19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeविशेषकिसान ट्रेन ठरणार ‘गेमचेंजर’

किसान ट्रेन ठरणार ‘गेमचेंजर’

शेतक-यांची नाशवंत उत्पादने देशाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत पोहोचविण्यासाठी किसान स्पेशल ट्रेन सोडल्या जाऊ लागल्या आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिकमधील देवळाली ते बिहारमधील दानापूर अशी पहिली किसान रेल्वे राज्यातून धावली. आता अमरावती-नागपूर भागातील संत्र्यांची बांगलादेशला रेल्वेने निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे वाहतुकीने अवघ्या काही तासांत संत्रा बांगलादेशला पोचविता येणार आहे. किसान रेल्वेची एकंदर कार्यपद्धती व रचना पाहिल्यास कृषिक्षेत्रातील क्रांतीचा तो एक महत्त्वाचा घटक ठरेल, असे संकेत मिळत आहेत.

एकमत ऑनलाईन

‘एक देश, एक बाजार’ या धर्तीवर आणण्यात आलेली कृषि विधेयके संमत झाल्यानंतर मोठा राजकीय संघर्ष उसळला आहे. परंतु सरकार सातत्याने शेतक-यांचे उत्पन्न वाढेल अशा दृष्टीने पावले उचलत आहे. कृषि आणि रेल्वे मंत्रालयाने शेतक-यांचे उत्पन्न वेगाने वाढविण्याचा संकल्प केला असून, शेतक-यांना आपले उत्पादन देशाच्या कोणत्याही कोप-यात अधिक दराने विकता यावे यासाठी उपाय शोधत आहे. आता संपूर्ण देशातील ग्राहकांसाठी ताजी फळे, भाज्या आणि अन्य उत्पादने पोहोचविण्यासाठी खास रेल्वेगाड्या चालविण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले तर ते खरेदीसाठी बाजारात येतील. मागणी वाढेल तसतसे उत्पादन वाढेल. आता शेतक-यांसाठी मँगो स्पेशल, बनाना स्पेशल, प्याज स्पेशल अशा खास रेल्वेगाड्या चालविल्या जाणार आहेत. अशा गाड्यांमध्ये मांस आणि मासे यांची वाहतूक करण्यासाठी खास रेफ्रिजरेटर असणारे कंटेनरही असतील.

भारतातील पहिली किसान स्पेशल रेल्वेगाडी ७ ऑगस्टला महाराष्ट्रातील नाशिकजवळील देवळाली स्थानकावरून बिहारमधील दानापूर स्थानकासाठी रवाना झाली होती. आता ही रेल्वेगाडी आठवड्यातून तीन दिवस चालविली जात आहे. हा प्रयोग खूपच यशस्वी झाला. दुसरी किसान ट्रेन ९ सप्टेंबर रोजी अनंतपूर (आंध्र प्रदेश) ते दिल्ली (आझादपूर मंडई) अशी चालविण्यात आली. भारतीय रेल्वेने कोरोना संकटाच्या काळात देशभरात अन्नधान्य आणि अन्य खाद्यवस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ९६ मार्गांवर गाड्यांची वाहतूक केली. लॉकडाऊनच्या काळात देशात अन्नधान्य आणि फळे, भाज्या यांचा अभाव जाणवला नाही. आता किसान ट्रेनचे नियोजन हंगामी फळे आणि भाज्यांचा विचार करून केले जाणार आहे आणि त्यामुळे छोट्या शेतक-यांना लाभ मिळणार आहे. या प्रकारच्या रेल्वेगाड्या आगामी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात नागपूर ते दिल्ली संत्रा ट्रेन, पंजाब ते पश्चिम बंगाल आणि ओडिशा या मार्गांवर किनू ट्रेन सोडली जाऊ शकते. त्याचप्रमाणे एप्रिल ते जून या कालावधीत आंध्र प्रदेश ते दिल्ली आंबा स्पेशल, मार्च ते डिसेंबर या दरम्यान नाशिक आणि जळगाव येथून अनुक्रमे कांदा स्पेशल आणि केळी स्पेशल किसान ट्रेन धावू शकेल. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात सूरत, वनसाड आणि नवसारी येथून दिल्लीपर्यंत चिकू स्पेशल ट्रेन धावण्याची शक्यता आहे.

