कलौंजीच्या बियाचा आकार आणि रंग यावरून विविध प्रदेशात याची विविध नावे रूढ झाली आहेत. बियांचा आकार जि-यासारखा असल्यामुळे काळी जीरे असे म्हणतात. बियांचा रंग काळा असल्यामुळे काळे तीळ असे संबोधन करतात. तसेच काही ठिकाणी याला कांद्याचे बी (थोडा फार आकार व रंग सारखा असल्यामुळे) असे सुध्दा म्हणतात. कलौंजी ही सुगंधीत बिया असलेली वनस्पती थंड हवामान असलेल्या कटिबंधीय प्रदेशात चांगली वाढते. मसाल्याच्या पदार्थात बियांचा वापर असलेल्या वनस्पतीचे मुळस्थान दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण आशिया असावे असा अंदाज आहे. भूमध्यप्रदेशातून या वनस्पतीचा प्रसार जगात सर्वत्र झाला आहे.
भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर आणि वायव्य भागात विशेषत: पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये या वनस्पतीची लागवड केली जाते. प्रामुख्याने रब्बीचा हंगाम थंड हवामानामुळे या पिकाच्या योग्य वाढीसाठी अनुकूल असतो. कलौंजी पीक थंड हवामानाच्या प्रदेशात चांगले वाढते. भारतामध्ये मुख्यत: उत्तर भारतात हिवाळयाच्या काळात रब्बी हंगामामध्ये हे पीक घेतले जाते. या पिकाच्या पेरणीच्या आणि उगवणीच्या काळामध्ये हलक्या व थंड हवेची गरज आसते. तर पीक पक्व होण्याच्या काळात हलक्या व गरम हवामानाची आवश्यकता असते. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक असते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे खत, जल आणि तणाचे व्यवस्थापन केल्यास जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते. कलौंजीचे पीक सामान्यत: १३० ते १५० दिवसात तयार होते. काढणीसाठी पक्व झालेले पीक धारदार विळ्याने कापून किंवा मुळासहित उपटून ५ ते ६ दिवस वाळविले जाते.
चांगले वाळल्यानंतर काठीचे बडवून बिया वेगळ्या करतात. कलौंजीचे सेवन शारीरीक आरोग्याबरोबर सौंदर्य वाढविण्यासाठी सुध्दा अत्यंत उपयुक्त आहे. कलौंजीच्या बियापासून तेल मिळते. हे तेल विविध प्रकारचे लोशन, क्रीम आणि मलमे तयार करण्यासाठी केला जातो. तसेच सौंदर्यवर्धक सुगंधी तेलामध्ये याचा वापर केला जातो. कलौंजीच्या तेलाने छातीवर व पाठीवर मालिश करावी. तसेच तेल पाण्यात मिसळून त्याची वाफ घ्यावी. अथवा एक चमचा अद्रक रस, एक चमचा मध आणि दोन चमचे कलौंजी एकत्र करून तीन दिवस नियमितपणे प्यावी त्यामुळे जुन्यातील जुना खोकला कमी होऊन आराम मिळण्यास फायदा होतो. कलौंजीच्या तेलामध्ये दमा कमी होण्याचे गुणधर्म आहेत. या विकारामध्ये श्वास घ्यायला त्रास होतो त्यासाठी एक चमचा कलौंजीचे तेल आणि एक चमचा मध, कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्यावे. हे तयार केलेले मिश्रण एक ग्लास दररोज सकाळी सकाळी अनशापोटी काही दिवस नियमितपणे घेतल्यास अस्थमाचा त्रास कमी होण्यास मदत होते.
