्यात १३८ कोरोना मुक्त, तिघांचा मृत्यू, ९३ नवे बाधित

थंडी वाढल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रभाव आधीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. थंडीच्या दिवसांत लोक आपापल्या घरात अधिक वेळ राहतात. त्यामुळे लोकांना एकमेकांपासून अंतर ठेवणे शक्य होत नाही. थंडीच्या दिवसांत घराची खिडक्या-दारे बंद असतात आणि त्यामुळे घरात खेळती हवा राहत नाही. अशा स्थितीत घरातील एक व्यक्ती संसर्गग्रस्त झाल्यास कुटुंबातील अन्य व्यक्ती बाधित होण्याची शक्यता हिवाळ्यात अधिक असते. मॉडर्ना, फाइजर आणि अ‍ॅस्ट्राजेनेका या तीन कंपन्यांनी कोरोनाची लस विकसित करण्यात बरीच मजल मारली आहे. परंतु भारतात ही लस येण्यास अजून बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अनेक देशांनी मोठ्या संख्येने या लसींचे बुकिंग आधीपासूनच करून ठेवले आहे. या लसी खूपच कमी तापमानात प्रभावी ठरतात, हीसुद्धा एक महत्त्वाची समस्या आहे. भारताजवळ या लसींसाठी मोठी यंत्रणा उपलब्ध नाही. मोठ्या संख्येने लस उपलब्ध झाल्यास ती टिकवून ठेवण्यासाठी खूपच तयारी करावी लागेल. त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. एकंदरीत, लोकांनी सावधगिरी बाळगणे एवढेच तूर्त आपल्या हातात आहे. अंतर, मास्क आणि वारंवार हात धुणे ही त्रिसूत्रीच आपल्याला कोरोनापासून वाचवू शकते.

डॉ. ललित कांत
आयसीएमआरच्या संक्रमण विभागाचे माजी प्रमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या