वाढदिवसाचा खर्च तब्बल २१५ कोटी

किसान स्पेशल ट्रेनच्या बाबतीत शेतक-यांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. किसान ट्रेनच्या प्रवासी डब्यात बसून ते संपूर्ण प्रणाली समजून घेत आहेत आणि ही प्रणाली कशी काम करते याची माहिती घेत आहेत. या गाड्या छोट्या शेतक-यांसाठी फायदेशीर आहेत. हे शेतकरी संपूर्ण रेल्वेगाडी बुक करू शकत नाहीत आणि त्यामुळे या सेवेचा लाभ घेऊन ते आपल्या गरजेप्रमाणे गाडीतील जागा बुक करू शकतात. आकडेवारीनुसार किसान ट्रेनमुळे सर्वांत कमी माल पाठविण्याचे उदाहरण तीन किलो डाळिंबे हे आहे. महाराष्ट्रातीलच नाशिकमधून ती मुझफ्फरपूरला पाठविण्यात आली होती. त्याचप्रमाणे मनमाडपासून खांडवा येथे १७ डझन अंडी पाठविण्यात आली होती. शेतीमाल कमी असो वा अधिक असो, त्यासाठी गाडीत जागेचे बुकिंग करता येते. किसान स्पेशल ट्रेन ही पार्सल ट्रेन म्हणूनही काम करते.

किसान स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून जेवढे अधिक अंतर असेल तितका भाडेखर्च कमी होतो. ५०० किलोमीटरपर्यंत अंतर असेल तर रेल्वेने माल पाठविणे खर्चिक आहे. परंतु एक हजार किलोमीटरपर्यंत अंतर असेल तर रस्त्यावरील वाहनातून माल पाठविण्यापेक्षा रेल्वेने पाठविणे स्वस्त पडते. दोन हजार किलोमीटर अंतर असेल तर वाहतुकीचा खर्च आणखी कमी येतो. कारण रस्त्यावरील वाहनातून माल पाठविण्यासाठी कमीत कमी एक हजार रुपये प्रतिटन भाडे भरावे लागते. शिवाय ट्रकमधून माल पोहोचण्यास वेळही अधिक लागतो. वाटेत काही उत्पादने खराब होऊ शकतात. आंध्र प्रदेशपासून दिल्लीपर्यंत ट्रक पोहोचण्यासाठी कितीतरी दिवस लागतात आणि उत्पादनांमधील २५ ते ३० टक्के भाग खराब होतो. परंतु रेल्वेने हेच अंतर दोन दिवसांत कापले जाते. रेल्वेचे अनेक विभाग शेतक-यांना मालाच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावावरही विचार करीत आहेत

मांजरा खोऱ्यातील कोरड्या प्रकल्पांचा अभ्यास करावा

किसान स्पेशल ट्रेन हा शेती क्षेत्रासाठी एक क्रांतिकारी निर्णय आहे. शेतक-यांना जर त्यांच्या उत्पादनांची योग्य किंमत मिळत असेल तर त्यांचा कृषि विधेयकांना विरोध असता कामा नये. जर ५० टक्के पिकांची वाहतूक या विशेष रेल्वेगाड्यांमधून करण्यात आली तर कृषि उत्पादनांची सुमारे ४५ कोटींची नासाडी आपल्याला रोखता येईल. कोरोना काळात सर्व क्षेत्रांमध्ये संकट आले असताना शेती क्षेत्राने मात्र प्रगती केली आहे. देशाला कधीच अन्नधान्य संकटाचा मुकाबला करावा लागणार नाही, यावर नागरिकांचा विश्वास त्यामुळे दृढ झाला आहे. कृषि क्षेत्र मजबूत करण्यासाठी अनेक प्रकारची धोरणे आणि योजनांची गरज आहे. एकाच मार्गाने चालत राहिल्यास काही दिवसांनी त्यात विसंगती निर्माण होतात. बाजार समितीच्या प्रणालीचेच उदाहरण घ्या. या बाजार समित्यांमध्ये शेतक-यांची मोठी पिळवणूक होते आणि फायदा होतो तो व्यापा-यांचा आणि मध्यस्थांचा. शेतक-याने त्याच्या फायद्याचे गणित कोणते आहे, हे ओळखले पाहिजे. शेतक-यांवर असलेले निर्बंध आता हटतील आणि त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळेल.

-नवनाथ वारे
शेतीप्रश्नांचे अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या