ब-याच वेळा शरीर थकल्यासारखे वाटते व त्यामुळे मन उदास होऊन आळशीपणा येऊन काम करण्यास उत्साह वाटत नाही त्यासाठी एक चमचा कलौंजी तेल एक ग्लास संत्र्याच्या रसामध्ये मिसळावे हे तयार केलेले मिश्रण दररोज दुपारी जेवणनंतर एक वेळ असे नियमितपणे दहा दिवस घेतल्यास आळस कमी होऊन उत्साह वाढतो. उन्हाच्या तिव्रतेमुळे ब-याच वेळा डोळे लाल होणे अथवा डोळ्यातून पाणी येते यासाठी कलौंजीचे एक चमचा तेल एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून एक महिना नियमितपणे घेतल्यास फायदा होतो. तसेच रोज रात्री झोपताना पापण्या आणि डोळ्याच्या सभोवताली कलौंजीचे तेल लावल्यास दृष्टी तेज होण्यास मदत होते. कलौंजीचे तेल डोकेदुखीच्या समस्येवर एक रामबाण उपाय आहे. त्यासाठी कपाळ आणि कपाळाभोवती कानपटीपर्यत कलौंजीचे तेल लावून हलक्या हाताने चोळावे तसेच दररोज न्याहरी (नास्ता) पुर्वी एक चमचा कलौंजी तेल घ्यावे. ब-याच लोकांना केस गळतीचा त्रास सहन करावा लागतो व त्यामुळे केस विरळ होतात त्यासाठी लिबांच्या रसाने १५ ते २० मिनिट केसांची मालिश करावी त्यानंतर शॅम्पू लावून केस चांगले धुवून घ्यावेत.
नंतर केस चांगले कोरडे झाल्यानंतर कलौंजीचे तेल लावावे. केसात कोंडा झाल्यामुळे डोके खाजण्याची समस्या निर्माण होते त्यासाठी १० ग्रॅम कलौंजी तेल, ३० ग्रॅम ऑलिव्ह (जैतून) तेल आणि ३० ग्रॅम मेंदी पावडर एकत्र करून गरम करावे. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर केसांना लावून एक तास ठेवावे व त्यानंतर केस कोमट पाण्याने धूवावेत असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करावे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना डोक्यावर टक्कल पडणे ही समस्या निर्माण होते. त्यासाठी कलौजीच्या तेलाने मालिश करावी. त्यामुळे फॉलीकल्स उत्तेजित होतात. ज्यामुळे केस वाढण्यास मदत होते. संगणकावर जास्त वेळ सतत काम केल्यामळे किंवा वजन उचल्यामळे पाठदुखीचा त्रास होतो त्यासाठी कलौंजीचे तेल थोडे गरम करून ज्या ठिकाणी पाठीला किंवा कंबरेला वेदना होत आहे. त्या भागावर लावून हलक्या हाताने मालिश करावे तसेच दिवसातून दोन वेळा एक चमचा तेल प्यावे.
सध्याच्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे व तेलकट, तिखट आहारामुळे आमाशयामध्ये बिघाड होतो व पोट फुगते अशा वेळी एक चमचा कलौंजी तेल एक ग्लास दुधामध्ये मिसळून घ्यावे पाच दिवस सेवन करावे त्यामुळे पोटातील आम्लता संतुलीत होऊन पचनशक्ती वाढते व जठरावरील सुज कमी होण्यास मदत होते.सततची धावपळ, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, कामाची अतिघाई व झोप (आराम) कमी यामुळे ताण-तणाव वाढतो व कामाचा उरक कमी होतो त्यासाठी एक कप चहामध्ये एक मोठा चमचा कलौंजी तेल मिसळून प्यावे. त्यामुळे मन शांत होते आणि मेंदूवरील सर्व ताण तणाव कमी होऊन शरीरामध्ये उत्साह संचारण्यास लाभदायक होते. या आजाराच्या उपचारात कलौंजी तेल अर्धा चमचाभर एक ग्लास द्राक्षाच्या रसामध्ये मिसळावे. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा नियमितपणे सकाळ, दपार व संध्याकाळ सेवन करावे. तसेच दोन किलो गहू आणि एक किलो कलौंजी बिया मिश्रण करून त्या पिठाच्या भाकरी करून खाव्यात.
प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९