खंडोबाचं खरं नाव काय होतं, मनी आणि मल्ल या राक्षसांचं खरं नाव काय होतं. खंडोबाचं आणि त्यांचं वैर काय होतं, खंडोबाचं मूळ गाव कोणतं, वंश कोणता, खंडोबाने दोन विवाह का केले.. अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे देणारी आणि खंडोबाचं बालपण उलगडून दाखवणारी मराठी साहित्यातली पहिली कादंबरी म्हणजे ‘खंडोबा’.
पुराणग्रंथ, साहित्य, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून आपण खंडोबाची कीर्ती अनुभवलेली आहे. महाराष्ट्राच्या या कुलदैवतावर भाविकांची अफाट श्रद्धा असली तरी आजवर एकाही माध्यमातून खंडोबाच्या बालपणावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही. नितीन थोरात लिखित ‘खंडोबा’ या कादंबरीतून आपल्याला खंडोबाच्या बालपणाचा नव्याने उलगडा होतो. खंडोबाचं बालपण सांगणारी मराठी साहित्यातली ही पहिलीच कादंबरी ही या पुस्तकाची जमेची बाजू. खंडोबा, मल्हारी-मार्तंड, सदानंद, म्हाळसाकांत अशा विविध नावांनी महाराष्ट्राच्या कुलतदैवतला ओळखले जाते. मनी आणि मल्ल या राक्षसांनी पृथ्वीवर उच्छाद मांडला म्हणून महादेवांनी खंडोबा अवतार धारण केला आणि त्या दोन असुरांचा वध केला अशी सर्वमान्य पुराणकथा आहे. सहा दिवस चाललेल्या युद्धामध्ये चंपाषष्टीला खंडोबाने दोन्ही असुरांचा वध केला. खंडोबाने म्हाळसासोबत विवाह केला असतानाही त्यांनी बानूसोबतही लग्न केले. या विवाहाच्याही पौराणिक कथा आहेत. पण नितीन थोरात यांनी लिहिलेल्या ‘खंडोबा’मध्ये आपल्याला खंडोबाच्या जन्मापासून त्याच्या आयुष्याचा संपूर्ण संघर्ष वाचायला मिळतो. खंडोबाचा जन्म, आई-वडील, भावंडं, सवंगडी, राज्य, युद्ध, मानसिक संघर्ष, प्रेम, वैर, विवाह, जेजुरीची निर्मिती अशा हजारो संदर्भांना स्पर्श करत लेखकाने एक नवं खंडोबाविश्व वाचकांसमोर ठेवलं आहे.
आजवर महाराष्ट्राच्या कुलदैवताला आपण अवतार म्हणून गौरवलं. त्या अवताराची चौकट बाजूला करत लेखकाने देवत्व लाभलेल्या एका शूर योद्ध्याच्या स्वरूपात आपल्यासमोर खंडोबा सादर केला आहे. त्यामुळे हा खंडोबा अधिक जवळचा आणि मानवी भावनांना स्पर्श करत आपलासा होऊन जातो. कथेची सुरुवात कलियुगातल्या आदित्य नावाच्या एका मराठी चित्रपट दिग्दर्शकापासून सुरू होते. खंडोबावर चित्रपट करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर येतो आणि खंडोबाच्या आयुष्याचा उलगडा करण्याची त्याची धडपड सुरू होते. ही धडपड त्याला थेट खंडोबाच्या काळात घेऊन जाते आणि तिथून पुढे सुरू होतो खंडोबाच्या शोधाचा प्रवास. लेखकाने आदित्यच्या नजरेतून खंडोबा टिपला आहे.
खंडोबाचं खरं नाव काय होतं, मनी- मल्ल यांचं नाव काय होतं, खंडोबाचं आणि त्यांचं वैर काय होतं, खंडोबाचं मूळ गाव कोणतं, वंश कोणता, खंडोबाने दोन विवाह का केले, अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे या कादंबरीतून मिळतात. कादंबरी काल्पनिक असली तरी पौराणिक संदर्भांची पद्धतशीर गुंफण केल्यामुळे ते अगदी तंतोतंत खरे आणि वास्तवदर्शी वाटतात. खंडोबाला मानवी अवतारात सादर केल्यामुळे त्याच्या भावनांशी जोडले जाणे वाचक म्हणून सहजशक्य होते. देव काहीही करू शकतो. पण, माणूस हे कसं काय करू शकतो असा प्रश्न वाचकांना पडतो आणि त्याचं उत्तरही मिळू लागतं. मग आपोआप लोकांनी जनपद बहाल केलेला एक शूर योद्धा कशाप्रकारे अनभिषिक्त सम्राट बनतो याची ‘खंडोबा’ ही कथा.
आपल्या घराच्या देव्हा-यात असणा-या प्रभू रामचंद्र, देवकीनंदन श्रीकृष्ण, पार्वतीपुत्र गणपती, अंजनीसुत हनुमान अशा सर्व देवतांना लहानपण आहे. पण, देव्हा-यासोबतच आपल्या मनाच्याही गाभा-यात वसणा-या खंडोबाला लहानपण नाही. तीच कमी भरून काढण्याचा प्रयत्न ‘खंडोबा’ या कादंबरीतून झाला आहे. भक्तांच्या भावनांचा मान राखत खंडोबाच्या आयुष्यातले खाचखळगे जाणून घ्यायचे असतील तर ही कादंबरी नक्कीच प्रभावी ठरते.
पुस्तकाचे नाव : खंडोबा
प्रकाशक : न्यू ईरा प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : ३२८
किंमत : ३२० रुपये